– साखरखेर्डा, मेरा, गांगलगाव परिसरात जोरदार पाऊस सुरु!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील साखरखेर्डा परिसरात संततधार पाऊस सुरु असून, त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आला आहे. साखरखेर्डा – लव्हाळा या मार्गावरील भोगवती नदीलादेखील पूर आल्याने हा मार्ग बंद पडला असून, नदीकाठी प्रवासी खोळंबले होते. नदीतून वाहने घालू नये, पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन साखरखेर्डा पोलिसांनी केलेले आहे.
साखरखेर्डा, मेरा, गांगलगाव परिसरात सद्या जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, ओढे, नाल्यांना पूर आलेले आहेत. मुसळधार पावसामुळे साखरखेर्डा – लव्हाळा मार्गावर भोगावती नदीला पूर आल्याने लव्हाळा, साखरखेर्डा, मेराचौकीचा संपर्क तुटलेला आहे. भोगवती नदीच्या पुलावर प्रवासी वाहने खोळंबली होती. तर अनेक वाहने पर्यायी मार्ग शोधत होती. जीवितहानी होण्याची शक्यता पाहाता, साखरखेर्डा-लव्हाळा मार्गाने न येण्याचा सल्ला साखरखेर्डा पोलिसांनी दिला आहे. पाऊस सतत चालू असल्याने पूर ओसरण्याची सूतराम शक्यता नाही. त्यामुळे नदीकाठी खोळंबलेल्या प्रवाशांनी जीव धोक्यात घालून आपली वाहने पर्यायी पुलाच्या पुरातून नेण्याचे धाडस तर अजिबात करू नये, असे आवाहन साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी केलेले आहे.