पुणे (जिल्हा प्रतिनिधी) – थकीत वीज बिल तसेच वीज चोरीप्रकरणी कारवाई करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तीविरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई शनिवारी (दि. ३०) चाकण (ता.खेड ) येथील मुटकेवाडी, शिक्षक कॉलनी परिसरात करण्यात आली. महावितरणचे कर्मचारी रामा इबतवार (वय.३७ वर्षे, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत पंढरीनाथ येळवंडे (रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,इबतवार हे त्यांच्या सहकाऱ्यांसह चाकण येथील मुटकेवाडी, शिक्षक कॉलनी येथे थकीत वीजबील वसुलीसाठी गेले होते. यावेळी अनिकेत येळवंडे याने ही वीज बिल न भरल्यामुळे त्यालाही वीज बिल भरण्यासाठी सांगितले. यावेळी त्याने पैसे नसल्याचे सांगितले. येळवंडे याने या आधीही वीज बिल थकबाकीवरून कारवाई करत मीटरचे कनेक्शन कट केले होते. मात्र त्याच्या घरात वीज असल्याचे फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. तिथे पाहणी केली असता, येळवंडे हा त्याचे किराणा दुकान व एचडीएफसी एटीएमच्या मीटरमधून वीज चोरून वापरत असल्याचे लक्षात आले. फिर्यादी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना विजेच्या खांबावर चढून कनेक्शन कट करण्यास सांगितले.
यावेळी येळवंडे याने शिवीगाळ करत कनेक्शन कट करणाऱ्या कर्मचाऱ्यावर दगडफेक केली. तसेच इबतवार यांना शिवीगाळ करत पोलीसांकडे तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी यांनी हा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी फोन सुरु केला असता येळवंडेने त्यांचा मोबाईल फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत धक्काबुक्की करून मारहाण केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.