– हजारो कलशधारी महिला भाविकांनी शोभायात्रेला भरला भक्ति भावनेचा रंग
शिरूर कासार, जि. बीड (बाळासाहेब खेडकर) – श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे वैराग्यमूर्ती संत वामनभाऊंनी प्रारंभ केलेला ९१ वा नारळी सप्ताह हनुमान जन्मोत्सवाचे शुभपर्वणीवर हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. महंत विठ्ठल महाराज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्याहस्ते टाळ, वीणा, मृदंग व ग्रंथपूजनाने सप्ताहास प्रारंभ झाला. यावेळी संत, महंतासह माजी आमदार भीमराव धोंडे, उद्योजक लिंबाशेठ नागरगोजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रतापराव ढाकणे, सरपंच अशोक पाखरे मामा, जिल्हा परिषद सदस्य रामदास बडे, दशरथ वणवे, आदिनाथ नागरगोजे यांच्यासहसह हजारो भाविक उपस्थित होते. शेकडो कलशधारी महिलांनी स्वागत दिंडीला भक्ती भावनेचा रंग भरला.
गेली वर्षभर मानूर मधे नारळी सप्ताहाची लगबग सुरू होती. बैठकावर बैठका होऊन नियोजन केले जात होते. आज महंत विठ्ठल महाराज यांचे मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले. मानूरला भाविकांची गर्दी उसळली होती. यथावत परंपरेप्रमाणे सप्ताहस्थळी टाळ-वीणा मृदंग, ग्रंथपूजन करून हजारो भाविकांनी पुष्पवृष्टी करतांना गहिनाथ महाराज व संत वामनभाऊंचा जयजयकार केला. विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांचे रसाळ वाणीतून रामायण कथा तर महाराष्ट्रातील ख्यातनाम महाराजांची कीर्तनसेवा आजपासून सुरू झाली आहे. हभप. केशव महाराज नामदास यांचे प्रथम कीर्तनपुष्प तर नंतर संजय महाराज पाचपोर, बाळकृष्ण महाराज वसंतगडकर, चैतन्य महाराज देगरूलकर, इंदुरीकर महाराज, रामभाऊ राऊत महाराज, जयंती बोधले महाराज ही दिग्गज महाराज मंडळी उपस्थित राहून प्रबोधन व ज्ञानामृताचा वर्षाव करणार आहेत. महंत विठ्ठल महाराज यांचे समारोपाचे काल्याचे कीर्तन होणार आहे. ज्ञानदानाबरोबर रोज अन्नदानालाही येथे अनन्यसाधारण महत्त्व दिले जाणार आहे. कुठेही उणीव भासू नये यासाठी मानूरसह पंचक्रोशीतील अबालवृध्द सज्ज आहेत.