ChikhaliVidharbha

शेतकर्‍यांच्या पीकविम्यासह विविध मागण्यांसाठी विनायक सरनाईक यांचा शेतकर्‍यांसह कृषी विभाग व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या!

– पीकविमा काढतांना घरापर्यंत येता, विमा देतांना टाळाटाळ का?; शेतकर्‍यांच्या सवाल

चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांनी कृषी विभाग व पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. रब्बी हंगामातील पीकविम्यापासून टाकरखेड मुसलमान येथील शेतकर्‍यांसह जे शेतकरी वंचित राहिले आहेत, त्यांचाही विमा दिला जाईल, असे आश्वासन पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधींनी दिल्यानंतर व याप्रश्नी कृषी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, पीकविमा काढण्यासाठी घरापर्यंत येता, आणि पीकविमा नुकसान भरपाई देताना टाळाटाळ करता, अशा शब्दांत संतप्त शेतकर्‍यांनी पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीला ठणकावले.

सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील टाकरखेड मुसलमान येथील पीकविमा काढलेल्या शेतकर्‍यांनी रब्बीमध्ये हरभरा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सन २०२३-२०२४ च्या पीकविमा मिळावा, यासाठी एकूण ३०८ शेतकर्‍यांनी ऑनलाईन तक्रारी केल्या. परंतु त्यापैकी १५९ पीकविमा कंपनीने मान्य केल्या. तथापि, विविध कारणे दाखवत १४९ शेतकर्‍यांना अपात्र केले असल्याचे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्या मागणीनंतर गावांमध्ये विम्याच्या याद्या लागल्याने समोर आले, तर शेतकरी विमाप्रश्नी जाब विचारतांना दिसत आहेत. दि. २० ऑगस्टरोजी याबाबत शेतकरी अपात्र का? असा सवाल तालुका कृषी अधिकारी व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना टाकरखेड मुसलमान येथील शेतकर्‍यांनी विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात घेराव घालत विचारण्यात आला. या प्रकरणी शेतकर्‍यांनी प्रश्नांचा भडिमार केला असून, तारीख पे तारीख किती दिवस देणार, आम्हीच पीक विम्यापासून अपात्र का? यासह विमा काढतांना प्रतिनिधी गावपोच येतात म्हणजे पीकविमा काढण्यासाठी गाजावाजा केला जातो. मात्र विम्याच्या तक्रारी करून घ्यायला मार्गदर्शन का केले जात नाही, विमा मिळण्यासाठीच शेतकर्‍यांना का आंदोलने करावी लागतात, असा सवालदेखील शेतकर्‍यांसह सरनाईक यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, रब्बीतील १५० अपात्र शेतकर्‍यांना पात्र करण्यात येईल, असे आश्वासन विमा कंपनीकडून मिळाल्याने शेतकर्‍यांना कृषी विभागातून काढता पाय घेतला आहे. सदर मागण्यांची पूर्तता होवून न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा टाकरखेड येथील शेतकर्‍यांसह विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांनी दिला आहे. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.
खरीप २०२३-२४मध्ये सोयाबीनसह इतर पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. तेव्हा टाकरखेड मु येथील ३९० शेतकर्‍यांनी ऑनलाईन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यापैकी केवळ ३१ तक्रारी कंपनीने मान्य केल्या तर विविध कारणे ३५९ तक्रारी अपात्र असल्याचे समोर आले आहे. तर हिच परिस्थिती तालुक्याची असल्याने पीकविमा कंपनीकडून विमा काढतांना मार्गदर्शन होते. परंतु विमा मिळवून देण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन होत नाही, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी केल्या तर शेतकर्‍यांचे नैसर्गिक आपत्तीचे नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून पीकविमा तक्रारी करणार्‍या शेतकर्‍यांना सरसकट पीकविमा द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


कृषी विभागाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवण्याची मागणी
कृषी सहाय्यक शेतकर्‍यांपर्यंत योजना पोहोचवत नसल्याने त्या प्रकरणी चौकशी व्हावी व कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. या प्रकरणी कृषी सहाय्यक यांना सूचना देण्यात येवून शेतकर्‍यांपर्यंत सर्व कृषीविषयक योजना पोहोचवण्यासाठीची कारवाई करण्याचे आश्वासन तालुका कृषी अधिकारी सवडदकर यांनी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना दिले आहे.


संगणक परिचालकाची बीडीओकडे तक्रार
टाकरखेड येथील संगणक परिचालक योजनेची माहिती शेतकर्‍यांना देत नाही. आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याने या प्रकरणी तक्रार गटविकास अधिकारी यांना देण्यात आली असून, या प्रकरणी योग्य कारवाई करण्याच्या सूचना पंचायत समिती कार्यालयाकडून ग्रामपंचायत सचिव यांना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!