पैठण (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील बाबु नुरहुसेन शेख यांच्या गट ३२२ मध्ये शेतात बांधलेली गोर (बछडा) बांधलेला होता. या बछड्यावर गुरुवारी रात्री अ़ज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला केल्याने बछडा मरण पावला. सकाळी सदरील शेतकरी शेतात गेला असता त्यांच्या ही बाब लक्षात आली. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत झालेल्या बछडाला बघितले व परिसरात पाहणी केली असता परिसरात बिबट्याचेच ताजे ठसे आढळून आले.
याच परिसरात होणाबाची वाडी येथे मंगळवारी गाईच्या वासरू जखमी केले होते, ही घटना ताजी असताना ब्राह्मणगाव येथे बछडाचा फडशा पडला आहे. या घटनेने आडूळ परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात बिबट्याच्या वावर असून, या करिता परिसरातील नागरिकांनी सावध रहावे व रात्री घराबाहेर पडू नये, आपले पशुधन सुरक्षित जागी बांधावे व सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. वनविभागाने लवकरात लवकर या बिबट्याच्या शोध घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकडून होत आहे.