Head linesMEHAKARVidharbha

मेहकरचा चिरेबंदी ‘प्रतापगड’ तीस वर्षानंतर ढासळला; गुलाल, निळही बेरंग!

- ७२ वर्षानंतर सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने मिळाला आंबेडकरी अनुयायी आमदार!

– १९५२ मध्ये लक्ष्मणराव गवई होते, मेहकरचे पहिले बौध्द आमदार!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – तब्बल तीन दशकांपासून अभेद्य असलेला मेहकर हा शिवसेनेचा ‘प्रतापगड’ दि. २० नोव्हेंबररोजी झालेल्या चुरशीच्या विधानसभा निवडणुकीत धडाधड ढासळल्याचे दिसले. येथून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नवखे सिद्धार्थ रामभाऊ खरात यांनी मातब्बर डॉ.संजय रायमुलकर यांचा पराभव करत, घासून निवडून आले आहेत. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे निळी, गुलाब हा मुद्दाच यादरम्यान कालबाह्य ठरल्याचे दिसून आले. या निमित्ताने तब्बल ७२ वर्षानंतर सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने मेहकरला आंबेडकरी अनुयायी आमदार मिळाला आहे. यापूर्वी १९५२ मध्ये मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील बौध्द समाजाचे स्मृतीशेष लक्ष्मणराव थकूजी गवई हे मेहकरचे आमदार म्हणून निवडून आले होते.

