देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पोस्टल अपघात विमा
– सचिन पोटरे यांच्यामुळे पत्रकारांना मिळाले अपघाती संरक्षण
कर्जत, जि.नगर (आशिष बोरा) : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी कर्जत तालुक्यातील सर्व पत्रकारांचा पोस्टाचा अपघाती विमा उतरवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने पत्रकारांना संरक्षण दिले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला वाढदिवस समाजाच्या उपयोगासाठी साजरा करावा, कोणत्याही प्रकारच्या जाहिरात करू नये, बॅनर लावू नयेत असे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांना केले होते. या अनुषंगाने कर्जत येथे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी आपल्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा व सांस्कृतिक संस्थेच्यावतीने कर्जत तालुक्यात समाजासाठी अहोरात्र झटणार्या सर्व पत्रकारांचा केंद्र शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या पोस्टाचा आरोग्य विमा उतरवून सन्मान केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय पोस्ट अधिकारी अमित देशमुख यांनी या विमा पॉलिसीची सविस्तर माहिती दिली, तर पोटरे यांनी पत्रकार हे समाजातील वंचित, दीनदुबळ्या घटकांसह सर्वांनाच न्याय देत असतात. मात्र त्यांचे कुटुंब मात्र असुरक्षित असते. कोरोनाच्या काळात पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची मोठी हेळसांड होत असून, त्यांचेकडे कोणीही लक्ष देत नाही हे विशद करताना रायकर यांना फक्त भाजपाने केलेली पाच लाखाची मदत मिळाली असून, त्या वेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे व खासदार सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेली पाच लाख रुपयांची मदत अद्याप मिळालेली नाही, असा गंभीर आरोप करताना, रायकर याना खूप मदत मिळाली असेल, असा गैरसमज असल्याची खंत त्याची पत्नी व्यक्त करत असल्याचे सांगितले. कोणत्याही पत्रकारावर दुर्दैवी प्रसंग येऊच नये अशीच श्री गोदड महाराज चरणी प्रार्थना करताना, चुकून एखाद्या पत्रकारावर वाईट प्रसंग उद्भवल्यास त्यास मदत व्हावी म्हणून हा छोटासा प्रयत्न असल्याचे विशद केले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुका समन्वयक पप्पूशेठ धोदाड हे होते, याप्रसंगी शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, अमित देशमुख, उपविभागीय डाक निरिक्षक, कर्जत उपविभाग बाळासाहेब बाळुंजकर, पोस्टमास्तर कर्जत दिलीप खरात, सुनिल धस, बापुराव पंडीत, संतोष गदादे, दिपक काळे, चंद्रकांत नेटके, पदाधिकारी डाक संघटना अशोक बंडगर, पदाधिकारी डाक संघटना प्रफुल वाघमारे, ज्ञानदेव तांदळे, हजारे, संगीता भवर, सुरज तोरडमल, शाहरुख सय्यद आदीसह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.