– मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हुलवंत मुंडे यांचा अनोखा उपक्रम
लातूर (गणेश मुंडे) – उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी गावामध्ये प्रतिवर्षा प्रमाणे शेतकरी आपला सर्जारराजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा करत असताना, मतदार यादी भाग क्रमांक १२७ जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरशेळकी उत्तर बाजू या मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बूथ लेवल ऑफिसर) हुलवंत तुकाराम मुंडे यांनी मतदानकार्ड आधारकार्डला लिंक करण्याचा संदेश देत, जनजागृती करण्याचा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले.
मुख्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदारांचे आधार कार्ड हे मतदान ओळखपत्राला जोडण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. त्यानिमित्त मतदारांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने बैलाच्या पाठीवर संदेश बॅनर लावून मारोती मंदीराचा फेरा मारत मतदार हेल्पलाइन अॅपच्या माध्यमातून मतदानकार्ड सोबत आधार कार्ड लिंक करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे बॅनर लावून बैल पोळा साजरा केला. सदर आधार जोडणी ही मतदारराजांचे प्रमाणीकरण व शुद्धीकरण, दुबार मतदार यादीतील नावे वगळण्यासाठी, तसेच आधार कार्डाच्या माहितीला दुहेरी सुरक्षितता देण्यासाठी करण्यात येत आहे. हुलवंत मुंडे हे बी.एल.ओ. आहेत, त्यांच्याकडे नव मतदार नोंदणीची कामे म्हणजेच फॉर्म सहा भरून घेणे, तसेच मयत, दुबार, स्थलांतरित मतदारांची वगळणी करणे, तसेच मतदार यादीतील नोंदीमध्ये दुरुस्ती करणे, म्हणजेच फॉर्म आठ भरून घेणे ही कामे आहेत. या कामाचा आज वेगळा आनंद जनतेचा समोर बैलपोळा सणाच्या निमित्ताने पहायला मिळाला. तो आज जिल्हात नव्हे महाराष्ट्रात चर्चा होत आहे.
यासंदर्भात उदगीर तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी सांगितले, की नागरिकांनी ६ ब नंबरचा फॉर्म भरून जास्तीत जास्त मतदानकार्ड हे आधारकार्डशी लिंकिंग करून घ्यावे व आपल्या मतदानाचे हक्कदार व्हावे, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. तसेच, मुंडे यांच्या उपक्रमाचे त्यांनी कौतुकदेखील केले आहे.
—————-