May be an image of one or more people, temple and crowdमेहकर विधानसभा तसा शिवसेनेचा गड. केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते प्रतापराव जाधवांच्या एकहाती नेतृत्वामुळे तो ‘प्रतापगड’ म्हणूनही परिचित आहे. नव्वदच्या दशकात धर्मवीर स्वर्गीय दिलीपराव रहाटे यांनी विशेषतः या मतदारसंघात शिवसेना जोमाने वाढवली. मार्च १९९० मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर खा. प्रतापराव जाधव यांनी या चळवळीला खतपाणी घातले. १९९० ची विधानसभा निवडणूक हरल्यानंतर १९९५ पासून सलग तीनवेळा आताचे केंद्रीय मंत्री असलेले प्रतापराव जाधव येथून सलग तीन पंचवार्षिक आमदार राहिले. दरम्यान, मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर २००९ पासून येथे डॉ. संजय रायमुलकर हे सलग चढत्या मताधिक्याने तीन टर्म आमदार राहिले आहेत. म्हणजे तब्बल ३० वर्षापासून येथे शिवसेनेची म्हटल्यापेक्षा प्रतापसेनेचीच एकहाती सत्ता राहिली असल्याने, त्यांचा आत्मविश्वास सहजिकच बळावत गेला. त्यामुळे सध्याच्या विधानसभा निवडणुकीतही हा गड आपण सहज शाबूत ठेवू, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
यादरम्यान सनदी अधिकारी राहिलेले सिद्धार्थ खरात यांनी प्रशासकीय नोकरीचा राजीनामा देत, मेहकर विधानसभा निवडणुकीत उडी घेतली. त्यासाठी त्यांनी गेल्या तीन महिन्यात नियोजनबद्ध आखणी केली. विशेष म्हणजे, महाविकास आघाडीत ही निवडणूक धर्मवीर स्वर्गीय दिलीपराव राहाटे यांच्या नावाभोवतीच फिरताना दिसली. यासाठी त्यांचे पुत्र शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे, मेहकर शहरप्रमुख किशोर गारोळे, तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, आकाश घोडे या शिवसेना ठाकरे गटाच्या शिलेदारांसह महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आता जिंकायचेच, अशा ठाम विश्वासाची खूणगाठ बांधत एकजुटीने निवडणूक लढली. विशेष म्हणजे, या निवडणुकीत मराठा समाजही स्वयंस्फूर्तीने खरात यांच्या पाठीशी एकवटला तर बौद्ध समाजानेही, समाज यावेळीही ‘वंचित’ राहील, या धाकधुकीने ‘वंचितला’ सोडचिठ्ठी देत ‘सिलिंडर’ रिकामाच ठेवल्याचे दिसून आले. May be an image of 5 people and crowdतर या निवडणुकीत निळी, गुलाल हा यापूर्वीच्या निवडणुकीतील कळीचा मुद्दाही कालबाह्य झाल्याचे दिसून आले. दरम्यान, डॉ. संजय रायमुलकर यांना ही निवडणूक एकतर्फी वाटत असतानाच, त्यांच्याविरोधात मात्र मतदारसंघातील जनतेनेच निवडणूक हाती घेतल्याचे चित्र दिसून आले. परिणामी, एकीचे ‘बळ ‘याप्रमाणे या निवडणुकीत प्रशासनात निपुण पण नवखे राजकारणी असलेले सिध्दार्थ खरात यांचा भाजपलाटेतही घासून विजय झाला. सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने तब्बल ७२ वर्षानंतर आंबेडकरी अनुयायी मेहकरचा आमदार झाला आहे. यापूर्वी १९५२ मध्ये अर्थात महाराष्ट्र स्थापनेच्या अगोदर सीपी अँड बेरार हा मध्यप्रदेशशी संलग्न प्रांत अस्तित्वात असताना, मेहकरमधून तालुक्यातील जानेफळ येथील स्मृतीशेष लक्ष्मणराव थकोजी गवई हे बौद्ध समाजाचे शेड्युल कास्ट फेडरेशनवर आमदार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे, आमदार होण्याअगोदर व नंतरही त्यांनी मेहकर तहसील कोर्टात दस्तलेखक म्हणून काम पाहिले असल्याची माहिती आहे. त्यावेळी द्विसदस्यीय पद्धत होती. तर खुल्या प्रवर्गातून देऊळगाव साखरशा येथील स्वर्गीय आनंदराव मारोतराव देशमुख हे निवडून आले होते. May be an image of 1 person and templeविशेष म्हणजे तेव्हा खामगाव हा विधानसभा मतदारसंघ होता व त्यामध्ये मेहकर तालुक्याचा समावेश होता. तसेच लोणार, सिंदखेडराजा हे तालुकेसुध्दा अस्तित्वात नव्हते. तर या तालुक्यांचाही मेहकर तालुक्यातच समावेश होता. यानंतर मेहकरमधून टी. एल. कंकाळ हेसुद्धा बौद्ध समाजाचे आमदार झाले होते, अशी माहिती आहे. एवढ्या भल्या मोठ्या कालखंडानंतर सिद्धार्थ खरात यांच्या रूपाने आंबेडकरी अनुयायी मेहकर विधानसभेचा आमदार झाल्याने विशेषतः आंबेडकरी समाजात आनंद ओसंडून वाहताना दिसत आहे.


गद्दारी व खुद्दारी, वाढती बेरोजगारी, दर्जेदार शिक्षण संस्थांची उणीव, आरोग्याच्या समस्या, प्रलंबित एमआयडीसी, लोणार विकास आराखडा, नाते व खुटातील लोकांना ठेकेदारी, मेहकर बसस्थानक, वाढती महागाई, शेतमालाला कवडीमोल भाव, शेतीपंपाला तोकडी वीज, पेनटाकळी कालवा यासह विविध मुद्द्यांवर या निवडणुकीत महाविकास आघाडीने रान उठविल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, शेतकरी प्रश्न ऐरणीवर असताना शेतकरी चळवळीतील नेते मात्र सिलिंडरचे काम करताना दिसले. लोकसभेला चांगली मते घेणारे नेते सोबत असतानाही वंचित आघाडीच्या उमेदवाराला दोन हजारांच्या आसपासच मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मेहकर पेटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला!

मेहकर शहरात दंगलीची शक्यता, मनाई आदेश लागू; नगरपरिषद हद्दीतील सीमाही सील!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!