इस स्वच्छंद जगत में जन्मे,
फिर कैसा यह बंधन है..
रोना और ठोकर खाना,
क्या यही हमारा जीवन है!
पानी फेरा मर्यादा पर,
मान और अभियान लुटाया..
इस जीवन में कैसे आए,
आने पर भी क्या पाया!!
श्रध्देय अटलजींच्या या काव्यपंक्ती जीवनातला निराशावाद दूर करुन आशावादाची मुहूर्तमेढ रोवतात. ‘संघटन गढे चलो, सुपंथ पर बढे चलो.. भला हो जिस में देश का, वो काम सब किए चलो।’ ही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच. म्हणून जिथं आहे तिथून, जे करत आहात त्यात कामातून, कुठलाही ‘आव’ न आणता समाजकार्याचा ‘भाव’ न खाता सत्कार्य करत राहणं.. हीच खरी संघनिष्ठा. तिच ‘संघ’टीतपणे करुन आपल्या वैचारीक पुर्वजांनी लावलेलं पैशाचं झाड, वटवृक्ष होतांनाही त्या सावलीला माऊलीचा दर्जा देत.. प्रत्येक फांदीचं मूळात रुपांतर करत करत त्याचा कळस रचणारे, सतिश भगवानदास गुप्त.. सत्वनिष्ठच!
वारसा जन्मानं मिळतो, पण तो वसा पुढे चालविण्यासाठी कर्तृत्वाचा ठसा उमटावा लागतो. भगवानदास गुप्त यांची ‘संघ’ हीच जीवनगाथा होती. १९२५ला नागपूरला स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विस्ताराच्या कामात चिखली शहराचं लाखमोलाचं योगदान. त्या संक्रमण काळात भगवानदासजी नगर संघचालक, पुढे ते प्रांत संघचालक बनले. ओघानेच संघाची शिस्त, कर्तव्याचे पालन अन् ध्येयवादी वाटचाल गुप्त घराण्यात रुजलेलीच. त्याच काळात ६ ऑक्टोबर १९५६ रोजी सतिशभाऊंचा जन्म, बालपणापासूनच संघ जीवनाचा ‘प्रभाव’ त्यांच्यावर पडत गेल्याने आयुष्यात विचारांचा ‘अभाव’ त्यांना कधी जाणवलाच नाही. मात्र त्यांची नाळ जुळून राहीली शेतीतल्या मातीशी, म्हणून शिक्षणही बी.एस्सी. कृषी पदविकेपर्यंत.
महाविद्यालयीन जीवनात सतिशभाऊंमधील नेतृत्वाची चमक दिसली. १९७९ ते १९८२ तो काळ, इंदिरा गांधींमुळे काँग्रेसचाच होता. डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातही एनएसयुआय.चा बोलबोला होता, तिथे अभाविप.चे पॅनल उभे करुन सतिशभाऊ स्वत:ही लढले.. अन् कृषी विद्यापीठात विद्यार्थी परिषदेच्या विजयाचा झेंडा रोवल्या गेला. पुढे त्यांनी हेच संघटनात्मक कौशल्य पक्षीय पातळीवर भारतीय जनता पक्षातही दाखवले. १९९५ला सौ.रेखाताई खेडेकर या नवख्या उमेदवाराची धुरा त्यांनी चिखली विधानसभा मतदार संघात आपल्या समर्थ खांद्यावर यशस्वीपणे पेलली होती. कृषी पदविका घेवून सतिशभाऊंनी शेती हा व्यवसाय म्हणून स्विकारत, कोरडवाहू शेतीमध्ये फलोत्पादनाचे यशस्वी प्रयोग केले. विदर्भातही द्राक्षाची बाग पुâलू शकते, हे त्यांनी १९८२लाच दाखवून दिले. सेंद्रीय पध्दतीने बागायती डाळींबाची लागवड करुन, २००३ला विदर्भात ‘भगवा’ डाळींब शेतीचा आरंभ करत ५० एकरावर ते व्यवस्थापन आजतागायत सुरु आहे. उपचारात्मक रेशीम शेती व पशुसंवर्धन अभ्यासक्रमासह नवीन शेतकऱ्यांसाठी शास्त्रोक्त वैज्ञानिक दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी डाळींब रोपण व संगोपन आदींबाबत कार्यशाळा आयोजन व व्यवस्थापन केले आहे.
शेतीच्या सातत्यपुर्ण विकासासाठी कृषी संलग्न क्षेत्रांवर सतिशभाऊंचा भर असून, पाणलोट विकास व जलसंधारण यासह नदी खोलीकरण व महिला बचतगट यावर ते स्वयंस्पुâर्तीने काम करतात. ग्राम गोदरीच्या नदी खोलीकरणासह जलसंधारणासाठी १० गावे दत्तक घेवून पाणलोट विकास प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्याबद्दल महाराष्ट्र शासनाद्वारे ‘पाणलोट मित्र’ म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. महिला बचतगटातील २५ हजार महिलांना स्वावलंबी बनवितांनाच, राज्यातल्या ७ जिल्ह्यांमध्ये महिला सक्षमीकरणाचे काम त्यांनी केले आहे.
