मेहकर (तालुका प्रतिनिधी) – संत तुकाराम महाराज हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक बुरूज असून, त्यांच्या अभंगांनी जगाला कवेत घेतले आहे, आणि त्यांच्या विचारांनी शिवछत्रपतींची जडणघडण झाली आहे, असे प्रतिपादन निवृत्त सहसचिव सिद्धार्थ खरात यांनी जानेफळ येथे दिंडी सोहळ्यात केले. श्री संत आश्रूबाबा महाराज संस्थान जाफ्राबाद यांच्यावतीने जाफ्राबाद ते शेगाव अशी दरवर्षी दिंडी काढण्यात येते. या दिंडीच्या काल, दि.२१ ऑगस्टरोजी जानेफळमुक्कामी माजी सनदी अधिकारी सिद्धार्थ खरात यांनी समस्त वारकरी बांधव आणि भगिनींशी हृदयसंवाद साधला, व आश्रुबाबा महाराज यांच्या तसबिरीचे दर्शन घेतले. संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे हजारो वारकरी पायीवारीने निघाले असता, सद्या पावसाचे वातावरण असल्यामुळे वारकर्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून सर्व भाविकांना त्यांनी रेनकोटचे वाटप केले.
पुढे बोलताना सिद्धार्थ खरात म्हणाले की, महाराष्ट्राला शूरवीर तसेच थोर समाज सुधारकांची गौरवशाली परंपरा आहे. या परंपरेचे मूळ महाराष्ट्रातल्या विविध अध्यात्मिक चळवळीमध्ये आहे. श्री संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम व सर्व संतांच्या विचारांचा मेळा इथल्या वारकरी चळवळीत आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाची आराधना करत या चळवळीने महाराष्ट्रात शौर्य आणि तेज निर्माण केले. यातूनच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे थोर समाजसुधारक निर्माण झाले, आणि हिच महाराष्ट्राची ओळख आहे. म्हणून आपण हे वेगळेपण जपले पाहिजे. आश्रुबा महाराज, वरुडीचे तेजस्वी महाराज, लोणीचे सखाराम महाराज, श्री संत गजानन महाराज यांच्या वारकरी सांप्रदायाच्या चळवळीचे आपल्या भागात मुख्य केंद्र राहिले आहे. गोरगरीब व सामान्य माणसाला त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणीतून दुःख हरणासाठी या भजन कीर्तन आणि प्रबोधनाने मदत होते, असेही सिद्धार्थ खरात यांनी सांगितले.
यावेळी अमोल महाराज सरकटे यांनी सिद्धार्थ खरात यांचा सत्कार केला. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, सदाशिव महाराज मुंढे, गजानन महाराज ओव्हर, संजय घायाळ, पांडुरंग ओव्हर, नीलेश वाघमारे, राम राजगुरू, श्रीराम ओव्हर, स्वप्निल ओव्हर, निखिलेश हाडे, गजानन मोरे आदी यावेळी उपस्थित होते.