Uncategorized

लहान मुलांना, पडू द्या, खेळू द्या। खाऊ द्या, पिऊ द्या मनसोक्त।।

बालअवस्था आणि जराअवस्था या दोन अवस्था जीवनाचे दोन टोकं आहेत. या टोकांवर असताना ‘सांभाळावे कसे’?, याचे मार्गदर्शन निष्काम कर्मयोगी संत शुकदास माऊलींनी केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात वैज्ञानिक आधार तर आहेच, पण समाजप्रबोधनाची तीव्र मनिषादेखील आहे.

खेळ हा मुलांना त्यांच्या जीवनात सर्वोच्च प्रकारचा आनंद देत असतो. खेळल्याने लहान मुलांच्या वृत्ती उल्हसित होतात. खेळ खेळल्याने बालकांचा शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक असा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्यास मदत होत असते. परंतु आज लहान मुलांचे खेळणे, बागडणे हरवून गेले आहे. बालकांचे खळखळून हसणे, मस्ती करणे हळूहळू लयास जात आहे. आज पारंपरिक खेळण्यांची, मैदानांची, गोष्टींची, मित्रांची जागा संगणक, टीव्ही आणि मोबाईल या यंत्रांनी घेतली आहे. मोबाईल हातात घेतल्याशिवाय मुले जेवण करीत नाहीत. यंत्रांनी लहान मुलांचा संपूर्णपणे ताबा घेतला आहे. गेममधील सततच्या युद्धात्मक घटनांमुळे लहान मुले हिंसक बनत आहेत. त्यांच्या कोवळ्या मनावर प्रचंड आघात होत आहेत. त्यांचे शारीरिक, भावनिक आणि मानसिक भरणपोषण नीट होत नसल्याने मुले चिडचिडी, रागीट आणि संवेदनशून्य बनत चालली आहेत. बालकांमधील मनोरुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्या नैसर्गिक जगण्याला बाधा आली आहे. त्यांच्या बाल मनाची जडण घडण यंत्र करीत असल्याने यांच्याकडून आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, ममता, संवेदनशीलता आणि माणुसकी यांची अपेक्षा करणे अज्ञानाचे लक्षण ठरेल.

प्रगतीच्या नावाखाली आज संपूर्ण मानव जात एवढ्या गंभीर संकटात सापडली असताना याचे मात्र कुणाला काही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. संत महात्म्यांचे जीवन मात्र समाजाच्या कल्याणासाठीच असते. जेव्हा जेव्हा समाजावर संकटे कोसळतात तेव्हा तेव्हा संत महात्मे धावून येताना दिसतात. संत हे संवेदनशील असतात.त्यांच्याकडे दूरदृष्टी असते. अशीच प्रचिती बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांच्या ‘अनुभूति’ ग्रंथातील अभंगातून येते. संत शुकदास महाराज मनुष्याच्या आरोग्याच्या संदर्भात अतिशय गांभीर्याने विचार करतात. माणसाचे आरोग्य हा महाराजांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आस्थेचाचा विषय राहिला आहे. शारीरिक आणि मानसिक व्याधी हेच मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे महाराज सुचवू पाहतात. त्यासाठी महाराजांनी आयुष्यभर रुग्णसेवेसाठी आपला देह झिजविला. बालपणापासून ते वृद्धपकाळापर्यंत लहान मुलांच्या जडणघडणीची महाराज काळजी करतात. आपल्या ‘अनुभूति’ग्रंथातील ४९७ क्रमांकाच्या अभंगात महाराज म्हणतात की,

लहान मुलांना, पडू द्या,खेळू द्या । खाऊ द्या,पिऊ द्या, मनसोक्त।।
जसजसे वय, वाढत राहते।कमी होत जाते, सर्व त्याचे।।
तारुण्यात फार, जोराने चालतो। शेवटी दमतो, वृद्धपणी।।
शुकदास म्हणे, वेळ गेल्यावर।बसे जाग्यावर, ‘एका जागी’।।

