ग्रामपंचायत निवडणुकांत बंडखोरांना झटका; राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एक तर भाजप दुसर्या स्थानावर!
– खर्या लढती राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्येच झाल्याचे राज्यभर चित्र
मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतमोजणीचे धक्कादायक निकाली हाती आले आहेत. या निवडणुकांत शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व भाजपला मतदारांनी धक्का दिला असून, बहुतांश ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. राष्ट्रवादी क्रमांक एक तर भाजप क्रमांक दोनवर असल्याचे दिसून आले आहे. शिवसेनेला मात्र अपेक्षेप्रमाणे मोठा फटका बसला आहे.
राज्यातील १६ जिल्ह्यांतील ५४७ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी आज झाली. या निवडणुकांत सर्वाधिक ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर भाजप दुसर्या क्रमांकावर राहिला आहे. शिंदे गट आणि शिवसेना दोघेही तिसर्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. तथापि, भाजप व राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्याचे दावे-प्रतिदावे केले आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत, त्यामुळे कुणाचा दावा खाेटा की खरा हेदेखील सिद्ध हाेत नसल्याने सर्वच राजकीय पक्ष दावे करत आहेत. राज्यात एकूण ६०८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापैकी ५१ जागा या बिनविराेध झाल्या हाेत्या. उर्वरित जागांसाठी मतदान घेण्यात आले असता, बहुतांश सदस्य हे राष्ट्रवादीच्या विचारांचे निवडून आले हाेते. हाती आलेल्या माहितीनुसार, 285 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीच्या विचारांचे तर 187 ग्रामपंचायतींमध्ये भाजपच्या विचारांचे सदस्य निवडून आले आहेत. काही माेजक्याच ग्रामपंचायती वगळता शिंदे गटाला फारसा प्रभाव पाडता आला नाही, असे दिसून येते. तर काँग्रेसने तिसरे क्रमांकावर स्थान पटकावले आहे. अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसने राणा दाम्पत्याला चांगलाच धक्का दिला आहे. 5 पैकी 3 सरपंचपदं काँग्रेसने पटकावली आहे. तर भाजपच्या वाटेला एकच जागा आली आहे. अमरावती जिल्ह्यात रविवारी 5 ग्रामपंचायतमध्ये मतदान पार पडल्यानंतर आज तासाभरात मतमोजणी पार पडली.
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँगेस आणि काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ग्रामपंचायती मिळवल्या असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ग्रामपंचायतच्या निवडणुक ही चिन्हावर लढवली जात नाही. त्यामुळे असा कुणी दावा करत असेल तर ते चुकीचे आहे, असा टोला जयंत पाटील यांना भाजपा आणि शिंदे गटाला लगावला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांचे आजचे निकालांनी शिवसेना-भाजप युतीवर शिक्कामोर्तब केलं आहे. हे निकाल भविष्याची नांदी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केलं आहे.