BULDHANAHead linesVidharbha

शिवसेनेला (ठाकरे) धक्का; जालिंदर बुधवतांसह सात जणांचे अर्ज फेटाळले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगलीच राजकीय चुरस निर्माण झाली असून, शिवसेनेचे दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकले आहेत. शिंदे गट व भाजपने घेतलेल्या हरकतींनुसार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह सात जणांचे अर्ज फेटाळले आहेत. या कारवाईने राजकीय खळबळ उडाली असून, बाजार समिती निवडणुकीत अतितटीचा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्हे प्राप्त झाली आहेत.

जालिंदर बुधवत यांच्याकडे व्यापारी अडत्याची अनुज्ञाप्ती आहे आणि त्यांनी सहकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज भरला होता. व्यापारी अडत्यांच्या मतदारयादीत नाव असल्यामुळे बुधवत यांना शेतकर्‍यांसाठी असलेल्या सहकारी संस्थेकडून निवडणूक लढता येत नाही. हे अधिनियमात बसत नसल्यामुळे बुधवत यांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी तक्रार ओमसिंग राजपूत, श्रीकांत पवार, धनंजय बारोटे, अ‍ॅडव्होकेट सुनील देशमुख, अ‍ॅडव्होकेट मोहन पवार आणि संदीप उगले यांनी केली होती. या तक्रारीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जालिंदर बुधवत यांचा उमेदवारी अर्ज तपासणीअंती फेटाळून लावला. बुधवत यांच्यासह राजू फकीरबा मुळे, सुधाकर एकनाथ आघाव, सुनील अशोक गवते, नंदाबाई हरिभाऊ सिनकर, ज्ञानदेव भीमराव साळवे आणि रखमाबाई अजबराव पिंपळे यांचादेखील उमेदवारी अर्ज याच कारणामुळे बाद करण्यात आला आहे.

दरम्यान, बाजार समिती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात उपनिबंधकांकडे दाद मागणार असल्याची माहिती शिवसेना (ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी दिली असून, बुधवत यांच्यासह अर्ज बाद झालेले सातही उमेदवार निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्णयाला आव्हान देणार आहेत.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!