Breaking newsHead linesMaharashtraMumbai

ऐन दिवाळीत एसटीची भाडेवाढ, गुरुवारपासून एसटीचा प्रवास महागणार!

मुंबई (प्राची कुलकर्णी) – ऐन सणासुदीत राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) भाडेवाढ जाहीर करून राज्यातील सणासुदीला घरी जाणार्‍या चाकरमान्यांसह भाऊबिजेला माहेरी जाणार्‍या लेकीबाळींचा खिसा कापला आहे. महामंडळाने २० ऑक्टोबरपासून पाच रुपयांपासून ते ७५ रुपयांपर्यंतची दरवाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे. दिवाळीसाठी एसटीच्या १४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या गाड्या धावणार आहेत.

भाऊबीज, लक्ष्मीपूजनानिमित्ताने अनेकजण गावी प्रवास करतात. एसटी थेट गावात सोडते, त्यामुळे एसटीने प्रवास करणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र प्रवाशांकडे दुसरा पर्याय नसल्याने अतिरिक्त पैसे मोजून एसटीनेच प्रवास करावा लागणार आहे. महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार, गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि.२०.१०.२०२२ व २१.१०.२०२२ रोजीच्या मध्यरात्री बारानंतर नंतर प्रवास सुरु करणार्‍या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे, त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापि, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विद्यार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. १ नोव्हेबरपासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील, असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!