आळंदीत मंगळवारी कार्तिकी एकादशी; लाखो भाविक अलंकापुरीत दाखल
- हैबतरावबाबा दिंडीची मंदिरासह नगरप्रदक्षिणा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तीर्थक्षेत्र आळंदीत मंगळवारी ( दि.२६ ) श्रीचे ७२९ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी हरीनाम गजरात साजरी होत आहे. राज्य परिसरातून या सोहळ्यासाठी लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. प्रारंभी श्री गुरु हैबतरावबाबा यांचे दिंडीची मंदिर आणि नगर प्रदक्षिणा परंपरेने जयघोषात झाली. भाविकांच्या अखंड हरिनामाने अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
सोहळ्यात श्रीना पवमान अभिषेक, दुधारती, महानैवेद्य,धुपारती झाली. चारच्या सुमारास श्री गुरु हैबत राव बाबा यांचे दिंडीने मंदिर आणि नगर प्रदक्षिणा हरीनाम गजरात पूर्ण केली. उद्या मंगळवारी ( दि.२६) सोहळ्यात कार्तिकी एकादशी साजरी होत आहे. यानिमित्त पहाटे पवमान अभिषेख, दुधारती, ११ ब्रम्हव्रुन्दाचे वेदमंत्र जयघोष, श्रीना महानैवेद्य, श्रीचे पालखीची नगर प्रदक्षिणा, धुपारती,परंपरेने ह.भ.प. संतोष महाराज मोझे यांचे वतीने हरिजागर सेवा रुजू होणार आहे. आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, पुणे महसुल, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत आळंदी आणि दिघी पोलिस अधिकारी कर्मचारी वृंद, राज्य शासन आरोग्य विभाग सेवा, वीज महावितरण सेवा, विविध सेवाभावी संस्था यांचे वतीने भाविक – नागरिक यांचे साठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.आळंदी मंदिर, इंद्रायणी नदीघाट परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधी ठरली. आळंदीत नदी किनाऱ्यासह शहरात सार्वजनिक आणि खाजगी संस्थानच्या मोकळ्या असलेल्या ठिकठिकाणी जागावर राहुट्यांमधून भजन, कीर्तन, प्रवचन वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरांचे पालन करीत सुरु झालेले आहे. शहरात फिरताना हे ऐकू येत आहे. आळंदीत स्वच्छता गृहात पाण्याची सोय करून दिल्याने भाविकांची प्रशासनाने प्रभावी व्यवस्था ठेवल्याचे दिसत आहे.
प्रदक्षिणा रस्ता आणि गोपाळपुरा, जुना आणि नवीन पूल परिसरात वारकऱ्यांचे गर्दीने रस्ते फुलले आहेत. इंद्रायणीत स्नान केल्यानंतर भाविक माउलींच्या समाधी दर्शनासाठी मंदिराकडे जात होते. भक्ती सोपान पूल दर्शन बारीतून मोठी रांग लागली होती. सकाळी भाविकांची श्रींचे चल पादुकांवर महापूजेची लगबग होती. इंद्रायणी घाटावर, देऊळवाड्या बाहेर मठ, धर्मशाळा मध्ये वारकऱ्यांचे खेळ रंगले होते. वारकऱ्यांनी दिंड्यातून नगर प्रदक्षिणा केली. वारकऱ्यांचा आनंद भक्ती ओसंडून वाहत असताना कार्यक्रमांतून दिसून आले. माउलींचे मानाचे पालखी सोहळ्यासह दिंड्या चे आगमन झाले असून श्रीचे दर्शनासाठी भाविक गर्दी करीत होते. दुपारनंतर दर्शनास मंदिरात गर्दी वाढली. मंदिरात रविवारी ( दि. २४ ) वीणा मंडपात बाबासाहेब देहूकर, वास्कर महाराज यांचे तर्फे कीर्तन सेवा झाली. तत्पूर्वी पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाली. सोमवारी ( दि. २५ ) परंपरेने पहाटे पवमान अभिषेक, दुधारती भाविकांचे चल पादुकांवर महापूजा, महानैवेद्य, वीणा मंडपात गंगूकाका शिरवळकर, धोंडोपंत दादा अत्रे, वास्कर महाराज, वाल्हेकर महाराज यांचे वतीने कीर्तन सेवा होणार आहे. आळंदी देवस्थान, आळंदी नगरपरिषद कार्तिकी सोहळ्यात भाविकांचे स्वागतास सज्ज झाले असून यावर्षी श्रींचा भव्य रथोत्सव द्वादशी दिनी होणार आहे. यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आळंदीत पोलीस प्रशासनाचे वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांचे आरोग्य सुस्थीर राहावे यासाठी आरोग्य सेवा देखील सज्ज असून मोठ्या प्रमाणात औषध साठा ठेवण्यात आला आहे. आळंदी शहरात भाविकांचे सोयीसाठी ९ ठिकाणी आरोग्य सेवा केंद्रे विकसित करण्यात आली आहेत. या केंद्राचे उदघाटन रुग्ण कल्याण व हक्क समितीचे संचालक डी. डी. भोसले पाटील यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. उर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे आदी उपस्थित होते.
आळंदीत माऊलींचे वैभवी पूजा साहित्यास झळाळी!
आळंदी कार्तिकी यात्रेसाठी माउली मंदिरातील श्रींचे चांदीचे पूजा साहित्य, भांडी, चांदीचे दोन पालख्या, प्रभावळ, श्रींचा मुख्य गाभारा, श्री सिद्धेश्वर मंदिर चांदीची आभूषणे, पालखी आदींना पॉलीस करून नवी झळाळी देण्यात आली. यासाठी पुण्यातील विजय ज्वेलर्स मधील कारागिरांनी मोफत सेवी रुजू केली असल्याची माहिती व्यवस्थापक माउली वीर, बल्लाळेश्वर वाघमारे यांनी दिली. यासाठी सेवाभाव जपत कारागिरांनी विनाशुल्क सेवा रुजू केली. यासाठी विजय ज्वेलर्सचे आशिष उदमवेर्णेकर, संतोष पवार, महेश मैंड, गजन्ना दहिवाळ, दिनेश आरणेकर, प्रभू पोतदार यांनी परिश्रम पूर्वक सेवा रुजू केली.