उदगीर, जळकोट, अहमदपूर, चाकूर, देवणी येथे अनधिकृत क्लिनिक लॅब, पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट
उदगीर (तालुका प्रतिनिधी) – लातूर जिल्ह्यातील उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर व चाकूर या तालुक्यात क्लिनिक लॅब व अनधिकृत पॅथॉलॉजी लॅबचा सुळसुळाट झाला असून, त्या तातडीने बंद करण्यात याव्यात व रक्त लघवी तपासणीच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी आर्थिक लूट थांबवण्यात यावी, या मागणीसाठी १५ सप्टेंबररोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या अनधिकृत लॅब तातडीने बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे, की उदगीर, देवणी, जळकोट, अहमदपूर व चाकूर येथे रक्त व लघवीच्या तपासणीच्या नावाखाली मनमानी लूटमार चालू आहे. प्रत्येकाचे दर वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात एमपीएमसी काउन्सिल यांचे रजिस्ट्रेशन असणे गरजेचे आहे. ज्यांचे रजिस्ट्रेशन नाही तोही लॅब टाकून बसला आणि ज्यांच्याकडे अधिकृत शैक्षणिक पात्रता व परवाना प्रमाणपत्र नाही, असे अनधिकृत लॅब क्लिनिक लॅब व पॅथॉलॉजी लॅबची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी. प्रत्येक लॅबमध्ये दर पत्रके लावण्यात यावे, आणि गोरगरीब जनतेची व रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबवण्यात यावी. अन्यथा, प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील, यांची नोंद घ्यावी, असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक लातूर, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर आदींना देण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे उदगीर तालुकाध्यक्ष रविकिरण बेळकुंदे, उदगीर तालुका उपाध्यक्ष महादेव मोती पोवळे, मुख्य संघटक बंडेप्पा पडसलगे, तालुका कार्याध्यक्ष महादेव आपटे, तालुका संपर्कप्रमुख सुनील केंद्रे, तालुका सचिव अविनाश शिंदे, मेहबूब शेख आदी प्रहार सेवक व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.