मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर रस्त्याचे काम निकृष्ट; खड्डे भरताना माती न काढताच डांबर टाकले!
– ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिका-यांवर कारवाई करा; ‘सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समिती’चे कार्यकारी अभियंत्यांना पत्र
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – मेरा बुद्रूक ते अंत्री खेडेकर या रस्त्याचे काम धीम्यागतीने सुरू तर आहेत, पण ते अतिशय निकृष्टदर्जाचे होत असल्याने परिसरातील गावांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वारंवार अपघात होत असून, अनेकांचे जीव गेले तर अनेकजण जायबंदी झालेले आहेत. सद्या ठेकेदार खड्डे भरत असून, खड्ड्यातील माती न काढताच त्यात डांबर ओतले गेले आहे. तसेच, साईडपट्ट्यादेखील मातीमिश्रीत मुरूमाने भरण्यात आलेल्या आहेत. या रस्त्याचे काम लवकरात लवकर व दर्जेदार करण्यात यावे, तसेच संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत ठाकून कठोर कारवाई करावी, तसेच कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करणार्या अभियंत्याची तातडीने बदली करावी, या मागणीसाठी सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने उपविभागीय अभियंता देऊळगावराजा यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता बुलढाणा यांना सविस्तर निवेदन दिले आहे. तसेच, याबाबत मेरा बुद्रूक, अंत्री खेडेकर येथील एक शिष्टमंडळ लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील मौजे मेरा बुद्रूक ते अंत्रीखेडेकर या रस्त्याचे काम धीम्यागतीने कितीतरी दिवसांपासून सुरू आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्यादेखील मुरूम मिक्स करून भरल्या गेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश भाले यांना वारंवार सांगूनसुद्धा त्यांनी या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष चालवलेले आहे. या रस्त्यावरील खड्डे आता ठेकेदार भरत असून, परंतु या शासकीय ठेकेदाराने या रोडवरच्या खड्ड्यातील मातीसुद्धा काढली नाही. त्याच मातीवर थातूरमातूर डांबरीकरणाचे काम शासकीय ठेकेदार करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा एकही कर्मचारी या रोडवर फिरकलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आमच्याकडे कर्मचारी कमी असल्याचे कारण सांगून वेळ निभावून नेली. परंतु अधिकारी यांनी या कामाकडे दुर्लक्ष केल्याने कामाचा दर्जा अतोनात घसरलेला आहे. सदर काम इस्टिमेटनुसार झालेले नाही तरी अधिकारी या कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यात मिलीभगत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केला आहे.
या रोडवर यापूर्वी भरपूर अपघात झाले असून, अनेक दुचाकीस्वार जायबंदी झालेले आहेत. काही लोकांनी आपले जीवसुद्धा गमावले आहे. याचे कोणतेही सोयरसुतक बांधकाम खात्याच्या निगरगट्ठ अधिकार्यांना व ठेकेदाराला दिसून येत नाही. या रस्त्याने पुढे जगप्रसिद्ध लोणार सरोवराकडे जाता येत असल्याने या मार्गावर तशी गर्दी बरीच असते. मेरा बुद्रूक, अंत्री खेडेकर यासारखी मोठी गावेही याच रस्त्यावर येतात. त्यामुळे या रोडवर सतत रहदारी राहते. परंतु, अतिशय खराब कामामुळे रस्त्याची वासलात लागली असून, अपघातांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. या रोडचे काम व्यवस्थित झाले नाही तर सदर अपघातग्रस्त व्यक्तीच्या पत्नीच्या माध्यमातून सदर अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जाईल, असा इशाराही सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आला आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत लवकरच मेरा बुद्रूक व अंत्री खेडेकर येथील एक शिष्टमंडळ मुख्य अभियंता, व सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांसह पालकमंत्र्यांच्या भेटीला जाणार असून, बांधकाम विभागाचे अभियंता भाले व ठेकेदार यांच्याबाबत तक्रार दाखल केली जाणार आहे.