पैठण (शिवनाथ दौंड) – पैठण उपविभागीय अधिकारी डॉ. नेहुल पाटील यांच्या पथकाने अवैध दारू विक्रीविरोधात मोहीम चालवली असून, आज तिसर्या दिवशी देशीदारूची वाहतूक करणार्या एका इसमास जेरबंद करत, त्याच्याकडून मोटरसायकलसह अवैध देशी दारू जप्त करण्यात आली.
पैठण ते पाचोड रोडवर नांदर फाटा ता. पैठण येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी महेश कारभारी जायकर (वय २४) रा. टाका डोणगाव ता. अंबड जि.जालना हा स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशिरित्या मोटरसायकलवर प्रोव्हीशन गुन्ह्याचा माल देशी दारु भिंगरी संत्राच्या १८० एम. एलच्या एकूण १४४ बाटल्या किंमत अंदाजे १४,४०० रुपये चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगतांना व वाहतूक करतांना मिळून आला. त्याच्याकडून एक मोटार सायकल किंमत ५० हजार रुपये व १४,४०० रुपये असा एकूण ६४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पाचोड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम ६५ (ई), ८१ म.दा.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई ही पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया सर, एएसपी पवन बनसोड सर, डीवायएसपी डॉ. नेहुल पाटील सर यांच्या मार्गदर्नाखाली पोना सचिन भूमे, सोनवणे, पोना अरुण जाधव, गणपत भवर यांनी पार पाडली आहे.