Uncategorized

फुकेट (थायलंड) : सागरी सौंदर्याचा अविष्कार, निसर्गनिर्मित औदार्याचा चमत्कार!

स्वर्ग मेल्यानंतरच दिसतो, असं म्हणतात. पण स्वर्गातील सौंदर्य कसं असेल? हे जीवंतपणी बघायचं असेलतर नितांत सुंदर फुकेटला जावून या.. .. फुकेटला जावून आलोयं नुकताच, अन् साठवून आलोय डोळ्यात सौंदर्य, स्वच्छता अन् स्वयंशिस्त. ११ सप्टेंबरच्या पहाटे मुंबई विमानतळावरुन टेकऑफ झालेलं विमान प्रतिघंटा ८५० किलोमीटरच्या वेगानं ४ तासात ४००० किलोमीटरचा हवाई प्रवास करुन सकाळी १० वाजता फुकेट इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँड झालं, तेंव्हा भारतात सकाळचे साडे८ वाजले होते. मलय द्वीपकल्पावरील एक बंदर म्हणजे फुकेट, थायलंडमधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक. राजधानी बँकॉकपासून ८६२ किलोमीटर दूर.

खाली उतरण्यापुर्वीच विमान फुकेटला राऊंड मारत होतं तेंव्हा, आता आपण पृथ्वीवर नव्हेतर स्वर्गावर उतरणार.. असा अलौकीक सौंदर्याचा साज दिसत होता. एअरपोर्टवरील कमालीची शांतता, अगदी विनम्रतेने होणारी चेकींग अन् इंटरनॅशनल फॉर्मलीटीज काही वेळातच पुर्ण झाल्यानंतर, ‘मॅक हॉलीडेज’च्या वतीने आलेली बस आमची वाट पाहतच उभी होती. ‘गुड मॉर्निंग’ या हळूवार तेवढ्याच लांबवार शब्दांनी आमची गाईड ‘फती’नं आमचं आदरानं ‘वेलकम’ केलं. गाडीनं एअरपोर्ट सोडत असतांनाच फती भारतीयांना समजेल, अशा इंग्रजीतूनच फुकेट अन् या टूरबद्दल माहिती सांगत होती.. गुळगुळीत अन् चकचकीत रस्त्यावरुन गाडी धावत असतांनाच, आजूबाजूचं निसर्गसौंदर्य मनाला भुरळ घालत होतं. ‘हॉटेल मरीना’चं चेक-इन दुपारी २ वाजता असल्यानं, रस्त्यावरच असणाऱ्या एका दुर्मीळ संग्रहालयाला भेट अन् पुढे एका इंडीयन रेस्टॉरन्टमध्ये दुपारचं लंच नियोजीत होतं. सातासमुद्रापल्ल्याड असूनही जेवणाची चव बदलली नाही, याचं समाधान झालं. नंतर हॉटेल गाठलं, आंघोळ-पांघोळ करुन तर कोणी बाथटबमध्ये इसळून-पासळून फ्रेश झालं.. वरच्या मजल्यावर स्विमींग टँक विथ बारही होता. संध्याकाळी साडे५ वाजता आम्ही निघालो सनसेट पॉईंटकडे. तो डोंगरमाथ्याचा प्रवास पुन्हा मनाला भुरळ घालणारा. समुद्रापल्ल्याड अस्ताला जाणारा सूर्य, समुद्राच्या पश्चिम भागावर त्याची पसरणारी अथांग लाली.. ‘जिथे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते..’ या गाण्याची प्रत्यक्ष अनुभूती देणारी.. बाजूला छोट्या-छोट्या टेकड्यांवर सजलेली कॉफी-स्नॅक्स, बिअरची कॅफे..मला तिथले लव्ह-बर्डस्, कपल्स अन् मजा मारण्यासाठी आलेले पर्यटक.. पण कुठेच गोंधळ नाही, सर्वत्र विलक्षण स्तब्धता.. सारंच विलोभनीय!

