– विदर्भात पहिलाच वाळूतस्कर एमपीडीए कायद्यांर्गत थेट तुरूंगात
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी करून महसूल प्रशासनाच्या नाकात दम आणणारा आणि स्थानिक ग्रामस्थांनाही गुंडगिरी करणार्या कुख्यात वाळूतस्कर मनोज उर्फ मनेष उर्फ मुन्ना वाघ (वय ३५, रा. डिग्रस ता. देऊळगावराजा) याला एमपीडीए कायद्यानुसार ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आले आहे. महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, तसेच औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्तींच्या विघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी एपीडीए कायदा करण्यात आला आहे. यात आरोपीला एका वर्षासाठी तत्काळ स्थानबध्द (तुरूंगवास) करण्यात येते. याविरोधात केवळ उच्च न्यायालय व मंत्रालयात दाद मागता येते. मुन्ना वाघ याच्याविरोधात झालेली कारवाई ही जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील वाळूतस्कराविरूद्धची पहिलीच कारवाई ठरली आहे.
खडकपूर्णा नदीपात्रातील वाळू घाटांतून वाळूची चोरी करून अवैध वाहतूक व विक्री करणे, शासकीय कर्मचार्यांवर जीवघेणे हल्ले करणे, शासकीय कामकाजामध्ये अडथळे निर्माण करणे, आदी प्रकारचे अनेक गंभीर गुन्हे मनोज वाघ याच्यावर दाखल आहेत. पोलिसांनी यापूर्वी अनेकवेळा त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याचे वर्तन सुधारले नव्हते. तो कायद्याला जुमानत नसल्याने याची गंभीर दखल घेऊन त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी वाळूतस्कर मनोज वाघ याला स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांना सादर केला होता. सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच स्वत:च्या स्त्रोतांद्वारे माहिती मिळवल्यानंतर वाघ हा सराईत गुन्हेगार असल्याची खात्री झाल्याने जिल्हाधिकारी पाटील यांनी त्याला एक वर्षसाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश १ जुलैला पारित केला. पोलिसांनी काल दिनांक २ जुलैरोजी वाघ याला अटक करून अकोला कारागृहात स्थानबध्द करून डांबले आहे. या कारवाईने वाळूतस्करांत चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
———–
जिल्ह्यात वाळूतस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्यातून अनेक गुन्हे समोर येत आहेत. गुन्हेगारीचे मूळ असलेल्या वाळू तस्करीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी अनेक गुन्हेगारांची कुंडली तयार केली आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायदा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी या गुन्हेगारांची सर्व माहिती संकलित करून त्यांच्याविरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे एका पोलिस अधिकार्याने सांगितले आहे. त्यामुळे नजीकच्या काळात आणखी काही वाळूतस्कर थेट तुरूंगात दिसणार आहेत.
————