– जास्तीत जास्त गोरगरिब रूग्णांनी लाभ घ्यावा : नंदकिशोर मापारी
लोणार (वाजेद खान) – केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त लोणार येथील ग्रामीण रुग्णालय येथे ५ बेडचे डायलेसिस सेंटर सुरू करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन आज पार पडले. यावेळी शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, माजी शिवसेना शहरप्रमुख अशोक वारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. लोणार तालुक्यासह आजूबाजूच्या किडनी विकारग्रस्त रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन याप्रसंगी शिवछत्र मित्रमंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केले.
मापारी म्हणाले, की किडनी विकारग्रस्त रूग्णांना डायलेसिससाठी मोठ्या शहरात जावे लागते. त्यांना ह्या उपचारासाठी खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्चसुद्धा लागतो. परंतु केंद्रीय आयुष व आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा माणून त्या अनुषंगाने रूग्णांच्या सेवेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामध्ये लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण यंत्र (डायलिसिस)ची निशुल्क सुविधा सुरू करण्यात आली आहे. यासाठी माजी आमदार डॉ.संजय रायमूलकर यांनीसुद्धा पाठपुरावा करून हे यंत्र मंजूर करून घेतले आहे. तरी तालुक्यासह आजूबाजूच्या परिसरातील जास्तीत जास्त रूग्णांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नंदकिशोर मापारी यांनी याप्रसंगी केले.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारी म्हणाले, की या परिसरात किडनी विकाराचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळून येत असल्याने लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात मूत्रपिंड रक्त शुद्धीकरण (डायलिसिस)ची सुविधा आज केंद्रीय आयुष व आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आली आहे. जेणे करून गरजू गरीब रुग्णांना बाहेरगावी जाऊन उपचार करण्याची आता गरज पडणार नाही, व त्या उपचारासाठी पैसेसुद्धा खर्च करण्याची आवश्यकता नाही. ही सेवा पूर्णतः निशुल्क देण्यात येणार आहे, तरी जास्तीत जास्त रूग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. भुसारी यांनी केले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.सचिन गाडेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.फिरोज शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मृती बोरा, डॉ.जयेश मापारी, डॉ.जय आघाव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव मापारी, डॉ. कविता मापारी, डॉ.निखिल अग्रवाल, डॉ. समाधान ढाकणे, विजय नरवाडे, मंगला वायाळ, संतोष मोरे, पूजा दुतोंडे, शीतल कंकाळ आदी उपस्थित होते.