मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषण वाचायला सुरुवात करताच लोकं उठून गेले!
– सोशल मीडियावर शिंदेंची वाचून भाषणाची जोरदार खिल्ली
मुंबई (प्राची कुलकर्णी) – मुंबईत शिवाजीपार्क आणि बीकेसी मैदान येथे पार पडलेल्या दोन मेळाव्यांत शिंदे गटाची गर्दी जास्त होती, असा आकडा पोलिसांकडून आला आहे. परंतु, शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले भाषण वाचायला सुरुवात करताच, अध्यापेक्षा जास्त गर्दी मैदान सोडून निघून गेली. याबाबत विरोधकांनी तर टीका केलीच आहे, पण सोशल मीडियावरही शिंदे गटाची जोरदार खिल्ली उडविली जात आहे. भाड्याने आणलेली माणसे भाषण न ऐकताच निघून गेली, अशी टीका सोशल मीडियावर रंगली होती.
काल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिलाच दसरा मेळावा होता. मुंबईत बुधवारी झालेली दोन दसरा मेळावे पाहता उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला १ लाख तर मुख्यमंत्री शिंदेंच्या मेळाव्याला दीड लाखाची गर्दी होती, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शिवाजी पार्कची क्षमता ही ८० हजारांची आहे. तर बीकेसी मैदानाची क्षमता १ लाख इतकी आहे. शिंदे गटाकडून मैदानावर ३ लाख लोकांची जेवण्याची व्यवस्था केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना सभेसाठी जमलेले कार्यकर्ते उठून जात असल्याचा प्रकार बीकेसी मैदानावर पाहायला मिळाला. अनेक लोक एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना अर्ध्यातून निघून गेले.
एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना अनेकजण घरी निघाले#Shivsena #UddhavThackarey #EknathShinde #shivajipark #शिवसेना #दसरामेळावा #शिवाजीपार्क #MaharashtraTimes pic.twitter.com/iXEAzdCe4A
— Maharashtra Times (@mataonline) October 5, 2022
दुसरीकडे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवतीर्थावरील मेळाव्याला पोलिसांनी एक लाखाची सांगितली असली तरी, प्रत्यक्ष दीड लाखापेक्षा जास्त गर्दी असल्याचा अंदाज शिवसेनेकडून वर्तविण्यात आला आहे. शिवाय, हा मेळावा उत्स्फूर्त तर झालाच पण उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घणाघाती भाषणाने चांगलाच गाजला. या दसरा मेळाव्यातून पुन्हा ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दरवर्षी ‘रावण दहन’ केले जाते. एक प्रतिकात्मक पुतळा जाळला जातो. पण यावेळी शिवाजीपार्कवर ठाकरे गटाने ५० खोके असलेला रावणाचा प्रतिकात्मक पुतळा उभारला होता. उद्धव ठाकरे यांनी त्याला ‘खोकासूर’ म्हटले. खोकासूरावर ५० हा आकडा लिहिलेला होता. उद्धव ठाकरेंचे भाषण संपताच या ‘खोकासूरा’चे दहन करण्यात आले.
—————