सामाजिक क्षेत्रात त्यांचाही प्रवास म्हणजे, संघ हीच जीवनगाथा. भाजयुमो.चे प्रदेश कार्यकारीणी सदस्य, भाजपाचे सक्रिय सदस्य, विदर्भ प्रांत सहमंत्री म्हणून विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी, सहकार भारतीचे प्रदेशाध्यक्ष.. अशा विविध पदांवर त्यांच्या संघटनात्मक कार्याचा ठसा उमटला आहे. मात्र ‘सतिशभाऊ’ हे नाव जे राज्यभर झालं ते ‘चिखली अर्बन’ या बँकेमुळे.. अन् त्या बँकेतील विविध कल्पक योजना, तंत्रज्ञानावर आधारीत सुधारणा, सामाजिक उपक्रम अन् सर्वात महत्वाचं म्हणजे कमावलेला विश्वास.. यामुळेच. दि चिखली अर्बन को-ऑप. बँकेचे १९९४ पासून संचालक व २००७ पासून अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळल्यावर ‘चिखली अर्बन हाच श्वास व ध्यास’ ठेवून सहकारातील चळवळी त्यांनी बँकेच्या माध्यमातून राबवत असतांना ‘ग्राहक हाच केंद्रबिंदू’ समजून काम केले. प्रभावी वसुली प्रक्रिया अंमलात आणून चिखली अर्बनला आजारी बँक वर्गवारीतून सशक्त बँक वर्गवारीत आणले. अत्याधुनिक बँकींग सेवा, हे तर चिखली अर्बनचे वैशिष्ट्यच त्यांनी ठेवले. त्यामुळेच विदर्भातील पहिली नागरी सहकारी बँक असणाऱ्या दि चिखली अर्बन को-ऑप.बँक लि.चिखलीचा २३ सप्टेंबरला ५७वा वर्धापन दिन असून, १९६१च्या स्थापनेपासून बँकेला ऑडीट ‘अ’ वर्ग मिळत आला आहे. संपुर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असणाऱ्या चिखली अर्बनच्या अनेक शाखा कार्यरत असून बुलडाण्यासह विदर्भातील अकोला व वाशिम, मराठवाड्यातील जालना व औरंगाबाद तर खान्देशात नाशिक व जळगाव जिल्ह्यात बँकेचा विस्तार झाला आहे. सध्या चिखली अर्बन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अंतर्गत काम करत असून, त्या माध्यमातून ३६२ मंजूर प्रकरणांना १० कोटीचे कर्ज वाटप केले आहे.
सतिशभाऊ रमतात मात्र ते काळ्या मातीत हिरवं स्वप्नं पुâलवतांनाच. म्हणून महाराष्ट्रातील कृषीक्षेत्राचा विकास हे त्यांचं स्वप्न असून, त्यासाठीच्या ज्या संकल्पना आहेत त्यात.. आर्थिकदृष्ट्या स्वयंपुर्ण कृषी विद्यापीठे स्थापन करणं, वैज्ञानिक व उद्योग समन्वय साधणं, मधमाशी पालन, रेशीम उत्पादन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन, टिश्युकल्चर, जैविक खत उत्पादन, सेंद्रीय शेती, जैविक पुनर्वापर इत्यादी अल्प कालावधी अभ्यासक्रम व सेमीनारचे आयोजन करणं, स्नातक-स्नातकोत्तर व पीएच.डी. विद्यार्थी वैज्ञानिकांना उद्योग आणि प्रगतीशील शेतीसाठी प्रोत्साहीत करणं, संशोधक व विस्तारकांमधील समन्वय वाढवणं, शेतकरी व उद्योजक यांना अनुकूल तंत्रज्ञान विकसीत करणाऱ्या शास्त्रज्ञांना प्रोत्साहीत करणं, सी.एस.आर. अनुदान खाजगी क्षेत्रातून एस.ए.यु.ला मिळवून देणं, एस.ए.यु.च्या कार्यकारी परिषदेत सुधारणा आणि आय.सी.ए.आर.ने सुचविलेल्या आदर्श कृतीची अंमलबजावणी करणं, एस.ए.यु.ने नमूद केलेल्या निकषानुसार खाजगी कृषी महाविद्यालयाने कृषी तंत्रज्ञान शाळांकरीता काटेकोर उपाय योजना करणं, मासिक शेतकरी व वैज्ञानिक आणि विस्तार कार्यात्मक वैज्ञानिक संवाद कार्यक्रम राबविणं.. सतिशभाऊंचा हा कृषी विषयक दृष्टीकोन स्वप्नवत जरी असलातरी साकारला जाणारा आहे.
सतिशभाऊंचा आज 67वा वाढदिवस. सतिशभाऊ संघाचे असलेतरी ते कडवट नाहीत, सर्वच राजकीय पक्षात व विविध विचारधारेत मित्रांचा गोतावळा वृध्दींगत करणारा हा ‘द्रष्टा माणूस’ आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करतांना त्यांच्या चिखली अर्बन बाबतीतल्या शिस्तीला अनुसरून आठवतो, संत कबिराचा हा दोहा..
कबीरा खडा बाजार में, माँगे सब की खैर..
ना काँहू दोस्ती, पर ना काँहू सें बैर!
(श्री राजेंद्र काळे हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी असून, ब्रेकिंग महाराष्ट्रचे संपादकीय सल्लागार आहेत.)