ChikhaliVidharbha

रायपूर ग्रामस्थ भरविणार शिक्षणाधिकारी, ‘सीईओं’च्या दालनात शाळा!

– निलंबीत व वादग्रस्त मुख्याध्यापकाचा शिक्षण विभागाला पुळका का – ग्रामस्थांचा संतप्त सवाल
– गेल्या सहा दिवसांपासून शाळा बंद, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

चिखली (तालुका प्रतिनिधी) – निलंबीत झालेल्या मुख्याध्यापकाला रायपूर येथील जिल्हा परिषद शाळेवर पदस्थापना दिल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन केले होते. परंतु, या मुख्याध्यापकाचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला भलताच पुळका आलेला असून, गेले आठ दिवस शाळा बंद असूनही या मुख्याध्यापकाच्या पदस्थापनेचा आदेश रद्द करण्यात आला नाही. त्यामुळे आता संतापाचा कडेलोट झालेल्या रायपूर ग्रामस्थांनी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात शाळा भरविण्याचा इशारा दिला आहे. तसेच, जिल्हा परिषद कार्यालयासमोर जोरदार आंदोलनदेखील केले जाणार आहे.

शाळेत शिक्षिका हजर, पण विद्यार्थी गैरहजर

शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांना विश्वासात न घेता गजानन कंकाळ या मुख्याध्यापकाला रायपूर येथे उच्चश्रेणी मुख्याध्यापक म्हणून पदस्थापना देण्यात आलेली आहे. या मुख्याध्यापकाला यापूर्वी दोनवेळा निलंबीत केलेले असून, हे मुख्याध्यापक आमच्या गावातील शाळेवर नको, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे. त्यासाठी दि. ०१ एप्रिलरोजी रायपूर ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलन केले होते. त्याची अद्यापही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने काहीही दखल घेतलेली दिसत नाही. वास्तविक पाहाता, जिल्हा परिषद मराठी उच्च माध्यमिक शाळा रायपूर येथील उच्चश्रेणी मुख्याध्यापक हे पद मागील आठ महिन्यांपासून रिक्त आहे. या रिक्त जागेवर निलंबित मुख्याध्यापक जे दोन-तीन वेळा निलंबित झालेले आहे, त्यांना पदस्थापना देण्यात आली. यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालयाने दि. ०६ मार्च २०२३ ला सदर मुख्याध्यापकांचा आदेश रद्द करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु सदर मुख्याध्यापकाचा आदेश रद्द न झाल्यामुळे दि. ३१ मार्च २०२३ ला शाळा बंद आंदोलन करण्यासंदर्भात पुन्हा निवेदन देण्यात आले. परंतु, शिक्षण विभागाने या दोन्हीही निवेदनाकडे दुर्लक्ष केलेले आहे.

विशेष बाब म्हणजे, सदर मुख्याध्यापकाचे यापूर्वी मराठी प्राथमिक शाळा शिरपूर व मराठी उच्च प्राथमिक शाळा चांडोळ येथे आदेश झाले होते. तेथील शाळा व्यवस्थापन समितीने त्यांना रुजू करून घेण्यास नकार दिल्याने तेथील आदेश रद्द करण्यात आले. रायपूर ही बुलढाणा पंचायत समितीमधील आदर्श आणि आयएसओ मानांकनप्राप्त शाळा आहे. अशा शाळेवरील निलंबित मुख्याध्यापकाचा आदेश जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. यानंतरही गजानन कंकाळ हे दि. ०३ एप्रिल २०२३ ला शाळेवर येऊन सही करून निघून गेले होते. त्यानंतर पालकांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. गेल्या १ तारखेपासून आज ६ एप्रिलपर्यंत सहाव्या दिवशीदेखील एकही विद्यार्थी शाळेत आलेला नाही. या आंदोलनात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून, शिक्षण विभाग हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असून, संबंधित मुख्याध्यापकाविषयी पुळका दाखवत असल्याचे दिसून येत असल्याने ग्रामस्थ आणखीच संतप्त झालेले आहेत.


संपूर्ण गावाचा विरोध असताना यात निलंबित व वादग्रस्त मुख्याध्यापकाला पाठीशी घालण्याचा काय उद्देश आहे? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. यात काही अर्थकारण नाही ना?अशी गावकर्‍यांमध्ये चर्चा सुरु आहे. तरी, संबंधित वादग्रस्त मुख्याध्यापकची रायपूर येथील पदस्थापना तातडीने रद्द करावी, अन्यथा यापुढे आंदोलन आणखी तीव्र करून शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी यांच्या कार्यालयात शाळा भरविण्याचा इशारा रायपूर ग्रामस्थांनी दिला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीस प्रशासन व वरिष्ठ अधिकारी जबाबदार राहतील, असेही ग्रामस्थांनी ठणकावलेले आहे.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!