आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर श्री संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी विविध धार्मिककार्यक्रमानी साजरी झाली. यावेळी माऊली मंदिरातील विना मंडपात ह. भ. प. अविनाश महाराज गरड यांची सुश्राव्य कीर्तन सेवा हरिनाम गजरात झाली. यावेळी कीर्तनसेवेस साथ संगत श्रीकृष्ण महाराज कोलते, बालाजी महाराज मोहिते, उदय महाराज चोरगे, अशोक महाराज सालपे, पुथ्वीराज महाराज कराळे यांचेसह श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थे तील साधक विद्यार्थी यांनी दिली. या प्रसंगी माऊलींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे, माऊली महाराज सावर्डेकर, आळंदीधाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर आदीसह भाविक, श्रोते उपस्थित होते. गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त कीर्तन सेवा संपताच पुष्पवृष्टी, हरिनामाचा गजर जयघोष भाविकांनी केला. श्रींचे दर्शन, महाप्रसाद वाटप भक्तिमय वातावरणात करण्यात आले.
आळंदीत सर्व संतांच्या पुण्यतिथी, समाधी सोहळे सर्व भाविक, वारकरी, वारकरी संप्रदायाचे माध्यमातून एकत्रित साजरी करण्याचे अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज वीणा मंडपामध्ये श्री संत गोरोबा काका यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून कीर्तन सेवेस सुरुवात करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या गुणीजण विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उपस्थितीमध्ये कीर्तनाला सुरुवात झाली. कीर्तनकार महाराजांनी श्री संत गोरोबा काका यांच्या अभंगावरती उपस्थित भावीक भक्तांना त्यांचे जीवनातील अनेक दाखले देऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.
पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, मावळ, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, राजगड ( वेल्हे ) या तालुक्यांमध्ये गोरोबा काका यांची पुण्यतिथी सर्वत्र साजरी करण्यात आली. ज्ञानेश्वर महाराज मंदिरामध्ये कार्यक्रमासाठी श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी व संस्थेचे अध्यक्ष ह. भ.प मोहन महाराज शिंदे, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ रंधवे यांचे प्रयत्नातून उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महिला भगिनी व वारकरी विद्यार्थी यांची उपस्थित होते. दुपारी बारा वाजता पुष्पवृष्टी झाल्यानंतर श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर कमिटी यांच्या वतीने कीर्तनकार यांना शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.