BuldanaBULDHANAHead linesVidharbha

पीकविमा, नुकसान भरपाई न देता शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून ‘लाडक्या बहिणीच्या सन्माना’साठी मुख्यमंत्री उद्या बुलढाण्यात!

- महापुरूषांच्या पुतळ्यांसह विविध विकासकामांचे करणार लोकार्पण! - गर्दी जमवण्यासाठी ४०० एसटी बसेस बहिणींच्या दिमतीला, प्रशासनाकडून चोख व्यवस्था!

– प्रवाशांचे होणार हाल, खाजगी प्रवासी वाहतूकदार होणार मालामाल?
– कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची घोषणा फोल; कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना छदामही मिळाला नाही?; रविकांत तुपकर काही धक्कातंत्राचे आंदोलन उद्या करतील का?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या नावाने असलेल्या योजनेतून महिलांना शासनाकडून दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. या योजनेच्या लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणीच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (दि.१९) दुपारी १२.२० वाजता बुलढाण्यात येत आहेत. यावेळी शहरातील महापुरुष व संतांच्या पुतळ्यांचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. दरम्यान, लाडक्या बहिणीच्या दिमतीला जवळपास ४०० एसटी बसेसची सोय करण्यात आली असून, विशिष्ठ ठिकाणी जेवणाचीदेखील व्यवस्था केली असल्याची माहिती हाती आली आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख व्यवस्थादेखील केली आहे. अगोदरच एसटी बसेस कमी, त्यातच कार्यक्रमासाठी त्यातीलच बसेस घेण्यात आल्याने प्रवाशांचे मात्र हाल होणार असून, खाजगी वाहनधारक मात्र याचा गैरफायदा घेत आपले खिसे भरणार तर नाही ना? अशी भीतीदेखील व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, गेल्यावर्षीच्या कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना भावांतर योजनेतून हेक्टरी ५ हजार रूपये हे दि.१० सप्टेंबरपासून खात्यात जमा करणार असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केले होते. परंतु जिल्ह्यातील शेतकर्‍यांना अद्याप छदामही मिळाली नाही. पीकविमा, पीक नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून मुख्यमंत्री मात्र लाडक्या बहिणींना फुकट पैसे वाटून त्यांच्या मतांवर डोळा ठेवून असल्याने शेतकर्‍यांतून तीव्र संतापाची लाट आहे. शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे काही धक्कातंत्र वापरून आंदोलन करतात की काय, याबाबतदेखील शेतकरीवर्गातून चर्चा सुरू होती.

यावर्षीही सोयाबीन पिकाला विविध रोगांनी ग्रासले असल्याने दाणे परिपक्व न होताच उभे सोयाबीन वाळले आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असून, शेतकरी आणखी चिंतेत सापडला असल्याने, हे शेतकर्‍यांचे सरकार आहे, असे सांगणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जिल्ह्यातील शेतकरी मदतीची आस लावून बसला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ राज्यात सुरू केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये मदत दिली जाते. जिल्ह्यातही या योजनेअंतर्गत महिलांना दोन महिन्याची मदत मिळाली आहे. सदर योजनेतील लाडक्या बहिणीचा सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरूवारी (दि.१९) दुपारी १२.२० वाजता बुलढाणा शहरात येत आहेत. यादरम्यान शहरातील महापुरूष व संतांच्या पुतळ्याचे लोकार्पणदेखील मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था करण्यात आली असून, कामाची विभागणी करून देण्यात आली आहे. लाडक्या बहिणीच्या दिमतीला जवळजवळ ४०० एसटी बसेस प्रासंगिक करारावर घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील बसेस अपुर्‍या पडतात म्हणून की काय, म्हणून अकोला, जालना, जळगाव जिल्ह्यातूनही बसेस मागवण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये जिल्ह्यातील चिखली आगारातून ७६ पैकी २१ बसेस, खामगाव आगार ४९ पैकी ३२, शेगाव आगार ४१ पैकी २५, बुलढाणा आगार ६७ पैकी ४० मलकापूर आगार ५० पैकी ३५ तसेच जळगाव जामोद आगाराच्याही काही बसेस यासाठी घेतल्याची माहिती आहे. त्याचबरोबर अकोला, जालना व जळगाव जिल्ह्यातील जवळजवळ २०० बसेस प्रासंगिक करारावर मागवण्यात आल्या असून, सदर बसेस जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे. रात्री उशिरापर्यंत प्रशासन याबाबतचे नियोजन करण्यात व्यस्त दिसून आले होते. अगोदरच जिल्ह्यातील आगारांना बसेस कमतरता असून, त्यातील बहुतांश बसेस सदर कार्यक्रमासाठी घेण्यात आल्या असल्याने गुरूवारी प्रवाशांचे प्रचंड हाल होणार असून, त्याचाच गैरफायदा घेत खाजगी वाहतूकदार मात्र प्रवाशांची लूट करणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या कापूस, सोयाबीन उत्पादन शेतकर्‍यांना भावांतर योजनेअंतर्गत हेक्टरी ५ हजार रुपयाची मदत शासनाने जाहीर केली होती. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सदर मदत दि. १० सप्टेबरपासून शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करणार असल्याचे सांगितले होते. परंतु, राज्य सरकारने सर्व पैसा लाडक्या बहिणींना देण्यासाठी वळविला असल्याची चर्चा असल्याने, अद्यापही जिल्ह्यातील शेतकर्‍यांना छदामही मिळाली नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शेतकरी रोष व्यक्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यावर्षीही सततचा पाऊस व नंतर तापलेले कडाक्याचे उन यामुळे सोयाबीनवर रोग व अळींचा हल्ला झाला असून, परिपक्व न होताच लाखो हेक्टरवरील उभे सोयाबीन वाळत आहे, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. याबाबतही मदतीची घोषणा हे शेतकर्‍यांचे सरकार आहे असे ठासून सांगणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतील का, अशी आस शेतकरी लावून बसला आहे.


काँग्रेस देणार शेतकर्‍यांनी रक्ताने लिहिलेले निवेदन

उद्या (दि.१९) दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांना जिल्हा काँग्रेसच्यावतीने सोयाबीनला भाववाढ, सरसकट कर्जमाफी, पीकविमा, सिंचन अनुदान आदी शेतकर्‍यांच्या मागण्यांबाबत शेतकर्‍यांनी रक्ताने लिहलेले निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी दिली आहे. याप्रसंगी काँग्रेसचे नेते, सर्व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख कार्यकर्तेदेखील उपस्थित राहणार आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पीकविमा व इतर शेतकरीप्रश्नी नुकतेच अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुपकरांची नुसत्या कोरड्या आश्वासनावर बोळवण केली होती. त्यामुळे शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर हे उद्या काही धक्कातंत्र वापरत मुख्यमंत्र्यांचे शेतकरीप्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी काही आंदोलन करतात का, याकडेही शेतकरीवर्गाचे लक्ष लागून आहे.
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!