Head linesSINDKHEDRAJAVidharbha

‘खडकपूर्णा’तील वाळूतस्करांचे महसूल प्रशासनाने कंबरडे मोडले!

- देऊळगावघुबेतील वाळूतस्करालाही दणक्यांवर दणके! - धरणातून वाळूउपसा करणारी आणखी एक बोट केली नष्ट

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – खडकपूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेली वाळूतस्करी रोखण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी जोरदार कंबर कसली असून, वाळूतस्करांवर कारवाईचे धडाकेबाज सत्र सुरू केले आहे. धरणपात्रात बोटीने वाळूउपसा करणार्‍या तस्करांना दणक्यांवर दणके सुरू असून, आजदेखील एक बोट उद््ध्वस्त केली आहे. दरम्यान, देऊळगाव घुबेसह इतर गावांतील वाळूतस्करांना गेल्या आठवडाभरापासून महसूल प्रशासनाने जोरदार झटके दिले असून, त्यांच्यावर कारवाईचे सत्र अवलंबविले आहे.

सविस्तर असे, की बुलडाणा जिल्हात सर्वात जास्त रेतीची चोरटी वाहतूक देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यात महसूल व पोलिस प्रशासनाच्या मदतीने रात्री व दिवसा खुलेआम करण्यात येते. ह्या सर्व प्रकाराला लगाम लावेल कोण, तक्रारी करून काहीच होत नाही, त्यामुळे शिंदे सेनेचे संतोष भुतेकर यांनी उपोषण सुरू केले होते. त्याची दखल घेत आता महसूल प्रशासन जागे झाले असून, त्यांनी धाडसत्र चालू केले आहे. तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाच्या विरोधात शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनिल चित्ते यांनीसुद्धा दि. २३ सप्टेंबरपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला असून, त्याचा धसका महसूल व पोलिस प्रशासनाने घेतला असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसापूर्वी खडकपूर्णा प्रकल्पातील तीन बोटी महसूल व पोलीस यांच्या संयुक्त पथकाने जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या होत्या. तेच सातत्य राखत सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि.१८) देऊळगावराजा तालुक्यातील पोलीस व महसूल यांच्या संयुक्त पथकाद्वारे अवैध रेती उपसा करणार्‍या बोटींवर कारवाई करण्याचे अनुषंगाने मौजे दगडवाडी, मेहुणाराजा, बायगाव, चिंचखेड व सुलतानपूर या भागात शोधमोहीम राबविण्यात आली. त्या ठिकाणी त्यांना मौजे मेहुणाराजा येथील खडकपूर्णा धरणाजवळ अवैध रेती उपसा करणारी एक बोट मिळून आली. या पथकाने ही बोट पाण्यातच जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट करून टाकली. तसेच त्या ठिकाणी आढळून आलेला जवळपास २५ ब्रास रेतीचा साठा मौजे मेहुणाराजा येथील घरकुल लाभधारकांना देण्यात आला. वाळूतस्करी करणार्‍यांच्या बोटीवर धडक कारवाई होत असल्यामुळे अवैध रेतीतस्करी करणार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. ही कारवाई करताना उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा.संजय खडसे, देऊळगावराजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, ठाणेदार विकास पाटील पोलीस स्टेशन अंढेरा, तलाठी तागवाले, देशपांडे, चिकटे, विलास नागरे, बुरकुल, खरात, तांबे, शिपाई अर्जुन सोनसळे, कोतवाल शरद काकडे, अश्विनी आंधळे, संदीप चेके, मारुती बंगाळे आदींचादेखील या कारवाईत समावेश होता. यापुढेही अवैध रेती उपसा करणार्‍या बोटी व वाहनांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे सिंदखेडराजा यांनी दिला आहे.

दरम्यान, विश्वासनीय सूत्रांच्या माहितीनुसार, देऊळगाव घुबे येथील राजकीय वरदहस्त लाभलेला वाळूतस्करदेखील महसूल व पोलिस प्रशासनाच्या धडाकेबाज कारवाईने चांगलाच अडचणीत आला आहे. या वाळूतस्करामुळे आपण राजकीयदृष्ट्या अडचणीत येत असल्याचे पाहून त्याला ज्या राजकीय नेत्याचा वरदहस्त होता, त्यांनीदेखील त्याच्या डोक्यावरून आपला हात काढून घेतला असल्याची जोरदार चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!