Breaking newsHead linesMaharashtraPolitical NewsPolitics

महाराष्ट्र भाजपला एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवल्याचे दुःख?

– भाजपमधील खदखद प्रदेशाध्यक्षांच्या तोंडातून बाहेर?
– देवेंद्र फडणवीसांकडून सारवासारव : म्हणाले, एकनाथ शिंदे, आमच्या सर्वांचे नेते, निर्णय घेता आम्ही सोबत होतो!

मुंबई (विशेष राजकीय प्रतिनिधी) – महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविल्याचे दुःख असल्याचे आज स्पष्ट झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच तशी कबुलीच दिली. मनावर दगड ठेवून आम्ही हा पक्षनेतृत्वाचा निर्णय मान्य केला, असे पाटील म्हणाले. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना चंद्रकांतदादा खरे बोलून गेले. स्थिर सरकार देण्यासाठी मनावर दगड ठेवून वरिष्ठांचा हा निर्णय मान्य केला, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदारपणे व्हायरल झाल्यानंतर, एकच खळबळ उडाली. प्रदेश भाजपचे मनातील दुःख असे बाहेर आल्याने सर्वस्तरातून टीकाही सुरु झाली. त्यानंतर, भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव करत, याप्रकरणावर पडदा टाकला.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर पनवेलमध्ये पहिल्यांदाच भाजप कार्यकारणीची बैठक झाली. बैठकीला राज्य भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तसेच वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील सत्तातराबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मनातील भावना व्यक्त केल्यात. ते म्हणाले, मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला.वगेल्या अडीच वर्षातील चित्र पाहिल्यानंतर राज्यात सत्ता बदलण्याची गरज होती आणि तसा बदल झाला आहे. हा बदल होत असताना असा एक नेता देण्याची गरज होती, जो योग्य मेसेज देईल. जो चांगल्या निर्णयांना स्थिरता देईल. असे असताना आपण सर्वांनी मनावर दगड ठेवून फडणवीस आणि केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आपल्या सर्वांना दु:ख झाले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले ते देवेंद्र फडणवीस होय. पाच वर्षे मुख्यमंत्री राहिल्यानंतर कोणाला वाटले नव्हते, पण केंद्राने निर्णय दिला, आणि देवेंद्रजींनी तो मानला. यासाठी आपण सर्वांनी त्यांना सॅल्यूट केला पाहिजे, असे सांगत सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांनी फडणवीस यांना सॅल्यूट केला.
चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राज्यात खळबळ उडाली. विरोधकांनी टीका सुरु केली. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून तो व्हिडिओ हटविण्यासाठी जोरदार दबाव निर्माण झाला व तो व्हिडिओ हटविल्या गेला. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले.  बैठकीच्या समारोपावेळी फडणवीस म्हणाले, की एकनाथ शिंदे हे आपले नेते आहेत. आपल्या सर्वांचे नेते शिंदे आहेत. मगाशी चंद्रकांतदादा म्हणाले त्यावर वेगळे अर्थ काढले. आम्ही सर्व प्रक्रियेत एक होतो. माध्यमांचे कामच असते वेगवेगळे अर्थ काढणे, त्याकडे दुर्लक्ष करा. हे सरकार अडीच वर्षे पूर्ण करेल, पण पुढेदेखील सत्तेत येईल. या संघर्षाच्या दरम्यान केंद्रातील पक्ष आपल्या मागे होता. अमित शाह हे आपल्या मागे पहाडासारखे उभे होते. काही मूर्ख लोक मोदींवर टीका करत होते. मी ठरवले होते बाहेर राहून काम करावे. पण मला ज्येष्ठानी सांगितले, तू उपमुख्यमंत्री हो. मग मी शपथ घेतली. मला जर माझ्या नेत्यांनी सांगितले असते तू घरी जा तर मी गेलो असतो. असेही फडणवीस याप्रसंगी म्हणाले. मगाशी चंद्रकांत पाटील यांनी काही गोष्टी सांगितल्या. त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. चंद्रकांत पाटील यांनी एवढेच सांगतिले, की आपल्याला हे माहिती नव्हते. आपल्याला वाटले आपलेच सरकार येणार आहे. आपलाच मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहे. अचानक हा निर्णय आल्यामुळे धक्का बसला. याचा अर्थ त्यांना किंवा आपल्या कुणाला एकनाथ शिंदे मान्य नाहीत किंवा आपले वेगळे मत आहे, असे अजिबात नाही. तर त्या सगळ्या प्रक्रियेत आम्ही सगळे एकत्रित होतो. आता शिवसेना आणि भाजपचे सरकार आहे. हे सरकार अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेलच, त्यासोबत जास्तीत जास्त जागांवर विजय मिळवून पुन्हा सत्तेत येईल, असेही फडणवीस यांनी नीक्षून सांगितले.

मंत्रिपदासाठी तडजोड करावी लागेल; फडणवीसांचा स्वपक्षीयांना सूचक इशारा!
महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले असले तरी, मंत्रिमंडळ विस्ताराचा पेच अद्याप सुटलेला नाही. खाते वाटप, व सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला असल्याचे राजकीय सूत्राने सांगितले. याबाबत फडणवीस यांनी यावेळी भाष्यही केले. आपल्या पक्षात या विस्तारात येऊ शकणारे पात्र असलेले नेते खूप आहेत. कारण मोठा पक्ष आहे. अनुभवी, चांगले नेते आहेत. असेही काही आमदार आहेत जे मंत्री झाले नाहीत, पण त्यांनी कामाची चुणूक दाखवली आहे. सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत, असे सांगून फडणवीस यांनी स्वपक्षीय आमदारांना सूचक इशाराही यावेळी दिला. मंत्रिपदासाठी सगळ्यांचा विचार करावा लागेल पण विचार करायला तेवढ्या जागाच नाहीत. त्यामुळे तिथेही काही तडजोड आपल्याला करावी लागेल. पण मला निश्चितपणे विश्वास आहे की, जो निर्णय पक्ष घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी सगळे लोक उभे राहतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

विधानपरिषदेसाठीही फार अपेक्षा ठेवू नका!
विधानपरिषदेसाठी १२ आमदार आहेत. या जागेसाठी २०० इच्छुक या सभागृहात आहेत. तर १२०० लोक मला बायोडाटा देऊन गेले आहेत. मात्र, सर्व नियमांचा विचार करावा लागेल. त्यातल्या काही जागा या शिवसेनेला द्याव्या लागेल. काही जागा आपल्याला मिळतील. मागच्या अडीच वर्षात आपण भरपूर संघर्ष केला. संघर्षाच्या काळात आपण एक होतो. आता समाजासाठी काम करायचं आहे, म्हणून एकजूट महत्वाची आहे. आपला घराणेशाही मानणारा पक्ष नाही. भाजप ही कोणाची खासगी कंपनी नाही’, असेही फडणवीस याप्रसंगी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!