– भाजपला २४ ते २५ तर शिंदे गटाला १५ ते १६ मंत्रिपदे
– दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार शक्य – सूत्र
नवी दिल्ली (विशेष राजकीय प्रतिनिधी) – शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीची गुप्तपणे वारी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची खात्रीशीर माहिती हाती आली असून, कालच शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार, देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन हे दिल्लीत शाह यांना भेटले होते. दरम्यान, शिंदे व शाह यांच्या गोपनीय बैठकीत ६५-३५ चा फॉर्म्युला ठरला असून, त्यावर शिंदे तयार नसल्याचेही खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. तरीही पुढील दोन-तीन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिंदे गट व भाजप नेते वाटाघाटी करत आहेत. राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्री ४२ मंत्र्यांचा समावेश करू शकतात. तर सद्या ४० पदे खाली आहेत. यापैकी २५ ते ३० हे भाजपला तर उर्वरित १० ते १५ मंत्रिपदे शिंदे गटाला मिळू शकतात, असेही राजकीय सूत्राने स्पष्ट केले आहे.
शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या ४० आमदारांपैकी अनेकांनी मंत्रिपदासाठी दबाव निर्माण केलेला आहे. खुद्द औरंगाबाद जिल्ह्यातून अब्दुल सत्तार, संजय सिरसाठ व संदीपान भुमरे हे जोरदार दावेदार आहेत. बुलडाण्यातून संजय रायमुलकर यांच्यासह फडणवीस यांचे निकटवर्तीय संजय कुटे, श्वेताताई महाले पाटील हे दावेदार आहेत. अशीच परिस्थिती राज्यात चोहीकडे आहे. या शिवाय, शिंदे गटात ९ आमदार असे आहेत, जे ठाकरे सरकारमध्ये मंत्री होते. आपले मंत्रिपद दाव्यावर लावून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत. त्यात ५ कॅबिनेट व ४ राज्यमंत्री होते, यातील राज्यमंत्र्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. एकूणच शिंदे गटातूनच १५ ते १८ आमदार हे मंत्रिपदासाठी जोरदार दावेदार आहेत. भाजपमध्ये मंत्रिपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या तीन दिवसांमध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल. मंत्रिमंडळ विस्ताराला थोडा विलंब झाला आहे, पण आमच्यात कोणत्याही पातळीवर कोणताही वाद नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. येत्या तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार करू. मंत्रिमंडळ निवडीत कोणताही भेदभाव नसून संभाव्य मंत्रिमंडळ खूप चांगलं असेल, असंही शिंदे यांनी सांगितलं.
दरम्यान, नवी दिल्लीस्थित सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे व अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, शिंदे गट-भाजपात ६५-३५चा फॉर्म्युला मंत्रिपदासाठी वापरला जाणार आहे. त्यानुसार, भाजपला सर्वाधिक २४ ते २५ मंत्रिपदे व शिंदे गटाला १५ ते १६ मंत्रिपदे मिळतील. या शिवाय, काही छोटे राजकीय पक्ष, समर्थक अपक्ष आमदार यांनाही मंत्रिमंडळात समावून घेतले जाणार असून, त्यांना शिंदे व भाजपने आपआपल्या कोट्यातून मंत्रिपदे द्यायची आहेत. भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद देऊन विधानसभेचे अध्यक्षपद, उपमुख्यमंत्रीपद यासह गृह, महसूल, नगरविकास, जलसंपदा, अर्थ व नियोजन, ग्रामविकास यासारखी महत्वाची खातीही मागितलेली आहेत, असेही खास सूत्राने सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद तर मिळाले पण सोबतच्या आमदारांचे समाधान कसे करायचे, असा मोठा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पडलेला आहे, असेही दिल्लीस्थित वरिष्ठ राजकीय सूत्राने सांगितले आहे.