– हा देश आता हुकुमशाहीकडे चाललाय, लोकांनी सावध रहावे; उद्धव ठाकरेंचा इशारा!
– एकनाथ तुला आमदार, मंत्री केला, आता तुला शिवसेनाप्रमुख व्हायचयं, तुझी लायकी आहे का ? : उद्धव ठाकरे
– शिवाजीपार्कवर उसळला जनसागर; शिंदे गटाच्या मेळाव्यातील खाण्याची चंगळ सोडून शिवसैनिक शिवाजीपार्कवर आले, सोबत आणलेली चटणीभाकरी खाऊन उद्धव ठाकरेंची सभा ऐकली!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – मला साथ द्या, मी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, अशी साद आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिक आणि उभ्या महाराष्ट्राला घातली आहे. शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर आज शिवसेनेचा दसरा मेळावा प्रचंड गर्दीत आणि सळसळत्या उत्साहात पार पडला. यावेळी ठाकरे यांनी शिवसेना बंडखोरांचा जोरदार समाचार घेतला. तसेच, भाजपलादेखील चांगलेच फटकारून काढले. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपर्यात शिवसैनिक आले होते. तिकडे बीकेसीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला आलेल्या लोकांना खाण्यापिण्याची चंगळ केली गेली असताना, इकडे मात्र राज्यभरातून आलेल्या शिवसैनिक व मराठी माणसांनी सोबत आणलेली चटणी-भाकरी खावून उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी उदंड गर्दी केली होती.
या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, की देशातली लोकशाही जिवंत राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालाय. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले की शिवसेना संपत चालली आहे. देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे. तेव्हा, मला साथ द्या मी पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन, बरं झालं बाडंगुळे आपल्यातून निघून गेले, असे म्हणत ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. तुम्ही साथ आणि सोबत द्या, मी तुम्हाला पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेल, बांडगुळं छाटली गेली ती बरंच झाले, अशा शब्दांत त्यांनी शिंदे गटाला फटकारले.
ठाकरे पुढे म्हणाले, आज मोहन भागवत म्हणाले स्त्रीशक्ती आणि पुरुष यांच्यात समानता असायला हवी. पण त्यांना मला विचारायचंय, महिला शक्तीचा आदर ठेवताना उत्तराखंडमध्ये पवनी नावाच्या जिल्ह्यात अंकिता भंडारी नावाच्या १९ वर्षांच्या मुलीचा खून झाला. तिथे एका रिसॉर्टच्या बाजूला तिचा मृतदेह आढळला. ते रिसॉर्ट भाजपाच्या स्थानिक नेत्याचं आहे. हा महिलाशक्तीचा आदर? तो हॉटेलमालक त्या अंकिताला येणार्या-जाणार्यांसोबत काही करण्यास सांगत होता. तिने नकार दिला. झाला तिचा खून. कुठे आहे महिला शक्तीचा आदर? बिल्किस बानो गुजरात दंगलीमध्ये गर्भवती होती. तिच्यावर बलात्कार झाला. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या चिमुकलीचा खून करण्यात आला. आरोपी शिक्षा भोगत होते. गुजरात सरकारने त्यांना सोडून दिलं. एवढंच नाही, गावी गेल्यावर त्यांचा स्वागत सत्कार केला. या गोष्टी तुमच्या पक्षात घडत असतील, तर इतर लोक महिलाशक्तीचा काय आदर राखणार? असे रोखठोक सवालही ठाकरे यांनी रा.स्व. संघ आणि भाजपला केले.
