– पेनटाकळी, खडकपूर्णा प्रकल्पांतून पाणी सोडले
– बुलढाणा-चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प
– पेनटाकळी ९ तर खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे उघडले
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु असून, परतीच्या या पावसाने जिल्हा झोडपून काढला आहे. चिखली, मेहकर, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, खामगाव, जळगाव जामोद, मोताळा, संग्रामपूर व शेगाव तालुक्यात जोरदार पाऊस होत असल्याने नदी, ओढ्यांना पूर आले असून, वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले आहे. पेनटाकळी, खडकपूर्णा या प्रकल्पांचे दरवाजे उघडण्यात आल्याने या धरणांच्या लाभक्षेत्रांत पूरस्थिती निर्माण झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. चिखली तालुक्यातील हातणी गावाजवळील नदीला पूर आल्याने पुलावरून पाणी वाहू लागले असून, बुलढाणा-चिखली मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे.
पेनटाकळी प्रकल्प व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत असून, आज सकाळी नऊ वक्रीदरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले होते. त्याद्वारे नदीपात्रात ६७६४ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. दुपारून विसर्गात वाढ केली जाणार होती. पैनगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. दुसरीकडे, देऊळगाव मही येथील खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे आज सकाळी ०.३० मीटरने व दुपारी 0.80 व 0.50 मीटरने उघडण्यात आले असून, 44408.48 क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढविला जाणार आहे. सद्या हे धरण 91.29 टक्के इतके भरले असून, पाणीपातळी ५२०.३५ मीटरवर पोहोचलेली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. आजदेखील अनेक तालुक्यांना पावसाने झोडपून काढले असून, नद्या दुथडी भरून वाहात असून, धरणे भरली गेली आहेत. चिखली तालुक्यातील हातणी येथील नदीला आलेल्या पुरामुळे चिखली-बुलढाणा हा मार्ग बंद झाला असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पैनगंगा नदीलादेखील पूर आल्याने येळगाव धरण ओव्हरफ्लो झालेले आहे. बुलढाणा-चिखली मार्गावरील येळगाव टोल नाक्याजवळ पैनगंगेच्या पुलाला पाणी लागले होते. दुपारून पाणी पुलावरून वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बुलढाणा-चिखली संपर्क तुटणार होता. या पावसामुळे नदीकाठच्या शेतात पाणी शिरले असून, संततधार पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शिवाय, जनजीवनदेखील विस्कळीत झालेले आहे.