बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – लम्पी या त्वचारोगाच्या प्रादुर्भावाच्या काळात राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असलेले एच. पी. तुम्मोड यांची बुलढाण्याचे नवे जिल्हाधिकारी म्हणून तडकाफडकी बदली झाली आहे. लम्पी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्यांनी शंभर टक्के लसीकरण मोहीम हाती घेतली होती. परिणामस्वरूप, राज्यात कमीत कमी जनावरांच्या जीवितहानीत हा रोग आटोक्यात आणण्यात राज्य सरकारला यश आले आहे. परंतु, पद निवडश्रेणीत अवनत करून त्यांची बुलढाणा जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आज त्यांच्या बदलीचा आदेश निघालेला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहाता, राज्य सरकारने काही महत्वपूर्ण बदल्यांचा सपाटा लावला होता. दोन दिवसांपूर्वी सनदी अधिकार्यांच्या बदल्यांचा मोठा मेमो झाला असतानाच, आज अचानक बुलढाण्याचे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची बदली करण्यात आली, तसेच राज्याच्या दुग्धविकास आयुक्त पदावरून एच.पी.तुम्मोड यांनाही हटविण्यात आले. विशेष म्हणजे, लम्पी साथरोग नियंत्रणात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली असतानादेखील त्यांची बदली झाली आहे. एस. राममूर्ती यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्ह्यात वाळूतस्करी बेफाम झाली होती, याबाबतचे सविस्तर वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वारंवार प्रकाशित केले होते. तसेच, आतादेखील अतिवृष्टी व परतीच्या पावसाने जिल्ह्यात शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असताना, अजूनही महसूल विभागाकडून पंचनामे हाती घेण्यात आले नव्हते. चिखलीचे तहसीलदार येळे हे तर अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही, असे सांगून शासनाच्या विशेष बाबीच्या निकषालाही टाळत असल्याचे दिसून आल्याने, राममूर्ती यांची प्रशासनावर पाहिजे तशी पकड दिसून आली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बदलीने जिल्हावासीयांना फारसे आश्चर्य वाटले नसले तरी, दुग्धविकास आयुक्त पदावर राज्यभर चांगले काम करणारा अधिकारी अचानक निवडश्रेणीत अवनत करून जिल्हाधिकारी पदावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील बिलोली येथील असलेले तुम्मोड यांनी यापूर्वी परभणी येथे उपजिल्हाधिकारी, अकोला व हिंगोली येथे अप्पर जिल्हाधिकारी, नाशिक येथे रोजगार हमी योजनेचे उपायुक्त, तसेच, अकोला येथे विभागीय जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे. कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.