KOLHAPURPachhim Maharashtra

कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही विजयादशमी दसरा सोहळा उत्साहात

कोल्हापूर (शिवानी प्रभावळे) – परंपरेची साक्ष देणारा कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा उत्साहात पार पडा आहे. या दसरा महोत्सवाला छत्रपती शिवाजी महाराजांची शाही परंपरा आहे. हा सोहळा संपूर्ण जगासमोर यावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने या सोहळ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून, पुढील वर्षापासून विविध माध्यमातून एक कोटी रूपये निधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. देशभरात दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एक म्हैसूर त्यानंतर कोल्हापुरात साजरा होणारा दसरा सोहळा संस्थानकाळातील परंपरेची आजही साक्ष देतो. त्यामुळेच हा सोहळा पाहण्यासाठी अवघे कोल्हापूर या ठिकाणी येत असतात. खरं तर कोल्हापुरातील हा सोहळा देशभरात एक प्रमुख सोहळा म्हणूनही ओळखला जातो. यावर्षी हा सोहळा दोन दिवस पार पडला गेला. तर पुढच्या वर्षीपासून शासनाच्या सहभागाने तीन दिवस सोहळा पार पडणार आहे.

नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजेच विजयादशमी या दिवशी कोल्हापूरातल्या दसरा चौकामधील मैदानात भव्य दिव्य असा शाही दसरा सोहळा पार पडला. याला अनेक वर्षांची परंपरा आहे. आजही येथील छत्रपती घराण्याने ही परंपरा जपली असून, तोच उत्साह आणि शानदार सोहळा इथले नागरिक अनुभवतात. या सोहळ्यात हत्ती, घोडे, उंट आदीसह मोठा लवाजमा घेऊन छत्रपती घराणे या सोहळ्यात सहभागी होतात. आजही तोच उत्साह, राजेशाही थाट आणि सोहळ्याची परंपरा जपली गेली आहे.

सध्या यामध्ये काळानुसार काही बदल झाले आहेत. पूर्वी जुना राजवाडा येथून शाही लवाजमा निघायचा. आता न्यू पॅलेस येथून छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य यामध्ये श्रीमंत शाहू छत्रपती, युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे आणि यशराजे हे एका ‘मेबॅक’ मोटारीतून या सोहळ्याला येत असतात. त्यांचे बँड पथकाने स्वागत केले जाते. पूर्वी हाच सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जात होता. या सोहळ्याची भव्यता आणि उंची ही तितकीच मोठी होती. यामध्ये करवीर निवासिनी अंबाबाईची पालखी सोबतच भवानी देवीसह गुरू महाराज यांची पालखी असते. पालखीसोबत सर्वच मानकरी, इनामदार, जहागीर, अधिकारी आदींची यामध्ये उपस्थिती होती. सायंकाळच्या सुमारास ही मिरवणूक निघाली. साडेसहा वाजण्याच्या सुमारास दसरा चौक येथे ही मिरवणूक आली. समोर ट्रॅफिक पोलिस, छत्रपती घराण्यातील सर्वच सदस्य, मानकरी आदी सर्वजण पारंपरिक पोशाखात सोहळ्यात सहभागी होते. हवेत बंदूकीच्या गोळ्या झाडत त्यांचे स्वागत करण्यात आले. ते आल्यानंतर शमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर काही क्षणातच सोने लुटण्यासाठी कोल्हापुरकरांची एकच झुंबड उडाली. छत्रपती घराण्यातील सदस्य कोल्हापूरवासीयांना सोने देत दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पालखी आणि छत्रपती सर्वजणच पुन्हा परत न्यू पॅलेसकडे रवाना झाले. कोल्हापूर आणि शाही दसरा सोहळा हे एक वेगळंच समीकरण पाहायला मिळत आणि ते याही वेळेस पहायला मिळाले.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!