लहान मुलांना खेळण्यास प्रवृत्त करा. त्यांना खेळाचे महत्त्व पटवून द्या. खेळताना ते पडतील पुन्हा उठून उभे राहतील. लहान मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यांना योग्य पोषण आहार दिला पाहिजे. जेणेकरून मुले निरोगी व सुदृढ राहतील. त्यांना मनसोक्त जगू द्या.मुलांचे वय जसजसे वाढत जाते तसतसे त्यांचे खेळणे, खाणे, पिणे आपोआप कमी होत जाते. तारुण्यात मनुष्याला प्रचंड गती असते. त्या गतीच्या जोरावर त्यांची प्रगती होते. शेवटी मनुष्याच्या शरीराला काही मर्यादा आहेत. त्याला म्हातारपण येतं. संत शुकदास महाराज म्हणतात, आता वेळ निघून गेलेली असते. म्हातारपणी माणूस क्षीण होऊन एका जागेवर बसतो. म्हणून लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. वेळीच लहान मुलांच्या शारीरिक, मानसिक विकासाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. वेळ निघून गेल्यावर काहीही उपयोग होणार नाही. असे महाराज सुचवितात. आजच्या वर्तमान काळात लहान मुलांचे आरोग्य अतिशय धोक्यात सापडलेले असताना महाराजांचे विचार अतिशय महत्त्वपूर्ण ठरतात. यंत्राच्या तावडीत सापडलेले कोवळे जीव वाचविण्यासाठी महाराजांचा सल्ला महत्त्वाचा ठरत आहे. संत शुकदास महाराजांच्या ‘अनुभूति’ ग्रंथातात याच आशयाचा ४९६ क्रमांकाचा आणखी एक अभंग आढळून येतो, महाराज म्हणतात,

उतार वयात, ठेवा काठी हाती। असावे सोबती, प्रवासाला।।
सावरेना तोल, पडण्याचा धोका।येतसे अनेका, अनुभव।।
देहातील हाडे, ठीसूळ झाल्याने।मोडून जुटणे, अवघड।।
शुकदास म्हणे,रक्त कमी पडे।जाई मेंदूकडे, फार कमी।।

माणसाचे वय झाले की शरीर कमकुवत होते. मग त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो. प्रवासात चालताना काठीची मदत घ्यावी. उतारवयात मनुष्य आपले संतुलन हरवून बसतो. पडण्याची भीती जास्त असते. म्हातारपणी असे अनुभव अनेकवेळा येतात. बालवयाच्या तुलनेत म्हातारपणी माणसाच्या शरीरातील हाडे ठिसूळ बनतात.यावयात जर हाड मोडले तर ते पुन्हा नव्याने जुटणे अवघड असते. शुकदास महाराज म्हणतात, म्हातारपणी शरीरातील एक एक एक अवयव कमकुवत होत जातात. रक्ताचा पुरवठा मेंदूकडे योग्य प्रमाणात होत नाही. त्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. वरील अभंगातून संत शुकदास महाराजांच्या आरोग्यविषयक वैज्ञानिक दृष्टिकोणाचे दर्शन घडते. मनुष्याने अधिक काळजी घ्यावी असा सल्ला महाराज देतात्ा. आजच्या धावपळीच्या युगात माणसाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. लहान मुलांच्या आरोग्याची पाहिजे तशी काळजी घेतल्या जात नाही. वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही. बालक आणि वृद्ध परावलंबी असतात.त्यांचे जीवन इतरांवर अवलंबून असते. आज हे दोन्ही वयोगट भयंकर संकटात सापडलेले आहेत. या संकटातून त्यांची मुक्तता करण्यासाठी निष्काम कर्मयोगी संत शुकदास महाराजांचे विचार महत्त्वपूर्ण ठरतात. महाराजांचा आधुनिक काळातील युवक आणि वृद्धांच्या आरोग्य विषयक योगदानाचा खरा पाया वरील विचारात दिसून येतो.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक, व्याख्याते व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आहेत. संपर्क – ९९२३१६४३९३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!