संघर्ष करणे आमच्या रक्तात, मी आता २०२४च्या तयारीला लागले आहे; पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य
सावरगाव (जि. बीड)/ विशेष प्रतिनिधी : जे गोपीनाथ मुंडेंचे विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली, त्यांच्यावर मी बोलले नाही, कधी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, खालच्या पातळीवर टीका केली नाही. कुणी काही चुकले तर त्या व्यक्तीवर बोलायला संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही, असे सांगून, हा मेळावा चिखल फेकणार्यांचा नाही, चिखल तुडवणार्यांचा आहे. चिखल तुडवणे, संघर्ष करणे आमच्या रक्तातच आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी केले. मी आता कोणतीही अपेक्षा करणार नाही. मी आता २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे सांगून, त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला इशारा दिला. भगवान भक्तीगड सावरगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात विचारांना मोकळी वाट करून दिली. यावेळी त्यांनी राजकीय संघार्षाचा पाढा वाचला. गोपिनाथ मुंडेपासून सुरु झालेला संघर्ष कायम असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. भाषणाच्या सुरूवातील ‘पंकजा ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी आवाज दणाणून गेला, त्या पुढे म्हणाल्या की, पोलिसांनी शांततेने घ्यावे, सगळे जण शांत बसले आहे. समोर बसलेले पाच जण आता शांत बसतील, धिंगाणा करण्याची ही जागा नाही. आज दसरा मेळावा आहे, या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून लाखो मुंडे समर्थक आले आहे. नाशिक, शिर्डी, सिंदखेडराजा, औरंगाबाद सगळ्याच ठिकाणाहून आपण आला आहात. मी देवीकडे मागणी करते की, देवीने जसे जन्माला घातले स्वाभिमानीच्या पोटी, तसे स्वाभिमानाने मरणाला जाऊ दे. मेळावा म्हटले तर आरोप होते, चिखलफेक होते, मी मीडियावाल्यांना म्हटले हा चिखलफेक करणारा नाही तर चिखल तुडवणार्यांचा मेळावा आहे. त्यामुळे चिखल तुडवणे आणि संघर्ष करणे हे रक्तात आहे. हकीकत को तलाश करणार पडता है, अफवा ये तो घर बैठे बैठे मिल जाती है, हीच हकीकत आहे, असे त्या म्हणाल्या.
आता आमदारांची यादी आली तर माझे नाव घेऊ नका, असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी कोणावरही नाराज नाही. मी का नाराज होऊ? मोठ्या मोठ्या लोकांना राजकारणात संघर्ष आला आहे. योग्य वेळेची वाट बघा. मी आता २०२४ च्या तयारीला लागली आहे. मला कोणताही गर्व नाही, मी स्वाभिमान आहे. मी तुम्हाला असत्य कधीही बोलणार नाही. सत्य अस्वस्थ होत पण पराजित होत नाही, असेही पंकजा मुंडे-पालवे यांनी सांगितले.
पंकजा मुंडे या भाजप नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेवर उमेदवारी न मिळाल्याने, तर कधी राज्यातील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांच्या नाराजीबाबत तर्कवितर्क लावले गेले. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाही,’ असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये यापूर्वी केले होते. त्यामुळे त्या आज काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते. सभेपूर्वी पंकजा मुंडे यांच्यावर जेसीबीतून फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी गाडीत त्यांच्यासोबत त्यांच्या कनिष्ठ बहीण यशस्वी मुंडेही होत्या. तर व्यासपीठावर अहमदनगरचे खासदार सुजय विखे, महादेव जानकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित हाेते.
भगवान बाबांपासून ते गोपीनाथ मुंडे सर्वांनी संघर्ष केला. चाळीस वर्षाच्या संघर्षात फक्त साडेचार वर्ष मला सत्ता मिळाली हा संघर्ष काय कमी आहे? मी संघर्षाला घाबरत नाही. शिवरायांचा पराक्रम, भगवान बाबांची सात्विकता हीच माझी प्रेरणा आहे. संघर्ष हा महत्त्वाचा आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाही. संघर्षाशिवाय नाव होत नाही. जोडे उचलणाऱ्यांचं नाव होत नाही. संघर्ष हा महत्त्वाचा आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
—————