तुपकरांना पोलिसांची नोटीस; ‘आंदोलन थांबवा’!
– प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविकांत तुपकरांना ताब्यात घेण्याची शक्यता; तुपकर भूमिगत होतील!
बुलढाणा (खास प्रतिनिधी) – शेतकर्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहे, केंद्र व राज्य सरकारने शेतकर्यांना वार्यावर सोडले आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी परवा, दि. २३ ऑगस्टरोजी शेतकर्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात घुसून शेतकरी आत्महत्याचे प्रात्यक्षिक करून दाखवू, असा इशारा नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. यापूर्वीदेखील अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलन असो की मंत्रालयावर ताबा घेण्याचे आंदोलन असो, रविकांत तुपकर इशारा दिल्यानंतर आंदोलन करतातच, हा इतिहास आहे. यापूर्वीदेखील हजारों शेतकर्यांना घेऊन तुकरांनी मुंबईत धडक दिलेली आहे. त्यामुळे तुपकरांच्या या इशार्याची गांभीर्याने दखल घेत, बुलढाणा शहर पोलिसांनी कलम १६८ अंतर्गत तुपकरांना नोटीस बजावली आहे. तर आजवर अशा हजारो नोटीस आलेल्या आहेत. नोटिशींना आणि पोलीस कारवाईला आम्ही घाबरत नाही, आम्ही आमचा हक्क मागत आहे. त्यामुळे कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ‘वर्षा’ बंगल्यावर जाणारच, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी घेतली आहे. दरम्यान, मुंबईत सद्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुपकरांना रोखणे हे बुलढाणा पोलिसांसमोरील मोठे आव्हान आहे. पोलिस प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तुपकरांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. पोलिसांच्या या कारवाईची शक्यता पाहाता, पुढील काही तासांत तुपकर हे भूमिगत होण्याचीदेखील शक्यता वर्तविली जात आहे. त्यानंतर ते नेहमीप्रमाणे थेट वर्षा बंगल्यावरच धडक देतील, अशीही शक्यता आहे.
नागपूर येथे दि. २० ऑगस्टरोजी झालेल्या पत्रकार परिषदेत रविकांत तुपकर यांनी शेतकर्यांच्या समस्यांचा पाढा वाचला. राज्यातील शेतकरी-शेतमजूर मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहे. शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. याला केंद्र व राज्य सरकारचे धोरणच कारणीभूत आहे. त्यामुळे सरकारचे शेतकर्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी शेतकर्यांना घेऊन मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शेतकरी आत्महत्या कसा करतो, याचे प्रात्यक्षिक दाखवणार, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी यापूर्वीदेखील रविकांत तुपकर यांनी थेट मुंबईत धडक देऊन आंदोलन केलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी तुपकरांच्या इशार्याची गांभीर्याने दखल घेतली असून, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता, आपण आंदोलन करू नये, असे सांगत पोलिसांनी कलम १६८ नुसार नोटीस बजावली आहे. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सदरची नोटीस बजावली असून, आंदोलन करू नये, असे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचादेखील इशारा दिला आहे. तर अशा नोटीसला आणि पोलीस कारवाईला आपण घाबरत नाही. अशा नोटिसांनी घरातील कपाट भरले आहे. पोलीस कारवाईचा धाक दाखवून सत्ताधारी शेतकर्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु जीव गेला तरी आम्ही आमच्या हक्कासाठी आंदोलन करतच राहणार, अशी भूमिका रविकांत तुपकरांनी जाहीर केली आहे.
बदलापूर येथील दुर्देवी घटना, त्यानंतर सुरू झालेली आंदोलने आणि आगामी सण-उत्सव पाहाता, मुंबई पोलिसांवर सद्या कमालीचा ताण निर्माण झालेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरील पोलिस बंदोबस्त आधीच वाढविण्यात आलेला आहे. त्यातच शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आत्मघातीसदृश आंदोलन मुंबईत करण्याचा प्रयत्न केला तर मुंबई पोलिसांवरील ताणात आणखी भर पडेल. त्यामुळे रविकांत तुपकर यांना बुलढाण्यातच रोखणे हे राज्य पोलिस दलासमोर मोठे आव्हान राहणार आहे. रविकांत तुपकर हे अशा प्रकारे आक्रमक, व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्या आंदोलनाचा इशारा देतात. त्यांना रोखण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावली तर त्यानंतर ते भूमिगत होतात. त्यानंतर अचानक आंदोलनस्थळी वेशांतर करून येतात, व आपल्या आंदोलनाद्वारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. यापूर्वीचा त्यांच्या अशा आंदोलनांचा अनुभव पाहाता, बुलढाणा पोलिस व गुप्तवार्ता विभाग यावेळेस सावध झालेला आहे. तुपकरांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचे मोठे आव्हान बुलढाणा पोलिसांसमोर निर्माण झालेले असून, पोलिस ते कसे पेलतात? याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. मागील एका प्रकरणात तुपकरांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झालेला आहे. हा जामीन रद्द करण्यासाठीदेखील पोलिस न्यायालयात जाऊ शकतात. हा जामीन रद्द झाला तर तुपकरांना मात्र विधानसभा निवडणूक कारागृहातूनच लढविण्याची वेळ येऊ शकते, अशी खासगी चर्चा सुरू आहे.
—————-