आज रात्री किंवा सकाळी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शपथविधी उद्या!
- शपथविधीसाठी राजभवनातील तयारी पूर्ण; देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; रात्री साडेदहा वाजता शाहांना भेटणार
– फडणवीसच मुख्यमंत्री, शिंदे-पवार यांना उपमुख्यमंत्रीपद!
मुंबई (खास प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण? याची घोषणा आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत होणार आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे रात्रीच नवी दिल्लीला रवाना होत असून, रात्री साडेदहा वाजता ते केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असून, एकनाथ शिंदे व अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपद सांभाळणार आहेत.
राज्य विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊन ४८ तास उलटून गेले तरी महायुतीने सत्तास्थापनेचा दावा दाखल केलेला नाही. दुसरीकडे, राजभवनाने मात्र शपथविधीची तयारी पूर्ण करून ठेवली आहे. कोणत्याही परिस्थितीत २६ नोव्हेंबरपूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक असल्याने उद्या रात्री १२ वाजेपूर्वी नवे मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाने शपथ घेणे गरजेचे आहे. महायुतीत एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला निश्चित केला गेला असून, सर्वाधिक जागा भाजपकडे असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब झालेले आहे, असे भाजप सूत्रांचे म्हणणे आहे. तीनही पक्षांचे उद्या सहा ते सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, त्यासाठी जोरदार लॉबिंग आज दिवसभर सुरू होती.
दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे) पक्षाने विधानपरिषद व विधानसभा अशा दोन्ही सदनांचा नेता निवडला असून, भास्कर जाधव यांना शिवसेनेचे गटनेते निवडण्यात आले आहे. तर सुनील प्रभू यांना चीफ व्हीप नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणुकीतील दारूण पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या नेतृत्वाकडे राजीनामा दिला होता. परंतु, पक्ष नेतृत्वाने तो अद्याप स्वीकारलेला नाही.
देवेंद्र फडणवीस अडिच वर्षांकरिता मुख्यमंत्री; नंतर भाजपचे अध्यक्ष!