Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

महायुती, महाआघाडीत बंडखोरींच्या अफवांचा बुलढाण्यात बाजार गरम!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीची रंगत चढत असताना, आता काँग्रेसचे राष्ट्रीय  सरचिटणीस हर्षवर्धन सपकाळ व भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख विजयराज शिंदे यांनी बंडखोरीचे संकेत देत, बुलढाण्यातील राजकीय अफवांचा बाजार आज दिवसभर गरम ठेवला. विशेष म्हणजे, हे दोन्हीही नेते निवडणूक अर्ज भरणार असल्याचे संकेत देऊन आपले मोबाईल फोन ‘स्वीचऑफ’ करून बसले होते. सद्या राजकीय विजनवास भोगत असलेल्या या नेत्यांच्या या ‘हुल’ची राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावरील कोणत्याही नेत्याने गांभीर्याने दखल घेतलेली दिसत नाही. त्यामुळे पेल्यातील हे वादळ पेल्यातच शांत होईल, अशी शक्यता राजकीय धुरिणांनी व्यक्त केली. हे दोन्हीही नेते पक्षांतर्गत बंडखोरी करून आपले उमेदवारी अर्ज दाखल करणे तूर्त तरी अशक्य आहे, अशी माहिती राज्यस्तरावरील एका जाणकार नेत्याने दिली आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून प्रा. नरेंद्र खेडेकर, महायुतीकडून मावळते खासदार प्रतापराव जाधव यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. प्रतापरावांच्या उमेदवारीला भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख असलेले विजयराज शिंदे यांचा विरोध होता व आहे. अकोला येथील पक्षाच्या बैठकीतही त्यांनी हा विरोध दर्शविला होता. तसेच, बुलढाण्याची जागा भाजपकडे घ्या, अशी मागणी शिंदे व भाजपचे जिल्हाध्यक्ष मांटे यांनी रेटली होती. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही हा मतदारसंघ आपल्याकडे पाहिजे होता. परंतु, शिंदे गटाच्या दबावापुढे भाजपचे काही चालले नाही व ही जागा शिंदे गटाला सोडावी लागली. “नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे. त्यामुळे जो दिला तो उमेदवार एकजुटीने निवडून आणा”, असे आदेश भाजप नेतृत्वाने विजयराज शिंदे यांच्यासह सर्व नेत्यांना व आमदारांना दिलेले आहेत. परंतु, महायुतीच्या संवाद मेळाव्यात बॅनरवर फोटो नसणे, डावलले जात असल्याचे वाटत असल्याने विजयराज शिंदे हे नाराज आहेत. त्यामुळे आपणही उमेदवारी अर्ज भरणार आहोत, अशी त्यांच्यावतीने हुल उठवली गेली, आणि राजकीय अफवांचा बाजार गरम झाला. त्यानंतर, त्यांनी त्यांचा फोन ‘स्वीचऑफ’ केला. याबाबत महायुतीच्या एका वरिष्ठ नेत्याशी संपर्क साधला असता, त्यांनी नामोल्लेख टाळण्याच्या अटीवर फक्त एवढेच सांगितले, की “तुम्ही पत्रकारांनी या बाबीकडे लक्ष देऊ नये. ते (शिंदे) खरेच अर्ज भरतात का ते पाहू.. ” असे सांगून शिंदे यांना फारसे महत्व देण्यास नकार दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना शिवसेनेत परत येण्याबाबत सांगितले होते. परंतु, तेव्हा त्यांनी ती ‘ऑफर’ नाकारली होती. विजयराज शिंदे हे उद्धव ठाकरेंसोबत तेव्हाच परत आले असते तर ते आज शिवसेनेचे उमेदवारही असते, व कदाचित सहानुभूतिच्या लाटेत त्यांनी प्रतापराव जाधवांचा पराभवही केला असता. परंतु, एकदा संधी गेली की गेली. त्यामुळे आता हुल उठवून म्हणा किंवा खरोखर अर्ज भरूनही म्हणा, विजयराज शिंदे यांना फारसे काही साध्य करता येणार नाही, असे एकंदरित बुलढाण्यातील राजकीय चित्र आहे.
दुसरीकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले हर्षवर्धन सपकाळ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे निव्वळ संकेत दिले व आपला फोन ‘स्वीचऑफ’ करून ठेवला. हा दबावतंत्राचा भाग असल्याची राजकीय चर्चा आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ परत मिळविण्यासाठी काँग्रेसने महाआघाडीच्या जागावाटपादरम्यान जोरदार प्रयत्न केले होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्याची जागा सोडली नाही. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते व कार्यकर्ते आहेत. ते बंडखोरी करणे शक्य नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाआघाडीने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणायचे आहे, त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत, अशा सूचना सपकाळ यांना दिलेल्या आहेत. त्यामुळे सपकाळ हे बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता नगण्य आहे, असेही राजकीय धरिणांकडून सांगण्यात आले आहे.

