खासदार प्रतापराव जाधव यांची संसदीय माहिती-तंत्रज्ञान स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – थेट ‘मातोश्री’वर शंभर खोक्यांचे आरोप करणारे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांची संसदेच्या माहिती-तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. शिंदे गटाला केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने यानिमित्ताने केंद्रात महत्वाचे स्थान दिले आहे. काही दिवसांपूर्वीच प्रतापराव जाधव यांनी ‘मातोश्री’वर शंभर खोके जात असल्याची टीका केली होती. नंतर त्यावर त्यांनी सारवासारवही केली होती. त्यानंतर लगेचच मोदी सरकारने खा. जाधव यांना संसदीय समितीची बक्षिसी दिली आहे. याआधी काँग्रेसचे नेते शशी थरूर हे या समितीचे अध्यक्ष होते.
मेहकर येथील पालकमंत्र्यांच्या सभेत, काही दिवसांपूर्वी खासदार प्रतापराव जाधव म्हणाले होते की, १०० खोके मातोश्री ओके, सचिन वाझे १०० कोटी रुपयांची वसुली करुन ‘मातोश्री’वर पोहोचवत होता, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे मोठी राजकीय खळबळ माजली होती. यासर्व प्रकारानंतर प्रतापराव जाधव यांनी आपल्याला तसे म्हणायचे नव्हते म्हणत, सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता.
संसदेच्या स्थायी समितीत काही महत्त्वाचे बदल केंद्र सरकारकडून करण्यात आले आहेत. या बदलांमध्ये शिंदे गटालाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले. माहिती आणि तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी प्रतापराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अतिशय विश्वासू असलेले प्रतापराव जाधव यांनी यानिमित्ताने केंद्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. खासदार जाधव यांचे निकटवर्तीय असलेले आमदार संजय गायकवाड व संजय रायमुलकर हे दोन आमदार पहिलेच शिंदे गटात दाखल झाले होते. यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनीदेखील शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले होते. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी खासदार जाधव यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदावरून हकालपट्टी केली होती. तर एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या गटाच्यावतीने जिल्हा संपर्कप्रमुख नियुक्त केलेले आहे.
—————-