पुन्हा ‘मोती महल’ला रात्रीच्या डिनरसाठी प्रस्थान, बाजूलाच लेडी-बॉईजचा चालू असणारा कॅब्रे.. अन् नंतर फुकेटमधील पहिलीच रात्र असल्याने नाईटलाईफ काय असते? या शिगेला पोहचलेल्या उत्कंठेत बँगलॉ स्ट्रीटकडं वळलेली पाऊले. मात्र भारतातल्या रेड लाईट एरियासारख्या वखवखलेल्या नजरा इथं नसतात, जे काही असतं ते प्रचंड प्रामाणिक. इथलं नाईटलाईफ कॉर्पोरेट तेवढंच को-ऑपरेटीव्ह बिझनेस कल्चरचा एक अविभाज्य भाग. ‘फुकेट रातभर सोता नही..’ ते या स्ट्रीटवर गेल्या-गेल्याच दिसतं. फुकेट परिसरात स्त्रीयांचं प्रमाण ६० ते ६५ टक्के, ३५ ते ४० टक्के पुरुष त्यातलेही २५ ते ३० टक्के शीमेल. त्यात भर अनेक देशातून या व्यवसायासाठी फुकेटमध्ये आलेल्या महिला.. त्यामुळे अनेकजण फुकेट म्हटलं की, त्याच नजरेनं या शहराकडे पाहतात. मूळात वस्तुस्थिती खूप वेगळी असते.. ‘नजर को बदलो, नजारें बदल जायेंगे.. सोच को बदलो, किनारे बदल जायेंगे..’ हे १० टक्के लौकीक सौंदर्य.. रोमँटीक होवून पहा, तुम्हाला ते अँटीक वाटेल.. तसं इथं प्रत्येक ठिकाणी महिलाच आघाडीवर, म्हणून स्त्रीत्वाला नमस्कार.. पण वेगळाच विचार करून पाण्यावर तरंगणाऱ्या या अलौकीक सौंदर्यावर पाणी सोडू नका!

दुसरा दिवस होता, क्रिस्टल या स्वच्छ अन् चमकत्या पाण्याच्या समुद्र किनाऱ्याच्या सफारीचा. बोटीतून सुरु झालेला सागरी प्रवास अथांग समुद्राची अनुभूती देत-घेत ताडाच्या झाडांनी वेढलेल्या या बेटावर पोहचवतो, ‘छे समुद्रात काय पोहायचं?’ असा म्हणणाराही स्विमींग कॉस्ट्यूममध्ये समुद्राच्या निळ्याशार लाटांवर निवांतपणे तरंगू लागतो. किनाऱ्यावर मुलायम रेतीत लोळणं तर कधी लाटांशी स्पर्धा करतं पोहणं सुरु असतांनाच, निघायची वेळ होते अन् जड पावलांना बोटीकडं वळावं लागतं. पुन्हा शंभरच्या स्पीडनं दुसऱ्या बेटाकडं बोट धावते, अन् तो विस्तीर्ण समुद्र कवेत घेत घेत प्रत्येक ठिकाणचं वेगळं वैशिष्ट्य असणाऱ्या तीन बेटांची सफर दुसरा दिवस पुर्ण करुन जातो. रात्री पुन्हा एक इंडीयन रेस्टाँरंट, तिथं अगदी लाल मिरच्या भाजून कुटलेली चटणी अन् लोणचं तर सोडाच बरणीतला खार.. तर नॉनव्हेजवाल्यांसाठी खड्या मसाल्यातले विविध मेन्यू.. सोबत ज्याला वाटेल ते ब्रँड.. जिभेचे चोचले पुरवणं काय असतं? याची चविष्ट अनुभूती!

तिसरा दिवस पुन्हा समुद्र सफारीचा, अशाच नितांतसुंदर बेटांच्या भेटींचा.. नितळ पाण्यात तरंगत असणाऱ्या रंगी-बेरंगी माशांमध्ये मिसळून जाण्याचा, बस्सं लाईफजॅकेट घालून ऑक्सीजन मास्क लावला की थेट समुद्रात झोकून द्यायचं स्वत:ला. आधी धास्ती असते, पण मग भिती निघून जाते.. ‘बस्स समंदर में नहाके नमकीन’ होवून जाण्याची ती सकाळ. फांग नगा बेट, फिद्वीप सारं सारं सारंच अवर्णनीय. इथलं प्रत्येक आयलँड आय म्हणजेच डोळ्यांनाही विश्वास बसणारं नाही इतका अप्रतिम. समुद्राच्या तळाशी असणारं जग बघायचं असेलतर स्कुबा डायविंग.. तिथ शार्क, ऑक्टोपस अन् अन्य रंगीबेरंगी मासे.. समुद्राची रंगतदार दुनिया म्हणजेच फुकेट.

