अनेक घराण्यांनी आमदारकी-सत्ता भोगली; पण विकास मात्र मागील पाच वर्षांतच झाला!
– भूम-परांडा-वाशी तालुक्यांतील पुणे-कात्रज परिसरात राहणार्या नागरिकांचा कौटुंबीक संवाद मेळावा उत्साहात
– सावंत साहेबांनीच खुंटलेल्या विकासाला पाझर फोडला, शेतशिवारात पाणी खेळवलं, मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविला : गिरीराज सावंत
पुणे (विशेष प्रतिनिधी) – भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघात अनेक घराण्यांनी अनेक वर्षे सत्ता-आमदारकी भोगली; पण मतदारसंघाचा विकास तर झाला नाहीच; उलट तो खुंटला. गेल्या ६० वर्षांत जी कामे झाली नाहीत, ती कामे मागील पाच वर्षांत झालीत. राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी केलेली विकासकामे डोळ्यांनी दिसत आहेत, कागदावरच्या योजना त्यांनीच प्रत्यक्षात आणल्यात, अशा शब्दांत ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठान’चे संस्थापक गिरीराज तानाजीराव सावंत यांनी राजकीय विरोधकांच्या टिकेला पुण्यातून जोरदार प्रत्युत्तर दिले. चौफेर फटकेबाजी करताना ते म्हणाले, की तानाजी सावंत यांनीच खुंटलेल्या विकासाला पाझर फोडला, शेतशिवारात पाणी खेळवलं, मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलविला, आणि दुष्काळी तालुक्यांचा कलंक पुसला. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती आता गतिमान झाली आहे. तब्बल १३,५०० कोटी रूपयांचा निधी साहेबांनी मतदारसंघात खेचून आणला आहे. राजकारण हे होतच राहते, आपण समाजकारणाचा धागा हाती धरून राजकारण करतो, असेही त्यांनी राजकीय विरोधकांना ठणकावून सांगितले.
पुणे येथील ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठान’च्यावतीने मूळचे भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील रहिवासी, परंतु सद्या पुणे-कात्रज परिसरात राहणार्या नागरिकांचा कौटुंबीक संवाद मेळावा कात्रजस्थित जेएसपीएमच्या कॉर्पोरेट कार्यालयात बुधवारी (दि.२१) रात्री पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गिरीराज सावंत हे बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या तुफान भाषणातून त्यांनी मतदारसंघातील राजकारणावर सकारात्मक भाष्य तर केलेच; पण मंत्री तानाजीराव सावंत यांच्यावर मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय हल्ल्यांनाही चोख प्रत्युत्तर दिले. भूम-परांडा-वाशी मतदारसंघातील पुणे शहरात राहणार्या नागरिकांची संघटना बांधणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
गिरीराज सावंत म्हणाले, की भूम-परांडा-वाशी विधानसभा मतदारसंघात अनेक घराण्यांनी अनेक वर्षे सत्ता-आमदारकी भोगली. या भागाचा ६० वर्षांनंतरही विकास होऊ शकला नव्हता. परंतु, २०१९ मध्ये आपण सर्वांनी ३३ हजार मतांच्या फरकाने तानाजीराव सावंत यांना विधानसभेत पाठवले, आणि या तीनही तालुक्यांचे भाग्य पालटले. कृष्णा-मराठवाडा उपसा सिंचन योजना निव्वळ कागदावर होती. ही योजना कागदावरून प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सावंत साहेबांनी केले. मध्यंतरी वेगळ्या विचारांचे सरकार सत्तेवर आले नसते, तर आजच ही योजना पूर्ण झालेली दिसली असती. परंतु, तरीही ९० टक्के काम पूर्ण झालेल्या या योजनेचे फक्त तीन किलोमीटरचे काम बाकी असून, येत्या मे महिन्यात ‘उजनी’चे पाणी सीना-कोळेगाव धरणात पोहोचेल म्हणजे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अगोदरच्या सत्ताधार्यांनी व वारंवार आमदारकी भोगणार्या घराण्यांनी भूम, परांडा, वाशी हे तालुके कायम दुष्काळी ठेवले होते. या भागाला विकास काय असतो, हे कधी दाखवलेच नव्हते. परंतु, दुष्काळाचा हाच कलंक पुसण्यासाठी तानाजी सावंत साहेबांनी स्वखर्चातून ‘शिवजलक्रांती’ योजना राबवली. गावखेड्याचे अर्थकारण शेतीभोवती फिरते. शेतीला पाणी असेल तर गावखेड्यात पैसा जातो. ही बाब हेरूनच ‘शिवजलक्रांती’वर स्वतःच्या खिशातून कोट्यवधी रूपये खर्च करण्यात आले. आज या योजनेच्या झालेल्या ५०० किलोमीटरच्या कामांतून अडिचशेपेक्षा अधिक गावखेड्यांतील नद्या-नाले तुडूंब भरलेली आहेत. कमी पाऊस होऊनदेखील शेतीपिकांना, विहिरींना पाणी आहे. ही जलक्रांती घडविण्यासाठी विकासाचा दृष्टीकोन असावा लागतो, दातृत्वाची दानतही असावी लागते. राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी; पण आम्ही समाजकारणाचा धागा धरून राजकारणात काम करतो, असेही सावंत यांनी राजकीय विरोधकांना ठणकावले.
विकासाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती खंडित होऊ द्यायची नसेल तर, पुन्हा एकदा सावंत साहेबांना मागील वेळेपेक्षाही अधिक मतांनी विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे, असेही गिरीराज सावंत यांनी सांगून, आपण सर्व पुण्यात पोटं भरण्यासाठी आलोत, गावातून स्थलांतरीत झालोत. कारण काय तर गावाकडे रोजगार नव्हता, शेतीला पाणी नव्हते. आरोग्य, रस्ते यांच्या सुविधा नव्हत्या. मुलाबाळांच्या शिक्षणाची चांगली सोय नव्हती. परंतु, आता आपल्या पुढील पिढीला गाव सोडण्याची गरज भासणार नाही. तीनही तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी, शेतीला पाणी, रस्ते, आरोग्याच्या सुविधा, शाळांचे अत्याधुनिकरण होत आहेत. आमच्यासह आपण सर्वच गावाकडून पुण्यात पोटाची खळगी भरण्यासाठी आलो असलो तरी, येथेही आपण आपला दबदबा निर्माण केला. पुण्यात आपल्या सर्वांच्या सहकार्यासाठी ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठान’ अहोरात्र कार्यरत आहेच, असे सांगून तानाजी सावंत साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच वेळ असल्याचे आवाहन गिरीराज सावंत यांनी याप्रसंगी केले.
या संवाद मेळाव्याची सुरूवात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. याप्रसंगी प्रारंभी ज्येष्ठ नेते चंद्रकांत सरडे, ज्योतीराम पिंगळे (नाना), उद्योजक प्रकाश पवार या प्रमुख मान्यवरांसह, कृष्णा जाधव, प्रा. डॉ. शरद जाधव, प्रशांत पाटील, अॅड. राजेश उगलमुगले या मतदारसंघातील नागरिकांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मंत्री तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात केलेल्या विकासकामांमुळे आमच्या भागाचा चेहरामोहरा बदलला असून, आम्ही रोजगार, नोकरीसाठी पुण्यात आलोत; पण आमच्या पुढील पिढीला गाव सोडण्याची वेळ येणार नाही. विकासाची हीच गती कायम ठेवण्यासाठी सावंत साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवण्याची गरजही या नागरिकांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन करून, उपस्थितांचे आभार कुमार पाटील यांनी व्यक्त केले.
तुमच्या अनेक पिढ्यांनी सत्ता भोगली; कागदावरचा विकास आम्हीच प्रत्यक्षात उतरविला!
– गिरीराज सावंत यांचा नामोल्लेख टाळून राहुल मोटे यांना जोरदार टोला!
भूम-परांडा-वाशीचा कायापालट करण्यासाठी तब्बल साडेतेरा हजार कोटींचा निधी मतदारसंघात खेचून आणणारे तानाजीराव सावंत हे राज्यातील प्रभावशाली आमदार ठरलेत. आरोग्य केंद्रे, जिल्हा रूग्णालयाचे विस्तारीकरण, महिलांसाठी स्वतंत्र स्त्री रूग्णालये, ग्रामीण आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन, प्रत्येक तालुक्यांतील रस्तेविकास, तीनही तालुक्यांच्या ठिकाणी एमआयडीसी, पाणी पुरवठा, शाळांचे आधुनिकीकरण, आणि सिंचनासाठी कायमस्वरूपी व शाश्वत पाण्याची सोय ही कामे तानाजी सावंत यांनीच मतदारसंघात उभी केली आहेत. राजकीय टीकाटिपण्णी तर होतच राहील, पण साहेबांनी जे काम केले, ते अनेकांच्या अनेक पिढ्यांनाही करता आले नाही, असा टोला नामोल्लेख टाळून गिरीराज सावंत यांनी माजी आमदार राहुल मोटे यांना लगावला.
माजी आमदार राहुल मोटे यांनी अलीकडेच आपल्या भाषणात ‘तानाजी सावंत यांचा विकास फक्त कागदावर दिसतो’, असा टोला हाणला होता. त्याला चोख प्रत्युत्तर देताना, कृष्णा-मराठवाडा सिंचन योजना फक्त कागदावरच होती, या योजनेला ११,७२३ कोटी रूपयांचा निधी तर आणलाच; पण ही योजना ९० टक्के पूर्ण करून कागदावरून प्रत्यक्षात उतरवली. त्यांच्या पिढ्यान पिढ्याच्या काळात ‘आकांक्षित जिल्हा, दुष्काळी जिल्हा’ अशी या भागाची ओळख होती. ज्यांना कागदावर विकास दिसतो, त्यांनी ‘शिवजलक्रांती’तून भरलेले नद्या, नाले, ओढे पहावेत; पाण्याने भरलेल्या विहिरी पहाव्यात; झालेले रस्ते, काम सुरू असलेली जिल्हा रूग्णालये पहावीत, अशी जोरदार टोलेबाजीही गिरीराज सावंत यांनी केली. विकास ही निरंतर प्रक्रिया आहे, ती सुरूच राहणार आहे. परंतु, भूम-परांडा-वाशी तालुक्यांसाठी ती सावंत साहेबांनीच गतिमान केली, असेही गिरीराज सावंत यांनी राजकीय विरोधकांना ठणकावून सांगितले.