बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम परिसर ही त्यागभूमी आहे. निष्काम कर्मयोगी पू. शुकदास महाराजश्रींनी या भूमित त्यागाचे रोपटे लावले आहे. रामकृष्ण परमहंस यांना अपेक्षित असलेला शिवभावे जीवसेवा हा त्याग त्यांनी या मातीत रुजविला. स्वामी विवेकानंद यांच्या मूर्तीमंत विचारांचे उत्कृष्ठ कोंदण या त्यागाला आहे. याच त्यागाचा वसा घेऊन अनंत शेळके या तरुणाने नित्यानंद सेवा प्रकल्प हा अनाथांच्या जीवनात जीवनप्रकाश पेरणारा उपक्रम हिवरा आश्रम येथे सुरु केला. त्यांचे अनाथालय आज आई-वडिलांची सावली हरपलेल्या बालकांना मायेचा आधार देत आहे. या अनाथालयात विचार आणि वकृत्वाचे महामेरू ठरलेले, स्वर्गीय रा. ना. पवार यांच्या कृतीशील विचारांचा वारसा चालविणारे, त्यांचे सुपुत्र डॉ. विजय पवार हे मोफत, अगदी रात्री-अपरात्री आणि उन्ह-पावसाची तमा न बाळगता, आपली वैद्यकीय सेवा देत आहेत. डॉ. पवार हे वैद्यकीय क्षेत्रातील खरे सेवाव्रती आहेत. खेडोपाडी आपली सेवा देताना एखाद्या गोरगरिबाकडे पैसे नसेल तर त्यांनी त्याची काळजी केली नाही. अगदी स्वतःच्या जवळची औषधी देऊन त्या रुग्णाला बरे केले. प्रसिद्धीपासून दूर राहणार्या या थोर व्यक्तिमत्वावर पत्रकार संतोष अवसरमोल यांनी लिहिलेला हा लेख खास ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वाचकांसाठी देत आहोत.
– संपादक (विदर्भ विभाग)
——–
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तो भार वाहे.. ‘आज या गाण्याच्या ओळीची आठवण झाली ती, मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील ‘नित्यानंद सेवा प्रकल्प’ या अनाथ आश्रमामधील अनाथ निराधारांना ‘जीवन आनंद’ देणार्या ब्रम्हपुरी येथील डॉ. विजय रा. ना. पवार यांच्या सेवाकार्याने. ते कुठलाही गाजावाजा न करता अनेक वर्षांपासून अनाथांची सेवा करत आहेत. त्यांचे अश्रू पुसत आधार देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे खर्याअर्थाने नित्यानंद अनाथ आश्रमाच्या अनाथ मुलांच्या चेहर्यावर हास्य फुलवण्यासाठी डॉ. विजय रा.ना.पवार एक अधार बनले आहेत. त्यामुळे नित्यानंद सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष अनंता शेळके यांनी डॉ. विजय पवार यांना उत्तम कामगिरीबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
त्या प्रमाणात पत्रात नमूद करण्यात आले की, आपण अनेक वर्षापासून नित्यानंद सेवा प्रकल्पातील ४० निराधार मुलांची मोफत वैद्यकीय सेवा करत आहात, देवघरात शांतपणे तेवणार्या नंदादीपाप्रमाणे ही तुमची आरोग्यसेवा अखंड सुरू आहे. अगदी रात्री-अपरात्रीदेखील आपण त्या लेकरांची शिवभावे जीवनसेवा करीत आहात. कोरोनाच्या महाभयंकर काळात रक्ताच्या नात्यातील माणसंदेखील जेव्हा एकमेकापासून दुरावत होती, तेव्हा आपण मात्र आमच्या लेकरावर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, हा सेवादीप अखंड तेवत ठेवत उपचार सुरू ठेवले, आणि लेकरांना धीर देत राहिलात, आणि मानवतेचे हे प्रतल विस्तारात करीत राहिलात. मधल्या काळात आपण आजारी असतानादेखील आपण ही आरोग्यसेवा अखंड सुरू ठेवून, आमच्या या लेकरांना भक्कम बळ दिले आहे. व्यवहारांच्या साखळदंडांनी करकचटून बांधलेल्या आत्मकेंद्रित युगात आपण देत असलेली मोफत आरोग्यसेवा या अनाथ मुलाच्या लेकरांचा जगण्याचा मार्ग, प्रशस्त करण्यासाठी भक्कम असा आधार देणारा आहे. आपल्या या आरोग्यसेवेप्रति आम्ही सदैव आपले कृतज्ञ आहोत. आपलं हे आभाळाएवढं प्रेम आम्हाला सदैव सदगदीत करते. काय द्यावे तुम्हा.. होऊ उतराई.. अशीच आमच्या अंतःकरणाची अवस्था आहे. नियतीच्या क्रूर आघाताने भयभयीत झालेल्या पामरांच्या आयुष्यात हा आरोग्यदीप असाच तेवत ठेवण्यासाठी आपणास हे भावफुले कृतज्ञेची प्रमाणपत्र देत आहो.
अशा तेजस्वा,r ओघवत्या, वकृत्वाच्या शब्दात नित्यानंद सेवा प्रकल्पातील अध्यक्ष श्री शेळके यांनी डॉ. विजय रा.ना.पवार यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा शब्दसुमनाने गौरव केला आहे.
——–