शिंदे गटातील 11 आमदार आजही उद्धव ठाकरेंनाच मानतात पक्षप्रमुख!
बुलडाणा (ब्रेकिंग महाराष्ट्र) – शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी असलेली युती तोडावी, यासाठी बंडखोर नेते एकनाथराव शिंदे यांच्यासह शिवसेनेतील ४० आमदारांनी शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल दिल्याचा आक्षेप घेत, बंडखोरी केल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले व पक्षप्रमुख तथा तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन केले. आता शिवसेना ताब्यात घेण्यासाठी एकनाथराव शिंदे गट आक्रमक झाला असून, निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. तर त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने सध्या प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असतांना ११ बंडखोर आमदारांनी मात्र उध्दव ठाकरेंनाच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उल्लेख करीत २७ जुलैरोजी त्यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावरून शुभेच्छा देवून त्याला दुजोराच दिला आहे. या आमदारांना आता मुख्यमंत्री काय समज देतात, हे पाहणे गरजेचे ठरेल!
सध्या कोणतेही महत्वाचे निर्णय घेणे तसेच आपले मत मांडण्यासाठी सोशल मीडिया हे प्रबळ माध्यम ठरत आहे. याच सोशल मीडियाच्या माध्यमातून महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. एक महिन्यापूर्वी शिवसेना बंडखोर आमदारांनी प्रथम सुरत त्यानंतर गुवाहाटी व गोवा या प्रवासादरम्यानचे निर्णय व व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करुन डिजिटल इंडियाचा युगात वावरत असल्याचे सिध्द केले आहे. २७ जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिंदेगटातील आमदारांनी उध्दव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री असा उल्लेख करुन शुभेच्छा दिल्याने, एकनाथ शिंदे गटातील हे आमदार आजही उध्दव ठाकरे यांना पक्षप्रमुख मानीत असल्याचे त्यांनी दाखवून दिल्याने, ते एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख मानीत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, भरतसेठ गोगावले, मंजुळा गावीत, प्रदीप जैस्वाल, प्रकाश सरनाईक, संजय शिरसाट, शंभुराजे देसाई, तानाजी सावंत यांनी मात्र उध्दव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री संबोधून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचे सोशल मीडियाच्या सर्व्हेतून आढळून आले.
(फोटो सौजन्य-फेसबूक)
यांनी दिल्या शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शुभेच्छा….
ब्रेकिंग महाराष्ट्राने सोशल मीडिया फेसबूक पेजची गुरुवार २८ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेच्या दरम्यान पाहणी करून सर्व्हेक्षण केले. यामध्ये सर्वश्री आमदार बालाजी किन्हीकर, ज्ञानराज चौगुले, गुलाबराव पाटील, किशोर पाटील, प्रकाश सुर्वे, सदा सरवणकर, संजय गायकवाड, संजय रायमुलकर, विश्वनाथ भोईर, यामिनी जाधव, योगेश कदम या आमदारांनी उध्दव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत.
उध्दव ठाकरेंचे फोटो कायम..
आ.भरतसेठ गोगावाले, दादाजी भुसे, अनिल बाबर, दीपक केसरकर, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, संदिपान भुमरे, संजय रायमुलकर, श्रीनिवास वानगा, यामिनी जाधव यांच्या फेसबूक पेजवर बाळासाहेब, उध्दव व आदित्य ठाकरे यांचे फोटो मात्र कायम आहेत.
शुभेच्छा देणे टाळले..
आ.दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, अनिल बाबर, बालाजी कल्याणकर, चंद्रकांत पाटील, चिमणराव पाटील, दीपक केसरकर, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, लताबाई सोनवणे, महेश शिंदे, मंगेश कुडाळकर, प्रकाश आबिटकर, संजय राठोड, शहाजीबापू पाटील, शांताराम मोरे, श्रीनिवास वानगा, सुहास कांदे या आमदारांनी उध्दव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे टाळले, हे विशेष!