Breaking newsBuldanaBULDHANAHead linesMaharashtraMarathwadaVidharbhaWorld update

मोदींविरूद्धच्या संतापात आणखी भर; ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढल्या!

– खतांच्या प्रतिगोणीमागे २०० ते ४०० रूपयांची दरवाढ

बुलढाणा/जालना (जिल्हा प्रतिनिधी) – खरीप हंगाम सुरु होण्याला आता बोटावर मोजण्याइतक्या दिवसांचा काळ बाकी राहिला आहे. सद्या शेतीपिकांना अजिबात भाव नाही. रब्बी हंगामही वाया गेलेला आहे. सोयाबीन साडेचार हजाराच्या पुढे जात नाही. सोयाबीनला बाजारात हमी भावापेक्षाही कमी भाव आहे. कापूस ७ हजाराच्याच्या आत आहे. फरतडीच्या कापसाचे भाव चार हजारपेक्षा कमी आहेत. इतर शेतीपिकांची अवस्था अशीच असून, या भावात माल विकायचा तर उत्पादन खर्चही निघत नसताना रसायनिक खतांच्या किमतीत मात्र वारेमाप वाढ झाली आहे. आधीच मोदी सरकारविरोधात असलेल्या संतापात यानिमित्ताने आणखी भर पडली असून, शेतकरी प्रचंड संतप्त झालेला आहे. १०.२६.२६ खताची किंमत १४७० रूपये प्रतिगोणी होती ती आता १७०० वर पोहोचली आहे. २४.२४.० ची किंमत १५५० रूपये होती ती १७०० वरती पोहोचली आहे. २०.२०.०.१३ ची किंमत १२५० वरून १४५० झाली आहे. सुपर फॉस्फेट ५०० वरून ६०० झाले आहे. सुपर फॉस्फेट पाचशे रुपयांना मिळत होते, मात्र आता ५५० रुपयांना मिळणार आहे. मिश्र खते, फॉस्फेटचे दरही प्रचंड वाढलेले आहेत.
Centre Firm On Not Burdening Farmers Despite Impact On, 59% OFF
रसायनिक खते

शेतीतील वाढता खर्च, पिकवलेल्या शेतमालाला योग्य दर नाही, अवकाळीने उरलेसुरले पीकही उद्ध्वस्त करून टाकले. त्यामुळे शेतकर्‍यांचे जीवन अस्मानी व सुलतानी संकटांनी अगदी मेटाकुटीस आले आहे. यातून सावरत नाही तोच सरकारने रसायनिक खतांच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याचे जाहीर केल्याने बळीराजा मात्र पुरता हतबल झाल्याचे पहावयास मिळत आहे. हजारो रुपयांचा खर्च करून जमिनीची पूर्व मशागत करण्यात आली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. शेतकर्‍यांनी यंदा मान्सून चांगला राहील या आशेने वाढीव खर्च करून मशागतीची कामे पूर्ण केली आहेत. अशातच खतांच्या किमती वाढल्याने पैशाअभावी शेतकरी खचून गेलेला आहे. यामुळे शेतकरी बांधवांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारविरोधात तीव्र रोष पाहायला मिळत आहे. मिश्र खते, सुपर फॉस्फेट आणि पोटॅश यांच्या किमती वारेमाप वाढल्याचे दुर्देवी चित्र आहे.
सद्या सोयाबीन साडेचार हजारांच्या पुढे जाईना. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतमालाचे बाजारभाव घटणारे अन् खर्च मात्र वाढतच असल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक बजेट कोलमडून पडले आहे. त्यात गेल्या काही वर्षांत रसायनिक खतांच्या किमतीत सततची वाढ होत असल्याने शेतकर्‍यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे. राज्यात खरिपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते. यंदा मात्र खतांच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकरी हतबल होऊन बसला आहे. डिझेल दरवाढ झाल्याने ट्रॅक्टरमार्फत होणारी शेती आंतरमशागतीचा खर्च वाढला आहे. प्रतिएकर तीनशे रुपयापर्यंत नांगरणीचा खर्च वाढला असून, २ हजार रुपये प्रतिएकर नांगरणी झाली आहे. तिरी पाळीसाठी एकरी दीडशे ते दोनशे रुपये अधिकचा खर्च करावा लागत आहे. शिवाय, सोयाबीन काढणीचे दरही पाच हजार रुपये प्रतिएकर झाल्याने शेतीसाठी शेतकर्‍यांकडे आता पैसाच उरला नाही. त्यात बँकाही त्याला दारात उभे करत नसल्याने खासगी सावकारापुढे हात पसरण्याची वेळ त्याच्यावर आली आहे. उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या बाजारभावात मात्र घट होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असणार्‍या खताच्या भावातच वाढ होत असल्याने शेतीक्षेत्र आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही, असे शेतकरी म्हणत आहेत.


  • मेळचं बसत नाही शेती, माती आणि शेतकरी
    एेन खरिपात शेतकर्यावर संकट

    वाढलेले खत दर..
    खताचे नाव       जुने दर       नवे दर
    १०-२६-२६       १४७०         १७००
    २०-२०-०-१३     १२५०        १४००
    २४-२४-०          १५५०        १७००


लोकसभा निवडणूक प्रचारात एकमेकांवर चिखलफेक करण्यातच सर्वपक्षीय नेत्यांचा वेळ गेला. शेतकरयांच्या प्रश्नावर चर्चा झालीच नाही. खरं म्हणजे चोहोबाजूंनी अडचणीत आलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नावर सत्ताधार्‍यांची कोंडी करण्याची विरोधकांना संधी होती. पण, शेतकरी नेते रविकांत तुपकर व राजू शेट्टी वगळता इतर नेत्यांनी ती वाया घालविली. गडगडलेले शेतमालाचे भाव आणि वाढत जाणारे खतांचे भाव हा विषय नक्कीच प्रभावी ठरला असता. तो विषय प्रचारात आलाच नाही. त्यामुळे शेतकरी हा विषय नेहमीप्रमाणे उपेक्षितच राहिला. त्यामुळे ग्रामीण भागात मोठी अस्वस्थता पसरलेली आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!