जेम्स बाँड या जगविख्यात भेटीचा चवथा दिवस, जेम्स बाँड सिरीजमधील ‘मॅन इन द गोल्डन गन’ या भागाची शुटींग या बेटावर झाली असल्याने, याला ‘जेम्स बाँड’ असं नाव पडलं. बंदरावरुन या बेटाकडं जाण्याचा प्रवास खुल्या नावेनं सुरु होतो, तो तसाच का? हे ज्यावेळी ती छत नसलेली बोट पुढे-पुढे सरकू लागते.. तेंव्हा तेंव्हा प्रत्येक क्षणाला त्याचे उत्तर उलगडत जाते. तसा हा प्रवास अथांग समुद्राच्या विस्तीर्ण बॅकवॉटरमधून पुढे-पुढे चालणारा.. त्यामुळे या प्रवासात बोटीला लाटांचा अडथळा नसतो, नाव चालत राहते अन् आपण आपलं नावही काय आहे? हे सुध्दा विसरायला लागतो आजूबाजूचं सौंदर्य पाहून. ‘काय झाडी-काय डोंगार अन् याच प्रवासात दुपारच्या जेवणासाठी समुद्राच्या पाण्यावर तरंगणारी ती मुस्लीम वास्तुकलेचा आदर्श नमुना असणारी काय ती हाटील..’ हे ‘एकदम ओक्के’ बघायचं असेलतर पृथ्वीवरच्या ७० टक्के भागावर पाणी आहे, याची अनुभूती देणारा हा प्रवास. ही सागरी सफर, की स्वर्गातली सफर.. हेच कळत नाही. चिमटा घेवून बघावंतर, हे स्वप्न नाही.. सत्य असल्याची प्रचिती येते. जेम्स बाँड बेटावर पोहचताच, बाजूचा महाकाय पर्वत अक्षरश: अंगावर पडणार की काय? असा हलतांना व झुकतांना दिसतो. या बेटावर पडणारं प्रत्येक पाऊल नवा-नवा साक्षात्कार घडवणारं व चमत्कार दाखवणारं. इथला खोल समुद्र किनारा तेवढ्याच उंच-उंच पर्वतरांगा, खडकाचं प्रत्येक टोक नैसर्गिक अविष्कारच, त्यावर नैसर्गिकपणे बाहेर आलेलं इथली राष्ट्रीय प्रतिके म्हणजे हत्ती अन् ती अर्ध्या तासाची इवल्याशा नाजूक नावेतली नयनरम्य बोटींग.. अरे वर्णन तरी कसं कळणार? खरंतर कितीही फोटा काढा, तुम्ही २ टक्केही भाग चित्रबध्द करु शकत नाही.. तो शब्दबध्द होणंतर अशक्यच!

परतीचा प्रवास भावविभोर सायंकाळचा, मात्र तोही घेवून जातो अदभूत अशा फॅन्टसी शो कडे. काहीच कमी नाही, थिएटरचा दिव्य परिसर.. त्याआधी त्या भव्य रेस्टॉरंटमध्ये खाणं-पिणं अन् नंतर रात्री ८ वाजता त्या महाकाय थिएटरमध्ये होणारा प्रवेश. कुठून चमकणारे कसलेही लाईटस् अशी अप्रतिम प्रकाश अन् ध्वनीयोजना.. तो विशाल रंगमंच अन् ठिक साडे८ वाजता सरकत जाणारा पडदा दीड तास वेगळ्याच सांस्कृतिक विश्वात घेवून जातो. ४०० ते ५०० कलाकार, १४ हत्ती, असली वाघ, इवल्या कोंबड्या-मेंढरं, शेतातून भरारी घेणारे खरे-खुरे पक्षी.. डोळ्याची पापणीही लवू नये, इतका लयबध्द शो थाई संस्कृतीचं दर्शन अन् थायलंडचं प्रदर्शन साकारणारा.. अगदी कल्पनेपलीकडची कला म्हणजे हा, फॅन्टसी शो!

