पाचोड (विजय चिडे) – मुरमा ता.पैठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला चिखलाचा वेढा पडला आहे. शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येणे देखील अवघड झाले आहे. मैदानावर चिखल तर वर्गात ओलवा झाला आहे. काही महीन्यापूर्वी शाळांच्या खोल्याचे दुरुस्ती केल्यात. मात्र; यातील एका वर्गात पत्रातून पाणी गळती लागल्यामुळे शाळेय विद्यार्थ्यांची बसण्याची गैरसोय होत आहे.
चार दिवसापासून रिमझिम पावसाने परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शाळेच्या प्रांगणालगतच गावातील रस्तावरते पाणी वाहून येत आहे. त्यामुळे पाणी शाळेच्या प्रांगणात जागोजागी पसरले आहे. त्यामुळे प्रांगणात दलदल झाली असून पाय ठेवणे जिकरीचे बनले आहे. यामुळे शाळेत दररोज चक्क शाळेत जायला रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली. शाळेत शिक्षक वर्गावर आले असताना फक्त आणि फक्त वर्गात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले. या शाळेत मराठी माध्यमाचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षणाचे धडे गिरविले जातात. या शाळेत दोनशेच्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेतात तरी शाळेच्या परिसरात संपूर्ण चिखल झाला आहे. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शाळेतील काही वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी कोरडी जागा नाही तर मैदानावर चिखल झाला आहे. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलात थांबावे लागत आहे तरी या समस्यांकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मुरम्यातील ग्रामस्थ रवि काटे यांनी म्हटले आहे.
—
मुरम्याची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची रचना ही स्वातंत्र्य कालखंडातील आहे. त्यानंतर गावाचा विकास झाला आणि रस्त्याते वरती झाले त्यामुळे शाळेत पाणी येत असून चिखल होत आहे.
- उध्दव दराडे, मुख्यध्यापक.