मुंबईत शिवसेनेला जमीन दाखवा म्हणतात. आम्हाला जमीन बघायचीच आहे, अमित शाह आम्हाला जमीन दाखवा. पण जमीन पाकिस्तानची जमीन जिंकून दाखवा. पाकव्याप्त काश्मिरमधील एक इंच जमीन घेता आलेली नाहीये. पाकव्याप्त काश्मिर घेऊन दाखवा आम्ही डोक्यावर घेऊन नाचू. माझे सैनिक तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील. तिकडे शेपट्या घालायच्या आणि इकडे पंजे काढायचे. आम्हाला गुजरातबद्दल आक्षेप नाही. मुंबईतही बरेचसे गुजराती आहेत. मोठमोठे प्रकल्प गुजरामध्ये चालले आहेत. पुष्पा म्हणतो झुकेगा नही साला आणि हे उठेगाच नही साला…. अशी यांची गत आहे… आम्ही काँग्रेससोबत गेलो, म्हणून हिंदुत्व सोडलं म्हणता. मग पाच वर्ष आम्ही तुमच्यासोबत होतो. त्यात कसं जाऊन अशोक चव्हाणांना जाऊन भेटले होते, हा त्यांनी गौप्यस्फोट केला आहेच. पण आम्ही सोबत असतानाही औरंगाबादचं संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशीव केलं नाही. पण ते काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत असताना मी करून दाखवलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र डागताना ठाकरे म्हणाले, यांच्या घोषणांची अतिवृष्टी आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असं हे सरकार आहे. म्हणून मला चिंता नाहीये. मी लढणार्या पित्याचा लढणारा मुलगा आहे. पहिल्या दिवसापासून मी शिवसेनेवर आलेली संकटं बघत मोठा झालो आहे. आजही माझ्या हातात काहीच नाहीये. माझ्यासोबत चालायचं असेल, तर निखार्यावर चालण्याची तयारी हवी. जसं मी माझ्या पित्याला वचन दिलं होतं की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन, तसंच मी तुम्हाला वचन देतोय.. तुमच्या मनातल्या या आगीतून उद्या हिंदुत्वाचा वणवा पेटणार आहे. त्यात सगळ्या गद्दारांची गद्दारी भस्मसात होणार आहे. तुम्ही साथ द्या, मी पुन्हा तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन. रावणाने संन्याशाचं रुप घेऊन सीतेचं हरण केलं होतं, तसं हे तोतये बाळासाहेबांचा चेहरा लावून शिवसेना हडपायला आले आहेत. शिवाजी पार्क मिळू नये म्हणून हे मागे लागले. कोर्टात िनकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री म्हणतात जर मी लक्ष घातलं असतं, तर यांना हे मैदान मिळालं नसतं. काय बापाची पेंड आहे तुमच्या? गद्दार तर आहेतच. आता धनुष्यबाण हवं, बाळासाहेब हवेत, शिवाजी पार्क हवं.. घेऊन जाणार कुठे? माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी माझ्यासमोरचा माईक खेचला नव्हता. माझ्या कानात माझं उत्तर सांगितलं नव्हतं. काँग्रेस-राष्ट्रवादीनं मान-सन्मान देऊन आपली सोबत केली आहे. सरकार झालं, तेव्हा अनेकांनी सांगितलं की ते काँग्रेस बघा..काहीतरी गडबड आहे. शरद पवार तुम्हाला माहिती आहे.. नीट लक्ष ठेवा हे अडीच वर्ष त्यांच्याकडे लक्ष ठेवता ठेवता हेच निघाले.. मग गद्दार कोण? मी शिवरायांच्या साक्षीनं आणि आई वडिलंच्या शपथ घेऊन सांगतो…अडीच वर्षांचा शपथविधी असं ठरलं होतं. तेव्हा सांगितलं संभव नही. मग आता कसं काय जमलं. माणसाची हाव किती असते…एकनाथ तुला आमदार, मंत्री केला तरी तुला शिवसेना पक्षप्रमुख व्हायचंय. आहे का लायकी तुझी लायकी, बाप चोरणारी औलाद….माझ्याऐवजी दुसर्या वडिलाचं नाव लावतोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हणून फटकारले. शिंदे-फडणवीस सरकारला १०० दिवस झाले. मात्र या १०० दिवसांमधले ९० दिवस हे दिल्लीला मुजरा करायलाच गेले असा टोलाही त्यांनी शिंदे सरकारला लगावला.
गेले काही दिवस होणार की नाही होणार, या वादात पडलेला शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा अखेर तुडुंब गर्दीत पार पडला. त्याला लोटलेली गर्दी बघून नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. कुणाच्या सभेला जास्त गर्दी होणार याविषयी चढाओढ लागल्याचे दिसून येत होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा होती. एकनाथ शिंदे यांनी तर राज्यभरातून येणार्या कार्यकर्त्यांसाठी भरपेट सामिष जेवणाची सोय केली होती. साडेतीन लाख वडापाव, याशिवाय चहा, स्नॅक, सँडविचदेखील उपलब्ध होते. परंतु, तरीही सोबत आणलेली चटणी-भाकरी खाऊन मराठी माणसाने व कट्टर शिवसैनिकांनी शिवाजीपार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या सभेली गर्दी केली. शिवाजी पार्कवर लोटलेला जनसागर पाहाता, शिंदे सरकारच्या उरात धडकी भरेल, असे चित्र निर्माण झाले होते.
——————–