फुकेट ओल्ड टाऊन, १० रस्त्यांमध्ये हेरीटेज इमारतींनी भरलेलं अन् भारलेलं. इथली वास्तुशास्त्रीय कला चायना-पोर्तुगालशी संधान साधणारी, जसं आपल्याकडचं ओल्ड गोवा. एकल किंवा दोन मजली इमारत, ज्याचा समोरचा भाग अरुंद पण भरपाई खोलवर. ‘फुकेट ओल्ड टाऊन’ला ‘जागतिक वारसा स्थळ’ म्हणून सूचीबध्द करण्याचा प्रस्ताव २०१९लाच ‘युनेस्को’कडे गेलेला. पण पर्यटनावर चालणाऱ्या या शहराला कोरोना काळात दोन वर्ष व्यावसायीक अवकळा आली होती, आता हे शहर पुन्हा भरारी घेतंय.. गाईडशी बोलतांना झालेल्या अशाच चर्चेत शेतीचा विषयही चर्चेला आला. इथला मौसम बेभरवशाचा, म्हणून पाम-ट्री अन् रबर ट्री वर इथला शेती व्यवसाय अवलंबून. शहरातील बौध्द मंदीरे, ही पर्यटकांना आकर्षीत करणारी. आम्हीही त्यांना भेट दिली. रस्त्याच्या कडेला गणेश अन् ब्रम्हाच्या मुर्तीच्या वर्णन करणारी काही मंदीरेही असल्याचे कळाले, पण तिथे जावू शकलो नाही..

काही शॉपींग-काही पॅकींग.. अशात ती रात्र गेली. सकाळी भल्या पहाटे आम्हाला एअरपोर्टवर सोडायला गाईड फाती हजर, ४ दिवस हसतमुख असणारी फाती आम्हाला निरोप देतांना तशी भावुक झालेली. प्रत्येकाच्या जवळ जावून फोटो काढत होती. या ४ दिवसात ‘चला चला, मामाच्या गावाला जाऊया, वांग्याचं भरीत-गपगप शिरा..’ असं मराठी बोलणं आमच्या काही मित्रांकडून ती शिकलेली. चेहऱ्यावर कधी त्रागा न ठेवणारा ड्रायव्हरही तेवढाच प्रांजळ.. अन् ज्या गाडीत ४ दिवस मौजमजा, धिंगामस्ती, गाण्याच्या भेंड्या.. असं सर्वकाही चाललं होतं, त्याच गाडीतून एअरपोर्टकडे परतत असतांना.. फुकेट डोळ्यात साठवून ‘बाय बाय फुकेट’ म्हणत असतांना नजरा पुन्हा पुन्हा सोडून चाललेल्या फुकेटकडे वळत होत्या.

हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला वाटत असेल, लाखो रुपये खर्च झाले.. पण छे.. ‘मानकर अ‍ॅन्ड चवरे’ म्हणजे ‘MAK HOLDAYS’ ने हा पॅकेज दूर विमानप्रवास, हॉटेलींग, फिरणे व खाण्या-पिण्यासह फक्त ६५ ते ७० हजारात मॅनेज करुन दिला. आम्ही बुलडाण्यातील विविध क्षेत्रातील २५ वर्षापासून ते ७५ वर्षापर्यंतचे ३५ जण या टूरमध्ये ऐकमेकांचे अगदी सोबती-सवंगडी होवून गेलो होतो, मोहन मानकर अन् प्रदीप चवरे हे टूर मॅनेजर प्रत्येकाचीच काळजी घेत होते.. हे दोघे बिचारे ४ ते ५ दिवस झोपले की नाही? माहिती नाही!

विमानतळावर पुन्हा चॉकलेटस् अन् इम्पोर्टेड ब्रँड-वँडीची खरेदी अनेकांनी केली, चेक-इनची क्यू लागली.. पार्सल बॅग्ज पट्ट्यावरुन पुढे सरकल्या अन् १५ सप्टेंबरला सकाळी १० वाजता डिर्पाचर होवून साडे१० वाजता हवेत झेपावलेलं विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज हवाई अड्ड्यावर दुपारी पावणे३ च्या सुमारास लँड झालं.. अन् पहिला फॉरेन दूर जणुकाही स्वप्नवत ठरला!

अन् हो, काही इंग्रजी-बिंग्रजी नको यायला विदेशात जायला, थायलंडमध्ये गाईड सोडलीतर आम्हाला कोणीच इंग्रजी बोलणारा भेटला नाही. फक्त ‘How Much’ या २ शब्दात तुम्ही जग फिरु शकता, त्यासाठी आधी मनातली भिती अन् न्यूनगंड सोडायला हवा. अन् सर्वात महत्वाचं- जग खूप सुंदर आहे, फक्त तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा ! बाय!!

(श्री राजेंद्र काळे हे ज्येष्ठ पत्रकार असून, विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी आहेत. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे ते नाशिक व विदर्भ विभागाचे संपादकीय सल्लागार आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!