जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार!
नाशिक (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा काँग्रेसने केली आहे. त्यामुळे या निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप – शिंदे गट आणि काँग्रेस अशा तिहेरी होण्याची शक्यता बळावली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांसाठी असतात. या निवडणुकांविषयी त्यांचे आडाखे ठरलेले असतात. त्यामुळे आगामी महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नव्हे तर स्वबळावर लढेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.
नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या ओबीसी विभागाच्या मंथन शिबीराच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाशिकला आले होते. प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांनी एकला चलो ची भूमिका घेतली. त्यावर, राज्यात मुंबईसह अन्य महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी आम्ही पूर्ण केली असल्याचे पटोले यांनी सांगितले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळी लढत असेल तर त्याची काळजी माध्यमांनी करू नये. एकेकाळी शिवसेना- भाजप एकत्र लढले होते. ते आता वेगळे लढत आहेत. त्यांचे मत विभाजनही होत असून त्याची काळजी करा, असा सल्लाही त्यांनी दिला. जातीनिहाय जनगणना करावी, असा ठरावही या मेळाव्यात मंजूर करण्यात आला.
नवे प्रदेशाध्यक्ष काेण, नाना, थाेरात की चव्हाण?
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे 500 हून अधिक सदस्य सोमवारी वाय.व्ही.चव्हाण सभागृहात त्यांच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करण्यासाठी एकत्र येणार आहेत. विद्यमान अध्यक्ष नाना पटोले या निवडणुकीत विजयी होऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. मात्र पटोले यांच्याकडे राज्याची कमान परत देण्यास पक्षातील काही ज्येष्ठ नेते सहमत नाहीत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण असे दिग्गज नेते नाना पटोले यांच्या विरोधात आहेत. अशा स्थितीत प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नाना पटोले यांची फेरनिवड झाल्यास गटबाजी वाढण्याची शक्यता बळावली आहे. तसेच नेतृत्व बदलाची मागणी जोर धरू लागल्यास एखाद्या तरुण चेहऱ्याला महाराष्ट्राची कमान दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे. दोन वर्षांनी राज्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. यात 19 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष निवडणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सुमारे 553 सदस्य महाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षाची निवड करतील. सध्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची कमान आहे. अशा परिस्थितीत त्यांची या पदासाठी पुन्हा निवड होते का? सोनिया गांधी आणि राहुल गांधी ही जबाबदारी तरुण नेत्याकडे सोपवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.