Uncategorized

‘दहीहंडी’चे राजकारण.. अन् राज्यकर्त्यांचा पोळा!

सण किंवा उत्सव म्हटले की, पुर्वी राजकारणापासून ते कोसो दूर असायचे. राजकारणातले कट्टर प्रतिस्पर्धीही अशा महोत्सवांना एकत्र येवून समाजकारणाचा आदर्श घालून द्यायचे. पण प्रत्येक उत्सवातच आता राज्यकर्त्यांचा अन् त्यांना विरोध करणाऱ्या नेत्यांचाही ‘पोळा’ फुटत असल्यामुळे दसरा असो की दिवाळी, प्रत्येक सणातच बोंबा ठोकल्या जात असल्यामुळे सर्वत्र चालतो तो.. शिमगाच!

कोरोनामुळे २ वर्ष सर्व उत्सवांवर सर्वत्र विरजण पडले होते, त्यामुळे आता जोशात सुरु झालेल्या उत्सवातही निर्बंध उठल्याचे राजकारण सत्ताधाऱ्यांकडून झाले. जणुकाही मागचे दोन वर्ष कोरोनामुळे नव्हेतर, महाविकास आघाडी सरकारमुळेच दहीहंड्या बंद पडल्या होत्या. ही दहीहंडी सुरु करतांनाही, मुख्यमंत्र्यांनी त्याला खेळाचा दर्जा देवून नवीन राजकीय वादाला तोंड फुटले. लग्नालाही साहसी खेळाचा दर्जा देण्याची मागणी मनसे.प्रमुख राज ठाकरेंनी मिश्कीलपणे केली. याचदरम्यान मुंबईत सध्या विधीमंडळाचे अधिवेशन सुरु आहे, पायऱ्यांवरची धिंगामस्ती अन् हाणामारी पाहता.. हे अधिवेशन आहे की, ‘पोळा’ हेच कळत नाही. पोळ्याततरी बैल शिस्त पाळतात, पण तिथे सारेकाही बेशिस्तपणे सुरु आहे. त्याचा बेक्कार नमुना, मिटकरी व शिंदे या २ आमदारांमधील धक्काबुक्की!

पोळा आज, पुर्वी पोळ्यात गावकी अन् भावकीचं राजकारण उफाळून यायचं. बैलां-बैलांमधील स्पर्धांपेक्षा माणसा-माणसांमधील प्रतिस्पर्धा जास्त प्रमाणात बघायला मिळायच्या. त्या तुलनेत आता गावं सुधारली, मुंबई-दिल्ली बिघडत चाललीय. पोळा भरतो गावात, पण फुटतो तिकडेच!

‘दहीहंडी’वर येऊया. दोन वर्षानंतर यावर्षी दहीहंडी बेफाम झाल्यात, राजाश्रय असल्यामुळे राज ठाकरेंच्या भोंग्यांविषयीचा डेसीबल वगैरे कोणत्या डीजें.नी पाळला नाही. वेळेचे बंधन कोणी-कोणी किती-किती पाळले? हाही संशोधनाचाच विषय. असो, दहीहंडी मुंबई-ठाण्यापासून चिखलीपर्यंत धुमधडाक्यात झाली. वास्तविक हा मराठी माणसांचा एकमेव उत्सव असा आहे की, तिथे प्रत्येकजण दुसऱ्याला वर जायला मदत करतो.. नाहीतर दुसऱ्या ठिकाणी निव्वळ पाय ओढून खाली खेचण्याचे काम सुरु आहे. परंतु हा उत्सव राजकीय पातळीवर पोहचल्यावर, तिथेही आता वर चढवण्याऐवजी खाली खेचण्याचेच काम सुरु आहे.

त्याचा अनुभव बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने चिखली विधानसभा मतदार संघाच्या पटलावर येत आहे. तशी चिखलीत दहीहंडी उत्सव आणला तो, १५ वर्षापुर्वी राहुल बोंद्रे यांनी. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील चौकात ही दहीहंडी थेट राजकारणाच्या माध्यमातून सुरु न करता, त्यांनी सामाजिक पातळीवर सुरु केली. नंतर मात्र तिला अपेक्षेप्रमाणे राजकारणाचे स्वरुप आलेच. राहुलभाऊंच्या या दहीहंडीला शह म्हणून, २०१९च्या निवडणुकीच्या आधी त्यावेळी आमदारकीसाठी भाजपाच्यावतीने तयारी करणाऱ्या श्वेताताई महाले यांच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. तेव्हा गोपालकाल्याच्या दिवशी या दोन्ही दहीहंडींचा ‘थरथराट’ बघायला मिळाला होता. त्यावेळी राहुलभाऊंनी हिंदीतील हिरोईन आणली होती, तर श्वेताताईंनी मराठीतील नटी. पुढे विधानसभेची निवडणूक झाली, अन् श्वेताताई विजयी झाल्या. मात्र नंतर कोरोना महामारीचे संकट आल्याने २०२० व २०२१ असा सलग २ वर्ष दहीहंडीचा हा उत्सव होवू शकला नाही. परिणामी चिखलीतील राजकीय शक्तीप्रदर्शन त्यामुळे सलग दोन वर्ष टळले.