https://twitter.com/harshsapkal/status/1774323768342847494/photo/1

माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव हर्षवर्धन सपकाळ यांनी मैत्रीपूर्ण लढत होईल, असे ट्विट केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. काही तासापूर्वीच त्यांनी ट्विट करून एक्सवर याबाबत संकेत दिले. “यामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत !!! बुलढाणा लोकसभा मतदारसंघात?.” बुलढाण्याची जागा काँग्रेसला सोडावी यासाठी जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. त्यांनी‌ महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि यशोमती ठाकूर यांची भेट घेतली होती. सतत काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या उमेदवारीबाबत चर्चा रंगत होती.

त्यामुळे महाआघाडी धर्माच्या पलिकडे जाऊन हर्षवर्धन सपकाळ काही करतील, असे अनेक काँग्रेस नेत्यांना वाटत नाही. देशातून मोदी-शाह राजवट हद्दपार करण्याचा निर्धार काँग्रेसने नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलेला आहे. त्या लढाईत हर्षवर्धन सपकाळ हे प्रमुख सैनिक आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या धोरणाविरोधात जाऊन ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, असे कुणालाही वाटत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या नेतृत्वाकडून देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत यापैकी कितीजण खरेच अर्ज दाखल करतात, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. दरम्यान, “हा बंडखोरी करणार, तो बंडखोरी करणार” या अफवांनी बुलढाणा जिल्हावासीयांचे मात्र जोरदार राजकीय मनोरंजन सुरू आहे.


यदाकदाचित विजयराज शिंदे व हर्षवर्धन सपकाळ हे लोकसभा निवडणुकीत उतरलेच तर त्याचा सर्वाधिक फटका हा शेतकरी नेते रविकांत तुपकर व त्यानंतर प्रा. नरेंद्र खेडेकर यांना बसेल, असे विश्लेषण मूळचे काँग्रेसचे असलेल्या व नंतर पक्षांतर केलेल्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केले. एक तर हे दोघे असे काही करणार नाही, असे सांगून व स्वतःचा नामोल्लेख टाळण्याची सूचना करून हे ज्येष्ठ नेते म्हणाले, की या निवडणुकीत प्रतापराव जाधव हे निवडून येऊ नये, जेणे करून पुढीलवेळी तरी बुलढाण्याची जागा भाजपला घेता येईल, असा काहींचा होरा आहे. त्यामुळे आरएसएस व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी, आणि मतदार हे खरेच प्रतापराव जाधवांना मते देतील की नाही? याबाबत साशंकता आहे. यापेक्षा आरएसएस व भाजपच्या मतदार, निष्ठावंतांना रविकांत तुपकर हे परवडतात. कारण, तुपकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे आहेत. तसेच, उद्या गरज पडली तर ते नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊ शकतात. त्यामुळे तुपकर हे चालणारे आहेत. तथापि, विजयराज शिंदे हे भाजप आणि शिवसेना (शिंदे-ठाकरे) यांचेही थोडीफार मते खाऊ शकतात. तसा शिंदे यांच्या पाठीमागे स्वतःचा असा मोठा मतदार नाही. परंतु, पंचरंगी लढतीत एक एक मत महत्वाचे ठरू शकते. त्यामुळे थोडीफार मतांची वजाबाकी तर होणे क्रमप्राप्त आहे. दुसरीकडे, काँग्रेसमध्ये एक मोठा गट हर्षवर्धन सपकाळ यांना मानणारा आहे. सपकाळ हे निवडून येतील की नाही, याची खात्री नाही. परंतु, जी मते तुपकर यांना जाऊ शकतात, ती मते सपकाळ खातील. तसेच, महाआघाडी धर्म म्हणून जी मते प्रा. खेडेकर यांना मिळायला हवीत, ती मतेदेखील सपकाळ खातील. त्यामुळे या दोघांच्या उमेदवारीचा प्रतापराव जाधव यांच्यापेक्षा रविकांत तुपकर आणि त्यानंतर प्रा. खेडेकर यांनाच फटका बसेल, असे या ज्येष्ठ नेत्याचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!