मुंबई (खास प्रतिनिधी) – चोरट्यांनी चक्क पोलिस वसाहतीत घुसून एक नाही तर तब्बल १३ पोलिसांची घरे फोडल्याची घटना मुंबईतील माहीम येथे उघडकीस आली आहे. या घटनेने पोलिसांची नाचक्की झाली असून, काही संशयित चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालवली आहे. विशेष म्हणजे, चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेले आहेत.
सविस्तर असे, की या पोलिस वसाहतीत चोरटे मध्यरात्रीच्या सुमारास दबक्या पावलाने येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत असून, घराचा कडी-कोएंडा तोडून घरे फोडण्यात आली आहेत. पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंची तसेच देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. या चोरांपैकी एका सराईत चोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून, कमृद्दिन शेख (वय ४४) असे या सराईत चोराचे नाव आहे. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घरे तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांची रेकी केली जात असे. त्यानंतर योग्य संधी साधून मध्यरात्री पोलिसांच्या घरांचा कडी-कोयंडा तोडून चोरी केली जात असे. या संशयित कमृद्दिनने मध्यरात्री दबक्या पावलाने पोलीस वसाहतीत येत पोलिसांची घरे बंद असल्याची खात्री केली होती. पोलिसांच्या घरांसह प्ले ग्रूप व नर्सरी शाळा आणि वसाहतीच्या कार्यालयालादेखील लक्ष करण्यात आले होते. या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या होत्या. त्याच्या आधारे पोलिसांनी या संशयित आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याची २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
——–
गेल्या काही काळापासून मुंबईत गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र आता मुंबईला सुरक्षित ठेवणार्या पोलिसांचीच घरे असुरक्षित असल्याचे समोर येत आहे. माहीम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरात चोरी झाल्याने पोलिसांची चांगलीच नाचक्की झाली आहे. चोराने पोलिसांच्याच घरी चोरी केल्याचे धाडस केल्यामुळे सध्या चर्चा होताना दिसत आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होत आहे की, पोलिसांच्या घरी चोरी होत असेल, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय?
————-