Breaking newsCrimeHead linesMaharashtraMumbaiWomen's World

राज्यात महिला, मुली असुरक्षित; महाविकास आघाडीची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक!

– तब्बल ११ तासानंतर मुलींवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हे दाखल केल्याने पोलिसांवर महिला आयोगाचे ताशेरे!
– बदलापुरात तीव्र आंदोलनाची धग कायम; पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याचे सत्र; अनेकांना अटक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले असून, राज्यातील महिला-भगिनी असुरक्षित झाल्या आहेत. एकीकडे हे सरकार लाडकी बहीण योजनेच्या आमिषाने महिलांची मते आपल्याला मिळविण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत असताना, दुसरीकडे गृहखात्याचे मोठे अपयश चव्हाट्यावर आले असून, महिलांसह लहान मुलीदेखील राज्यात सुरक्षित नसल्याचे दुर्देवाने पुढे आले आहे. महिला व बालिकांवरील वाढत्या अत्याचारांच्या या घटनांविरोधात महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून, येत्या २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिली. दरम्यान, मुलींवरील लैंगिक अत्याचाराचा हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच दिले आहे.
राज्यातील सरकारचा तीव्र निषेध.

दरम्यान, बदलापूर येथील प्रतिष्ठित शाळेत लहान मुलींवर झालेले लैंगिक अत्याचाराने राज्य ढवळून निघाले असून, बदलापुरात पोलिसांच्या जुलमी कारवाईनंतरही वातावरण शांत होण्याचे नाव नाही. या घटनेमागे शाळेने केलेला उशीर हे सर्वात मोठे गोंधळाचे कारण असल्याचे राज्य बालहक्क आयोगाने म्हटले आहे. बदलापूर येथील घटने संदर्भात राज्य बालहक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून, या संदर्भात त्यांनी कडक ताशेरे ओढले आहेत. अकरा तासानंतर या प्रकरणाची एफआयआर दाखल झाली. हाच खरा प्रॉब्लेम असल्याचे बालहक्क आयोगाने म्हटले आहे. या प्रकरणात तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता, असेदेखील बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष खुशी शहा यांनी सांगितले. या प्रकरणातील आरोपी हा पंधरा दिवस शाळेत होता. त्याला सर्व ठिकाणी जाण्याचा अक्सेस होता. त्यामुळे आम्हाला आणखी भीती वाटत असल्याचे खुशी शहा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईत आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेना खासदार संजय राऊत, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, भाई जगताप, खासदार वर्षा गायकवाड आणि नसीम खान यांची उपस्थिती होती. या बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. ‘आजच्या बैठकीत आम्ही कोणतीही राजकीय चर्चा केली नाही. कारण, महाराष्ट्र मनाने अस्वस्थ असून पेटलेला आहे. त्यामुळे आम्ही फक्त कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा केली. सरकारने तातडीने महिला अत्याचाराच्या घटना रोखाव्यात’. येत्या २४ तारखेला आम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला सर्व नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहनदेखील संजय राऊत यांनी केले. Imageदरम्यान, बदलापूर येथील घटनेच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ शिवसेना ईशान्य मुंबईच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी हाती दोर घेऊन महिलांनी आरोपीला फाशी देण्याच्या मागणी केली. त्याचबरोबर महायुती सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बदलापूर येथे चिमुकल्यांवर अत्याचार करण्यात आलेली शाळा ही शाळा भाजपची नेत्याची असल्याने पोलिसांनी मुद्दामहून कारवाईला दिरंगाई केली, असा आरोपही ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी केला.Imageदुसरीकडे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटरून पोस्ट करत महायुती सरकारला चांगलेच धारेवर धरले. ‘लाडक्या बहिणीं’च्या लेकीने किती छळ सोसायचा? बदलापूर पाठोपाठ अकोल्यातील काजीखेड गावात एका शिक्षकाने सहा वर्षीय विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. कायद्याचा धाक उरला आहे का या राज्यात? सरकारने ‘फडतूस’गिरी बंद करा, राजीनामा द्या’, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
————-
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर एका सफाई कर्मचार्‍याने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार उघडकीस येताच काल परिसरात संतापाची लाट उसळली. या घटनेच्या निषेधार्थ शहरातील नागरिकांनी मंगळवारी रेल्वेरोको आंदोलन केले. यावेळी काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकदेखील केली. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३०० जणांवर गुन्हे दाखल केले. तसेच आतापर्यंत २८ जणांना अटकही करण्यात आली आहे. रेल्वेरोको आंदोलन, सरकारी कामात अडथळा, दगडफेक आणि दंगल घडविण्याचा प्रयत्न, अशा विविध कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सध्या शहरात तणावपूर्व शांतता आहे.

लाडकी बहीण योजनेऐवजी महिला सुरक्षा योजना राबवा -सुप्रिया सुळे 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी या प्रकरणी सरकारला लाडकी बहीण योजनेऐवजी महिला सुरक्षा योजना राबवण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!