आळंदी – वणी ( अर्जुन मेदनकर ) : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे नवरात्रोत्सवाच्या दशमी निमित्त श्री सप्तशृंगी देवीची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी देसाई यांनी सपत्नीक पूजा केली. सप्तशृंगी देवीला नवीन सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले आले होते.
गडावरील पुरोहितांच्या मंत्रघोषात सकाळी ७ वाजता देवीची महापूजा करण्यात आली. प्रसंगी आमदार राम शिंदे, विश्वस्त संस्थेचे विश्वस्त बंडू कापसे, विश्वस्त अॅड. ललित निकम, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा विभाग प्रमुख यशवंत देशमुख यांच्यासह विविध विभाग प्रमुख, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग तसेच ग्रामपंचायत व रोप वे पदाधिकारी उपस्थित होते.
परंपरेने सालाबाद प्रमाणे अश्र्विन नवमीस सप्तशृंगगडावर नवमीच्या दिवशी शतचंडी याग व होमहवन विधी सुरू करून त्याची पूर्णाहुती दशमीच्या दिवशी बोकड बळीच्या विधी नंतर पुरोहितांच्या मंत्रघोषात बळीची आहुती देवून दसऱ्याचा अदभुत सोहळा परंपरेने पार पडला. बोकड बळीच्या विधीवत पुजेसाठी सरपंच नांदुरी, सप्तशृंगगड, विश्वस्त संस्था व परंपरेचे मानकरी यांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या प्राप्त सूचनेनुसार पूजाविधी पार पडला. स्थानिक ग्रामस्थ व भाविकांनी सदर प्रक्रिया राबविताना विशेष सहकार्य केले. पूर्णाहुती प्रसंगी संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, ध्वजाचे मानकरी गवळी परिवार सदस्य, बोकड बळी मानकरी, विश्वस्त तथा कळवण तहसीलदार बंडू कापसे, विश्वस्त् अॅड. ललित निकम, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सप्तशृंगगड ग्रामपंचायत सरपंच रमेश पवार आदी उपस्थित होते. प्रसंगी विश्वस्त संस्थेचे व्यवस्थापन व प्रशासकीय प्रतिनिधी, कर्मचारी, पुजारी, रोप वे कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील आलेल्या तब्बल २५ हजार भाविकांच्या उपस्थितीत मंदिर गजबजून गेले होते. यावेळी संपूर्ण गडावर भाविक ‘सप्तशृंगी माता की जय, बोल अंबे माते की जय’चा मोठ्या आवाजात जयघोष करत होते. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या प्रसादालयात सुमारे ५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मौजे सप्तशृंगगड येथील स्थानिक रहिवाशांना दसरा निमित्ताने विशेष दर्शन उपलब्ध करून देण्यात आले. भाविकांना सुरक्षित दर्शन घेण्यासाठी ट्रस्टच्या मार्फत व्यवस्था करण्यात आली. नवरात्र उत्सवासाठी पुरोहित वर्ग, सर्व ट्रस्ट कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, यांसह जिल्हा पोलीस व महसूल प्रशासन विभाग आदी विशेष परिश्रम घेतले.