ChikhaliVidharbha

उपमुख्यमंत्री ते पंतप्रधानांच्या वाढदिवसापर्यंत विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी

– जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींची मोफत नेत्रतपासणी करणार, गरजुंना चष्मे देणार, शस्त्रक्रियाही करणार!

चिखली (ब्रेकिंग महाराष्ट्र) – चिखलीच्या भाजपच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या संकल्पनेतून व दूरदृष्टीने राज्य कारभार करणारे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत चिखली विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींच्या डोळ्यांची मोफत दृष्टीदोष तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये दृष्टीमध्ये दोष असतील, ज्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल, त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला चष्मे वाटप करुन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या अभिनव उपक्रमाला सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसापासून (२२ जुलै) झाली आहे. माळवंडी, रुइखेड मा., मोहज, भडगाव या गावांमधील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करुन या उपक्रमास शुभारंभ करण्यात आला आहे. दरम्यान, चिखली मतदारसंघातील १४८ गावांतील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर जाऊन विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करणार आहेत. १७ सप्टेंबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर चष्मे वितरण करण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना डोळ्यांची शस्त्रक्रिया किंवा प्रगत उपचारांची आवश्यकता आहे, त्यांच्यावर मोफत उपचारांची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
पहिल्याच दिवशी ४३३ विद्यार्थ्यांची करण्यात आली तपासणी
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै पासून या नेत्र तपासणीमध्ये माळवंडी, रुइखेड मायंबा, मोहज, भडगाव या गावांमधील जिल्हा परिषद शाळेतील एकूण ४३३विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमास भाजपचे बुलडाणा तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, पंडितदादा देशमुख, संदीप उगले, शेख अनिस भाई, जिल्हा अध्यक्ष, डॉ. शिंदे, राजू नाटेकर, सुदर्शन खरात, बंडूभाऊ अंभोरे, सरपंच विष्णू उगले, कौतिकराव ओवळकर, उपसरपंच, प्रदीप उगले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!