‘सार्वजनिक बांधकाम’चा कार्यकारी अभियंता प्रकाश बूबला एक लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक!
वर्धा (प्रकाश कथले) – येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता प्रकाश नारायणदास बूब (वय ४३) याला एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना भ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी आज (दि.६) सकाळी साडेअकरा वाजता रंगेहाथ अटक केली. बूब याने त्याच्या निवासस्थानीच ही लाचेची रोख रक्कम स्वीकारली. पोलिसांनी बूब याला अटक केल्यानंतर त्याच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली असता, घरात वेगवेगळ्या लिफाफ्यात भरलेली एकूण ६ लाख ४० हजारांची रोख रक्कमही मिळाली. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे.
भ्रष्टाचार व लाचलूचपत विभागाच्या पोलिसांनी प्रकाश बूब याला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या अमरावती येथील कृष्णार्पण कॉलनीतल्या मातोश्री नामक घर क्रमांक ७० या निवासस्थानाचीही झड़ती घेतली. त्या घरी काय मालमत्ता मिळाली, याची माहिती वर्ध्यात आली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारात भ्रष्टाचाराचेच बांधकाम जोरात सुरू असल्याच्या चर्चा जोरात होत्या, तसेच कार्यकारी अभियंता प्रकाश बूब याच्या लाचखोरीच्या चर्चाही चर्चेत होत्या. त्यावर आज ता.६ रोजी भ्रष्टाचार व लाचलुचपत विभागाच्या कारवाईने शिक्कामोर्तब झाले. तक्रारदाराच्या संस्थेचे शासकीय करारानुसार वृक्षरोप लागवडीचे अगोदरच्या तीन टप्प्याचे देयक मिळाले होते. पण चौथ्या टप्प्याचे ५० लाख रुपयांचे देयक काढून देण्यास कार्यकारी अभियंता प्रकाश बूब याने पाच टक्के लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचेची रक्कम देण्यास असमर्थता दाखविल्याने प्रकाश बूब याने तक्रारदाराला त्रास द्यायला सुरुवात केली. अखेर अडीच लाख रुपयांच्या कमिशनपैकी एक लाख रुपये द्यावेच लागतील, ती रक्कम माझ्या शासकीय निवासस्थानी घेऊन येण्याचे फर्मान प्रकाश बूब याने सोडले. ही लाचेची रक्कम घेऊन तक्रारदाराला कार्यकारी अभियंता प्रकाश बूब याने त्याच्या सिव्हिल लाईनमधील शासकीय निवासस्थान `पारिजात` येथे सकाळी साडेअकरा वाजता बोलावले होते. त्यानुसार भ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या वर्ध्याच्या चमूने आज सकाळी सापळा लावला. लाचेची रक्कम स्वीकारताच या चमूने झडप घालत कार्यकारी अभियंता प्रकाश बूब याला ताब्यात घेतले, तसेच तक्रारदाराजवळून स्वीकारलेली लाचेची एक लाख रुपयांची रक्कमही जप्त केली.
काहीच दिवसांपूर्वी वर्ध्याचे उपजिल्हाधिकारी विजय सहारे यालाही ४० हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा मोठ्या पदावरील अधिकार्याला लाच घेताना अटक केल्याने जिल्ह्यातील लाचखोर अधिकार्यांचे धाबे दणाणले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागीय कार्यालयातील वातावरण तर कमालीचे सामसूम होते. ही कारवाई भ्रष्टाचार व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलिस अधीक्षक मधुकर गिते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक डी.सी.खंडेराव, सहायक पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बावणेर, प्रशांत वैद्य, प्रदीप कुचनकर, संतोष बावनकुळे, प्रितम इंगळे, प्रशांत मानमोडे यांनी केली.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश बूब यांनी शासकीय निवासस्थान पारिजात या बंगल्यात लाचेची रोख रक्कम स्वीकारली. बंगल्याच्या झडतीत वेगवेगळ्या लिफाफ्यात ६ लाख ४० हजारांची रोख रक्कम मिळाली. शासकीय बंगल्यात भ्रष्टाचाराचा पारिजात बहरला होता. त्यातील पैशाची फूले वेचण्याचा मोह अखेर अंगलट आला. आता प्रकाश बूब याच्या संपत्तीची चौकशी केली जाणार आहे. काहींनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ मार्च या आर्थिक वर्ष अखेर बांधकाम विभागातील देयकांची रक्कम काढण्यापोटी मागील २९ मार्चपासूनच लाच स्वीकारण्याचा सप्ताह बूब यांनी सुरू केला होता. त्या लाचखोरी सप्ताहाचा समारोप ६ एप्रिलरोजी सकाळी सव्वा अकरा वाजता पोलिसांच्या कारवाईने झाला.
——