टार्गेट वाढवूनही आठवड्यापासून ज्वारीचा ‘दाणा’ही खरेदी नाही!
– खरेदी केंद्रावर चकरा मारून शेतकरी वैतागले!
– अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष घालण्याची गरज!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – केंद्र शासनाने पणन महासंघाला राज्यात अतिरिक्त ६ लाख ८४ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट नुकतेच दिले. परंतु, राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून ऑनलाईन कामासाठीचे कंत्राट दुसर्या कंपनीला दिल्यामुळे पूर्वीच्या कंपनीचे पोर्टल बंद पडले आहे. परिणामी, राज्यात पणन महासंघाकडून आठवड्यापासून ज्वारीचा दाणाही खरेदी झाला नसल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. ज्वारी खरेदी व्हावी, यासाठी शेतकरी मात्र खरेदी केंद्रावर चकरा मारून वैतागले आहेत. याकडे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जातीने लक्ष देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, उद्दिष्टवाढ कशी आवश्यक आहे याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने २० जूनरोजी वस्तूनिष्ठ व सडेतोड वृत्त प्रकाशित केले होते. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनीदेखील संबंधित मंत्रालयाकडे तशी मागणीवजा शिफारस केली होती.
बाजारभावापेक्षा हजार ते बाराशे रुपये प्रतिक्विंटल भाव जादा मिळत असल्याने सहाजिकच राज्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने पणन महासंघाकडे ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केली. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील हा आकडा पंचवीस ते तीस हजाराचे जवळपास आहे. यासाठी या अगोदर पणन महासंघाला केंद्र शासनाकडून १ लाख ३६ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे देण्यात आलेले उद्दिष्ट होते तर बुलढाणा जिल्ह्याचे उद्दिष्ट ३३ हजार क्विंटल होते. सदर उद्दिष्ट संपण्याच्या मार्गावर असताना व काही जिल्ह्यात संपलेले असताना राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने केंद्राच्या अन्न व वितरण विभागाकडे अतिरिक्त ज्वारी खरेदीचे उद्दिष्टासोबत खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. याबाबत केंद्रीय मंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनीदेखील केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाकडे तशी शिफारस केली होती. विशेष म्हणजे, याबाबत वस्तूनिष्ठ व सडेतोड वृत्तदेखील ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने २० जूनरोजी प्रकाशित केले होते. याची गंभीर दाखल घेत केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने राज्यासाठी अतिरिक्त ६ लाख ८४ हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट मंजूर केले. सदर उद्दिष्ट जिल्हानिहाय वाटपदेखील करण्यात आल्याची माहिती आहे.
या मध्ये बुलढाणा जिल्ह्याला १ लाख ७० हजार क्विंटल ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट मिळाले आहे, व खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढदेखील मिळाली होती. परंतु आता राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून धान्य व भरडधान्य खरेदीची ऑनलाईन कामे करण्यासाठी बीईएएम या कंपनीसोबत करारनामा करण्यात आला आहे. परिणामी, पूर्वीच्या एनईएमएल या कंपनीचे पोर्टल बंद पडले आहे. त्यामुळे शेतकरी नोंदणी, प्लॉट नोंदणीसह इतर आवश्यक बाबींची नोंदणीकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे २७ जूनपासून म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून ज्वारीचा दाणाही खरेदी झाला नसल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. पणन महासंघाला ३१ जुलै ज्वारी खरेदी करण्यासाठी अंतिम तारीख दिली असल्याने त्या अगोदर ज्वारी खरेदी झाली पाहिजे, यासाठी शेतकरी मात्र खरेदी केंद्रावर चकरा मारताना दिसत आहेत. याबाबत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यातील १८ खरेदी केंद्रावरील ज्वारी खरेदी यामुळे बंद असून, एक-दोन दिवसात मार्ग निघेल, अशी आशा जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी व्यक्त केली आहे.