कोरोना निर्बंधमुक्तीनंतर यावर्षी २०२२ला दहीहंडीचा उत्सव धडाक्यात साजरा करण्याच्या पृष्ठभूमीवर, चिखलीत राहुलभाऊ विरुध्द श्वेताताईंया दहीहंडींचा थरार पुन्हा रंगणारहोता. परंतु नुकतेच राज्यात सत्तांतर झाले, अन् भाजपा सत्तेवर आली. नगर पालिकेत सध्या प्रशासकीय राजवट आहे. यामुळे पुतळ्यासमोरील मुख्य चौक दहीहंडीसाठी शुक्रवार १९ ऑगस्टला श्वेताताईला मिळाला, या अवस्थेत आता राहुलभाऊंची दहीहंडी रद्द होणार.. अशा चर्चा असतांनाच, राहुलभाऊंनी एक दिवशी आधीच म्हणजे जन्माष्टमीला गुरुवार १८ ऑगस्ट रोजी दहीहंडीचा हा उत्सव आयोजीत केला. २ वर्षानंतर प्रथमच दहीहंडी फुटणार असल्याने उस्फूर्त असा जल्लोष त्यावेळी बघायला मिळाला. कोरोना नंतरची ही महाराष्ट्रातली पहिली दहीहंडी ठरली, अन्य दहीहंड्या शुक्रवार १९ ऑगस्टला आयोजीत करण्यात आल्या होत्या. राहुलभाऊंच्या या दहीहंडीत मराठी अभिनेत्री व सध्या गाजत असलेल्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील हृता दुरगुळे हा छोट्या पडद्यावरील दररोजच्या ओळखीचा चेहरा असल्याने साहजीकच महिलांची गर्दी तिला बघण्यासाठी जास्त प्रमाणात झाली असल्याचे यावेळी दिसून आले.

या दहीहंडीच्या यशस्वीतेबद्दल नमूद करतांना राहुल बोंद्रेंनी पोस्ट केले की, ‘चिखली येथील छत्रपती शिवराय क्रिडा प्रतिष्ठानच्या आमच्या मानाच्या दहीहंडीला युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद एवढा प्रचंड होता की शब्दात त्याचे वर्णन करणे अवघडच. खरं तर दोनच दिवस तयारीला मिळाले, त्यात प्रशासनाची संपुर्ण असहकार्याची आणि काही ठिकाणी तर जाणीवपुर्वक त्रास देण्याची भूमिका होती. आर्थिक पाठबळ फारसे मागे नव्हते, अनेक अडचणी असल्यातरी असंख्य युवक, सहकारी, पाठीराखे व चाहत्यांचा सततचा आग्रह होता की आपली मानाची दहीहंडी यावर्षी झालीच पाहीजे. या सर्वांच्या आग्रह प्रेम व सहकार्यामुळे केवळ दोनच दिवसातल्या तयारीवर देखील दहीहंडी प्रचंड यशस्वी ठरली. ना गावागावात जाहीरातीचे फ्लेक्स, ना कार्यक्रमाला येण्यासाठी गाड्या, ना बक्षिसाची जंगी लुट, ना लाइटींगवाला महागडा डीजे.. पण तरी देखील चिखलीच्या इतिहासातील सर्वात जास्त गर्दी उसळली, तरुणाईचा प्रचंड जल्लोष झाला आणी तरी देखील शांततेत उत्सव पार पडला.’ विशेष म्हणजे या दहीहंडी उत्सवात नैसर्गिक पाऊस पडला.

राहुलभाऊंच्या या दहीहंडीनंतर दुसऱ्या दिवशी आ.श्वेताताई महाले पाटील यांची दहीहंडी प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पार पडली. या उत्सवाला हिंदी अभिनेत्री रिमी सेन उपस्थित होत्या, या दहीहंडीत २.५१ लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होती. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डीजे.ने माहौल बनवला होता. थरावर थर चढून उत्सवाचा थरथराट रंग भरत होता. या उत्सवासाठी जिल्हाभरातून भाजप व शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते दाखल होत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. आकाश फुंडकर, आ.संजय गायकवाड, माजी आमदार विजयराज शिंदे व शशिकांत खेडेकर यांच्यासह स्थानिक नेत्यांचीही भरगच्च उपस्थिती होती. या दहीहंडीदरम्यान एका युवकाला मारहाण केल्याची बातमी चॅनलवर चालली, परंतु यासंदर्भात स्थानिक पोलिस स्टेशनला कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्याचे पुढे आले आहे.

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर चिखली विधानसभा मतदार संघात, दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जो राजकीय थरथराट गत काही वर्षांपासून बघायला मिळतो, तो यावर्षी कोरोना काळानंतर यावर्षी सुध्दा अनुभवायला मिळाला!

(लेखक हे विदर्भातील आघाडीचे दैनिक देशाेन्नतीचे बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी असून, विदर्भातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. तसेच, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे नाशिक व विदर्भ सल्लागार संपादक आहेत. संपर्क 9822593923)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!